आदिवासींच्या राखीव जागांवर होणाऱ्या अतिक्रमणाबद्दल आदिवासींमधेच उदासीनता....
आदिवासी राखीव जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांना आदिवासीं मधून होणारा विरोध हा *'सापेक्ष'* असतो असे साधारणपणे दिसून येत असते. सापेक्ष यासाठी की,
आपणास माहीतच आहे की, अनेक आदिवासी विविध धर्म स्वीकारून त्या त्या धार्मिक हितसंबंधी गटांत सामील आहेत. आदिवासी हा मुळात निसर्गपूजक,Animist,निधर्मी असल्याने आदिवासींनी 'धर्मांतर केले असे म्हणता येणार नाही. तर त्यांनी 'धर्म स्वीकारला' असे म्हणता येईल.
#हिंदू,मुस्लिम,ख्रिस्ती,बौद्ध इत्यादि विविध #धर्म काही आदिवासींनी स्वीकारले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वीकारलेल्या धर्म गटाशी श्रद्धेच्या माध्यमातून त्यांनी निष्ठा बाळगणे तेथे आलेच. 'धर्माधारीत हितसंबंधी गटाशी एखाद्याची तुलनेने जास्त निष्ठा असते' हे जाती धर्म पंथ यांवर आधारित राजकारण,समाजकारण,धर्मकारण व अर्थकारण याला अतोनात महत्त्व असलेल्या आपल्या देशात(निवडणूक तिकीट वाटप जाती धर्मावर आधारित असते)आपणास वेगळे समजावून सांगण्याची गरज नाही. स्वीकार केलेल्या धर्मातील बिगर आदिवासींशी विवाह संबंधांतुन जे बिगर आदिवासी नातेवाईक तयार झालेले आहेत; त्यांच्या आधारे देखिल अनेक बिगर आदिवासींनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रकार झालेले आहेत. मी मागे अनेकदा म्हटले आहे की, बोगस आदिवासी समस्येवर कायमस्वरूपी उपाय करायचा असेल तर बोगदा आदिवासी उमेदवार कार्यरत असलेल्या कार्यालयांत जाऊन त्यांच्या मूळ जाती व धर्म माहिती करून घ्या. आणि कुणाच्या आधारे म्हणजेच अनुसूचित जमाती या यादीतील कुठल्या जातीच्या आधारे किंवा त्या जातींत कोणाच्या आधारे आदिवासी जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्रे मिळतात ते जाऊन बघा. व ते कमीत कमी आदिवासी जनतेला तरी उघड करून उपलब्ध करून द्या. परंतु यावर बहुतेक सुशिक्षित आदिवासी मागे सरकतात. 'धर्म निष्ठा आणि धर्म श्रद्धा ही इतर कुठल्याही निष्ठेवर व भावनेवर हावी होत असते,' हेही वेगळे सांगण्याची गरज नाही हा इतिहास आहे'.
#निसर्गपूजक,Animist,अस्सल आदिवासी या बद्दल अनभिज्ञ आहेत. ती बिचारी मुकी भोळी लोकं मोफत प्रवास व मोफत खाण्यापिण्याच्या सोयीने मुंबई किंवा नागपूर पाहायला मिळते म्हणून अनेकदा बोगसआदिवासी विरोधात मोर्चात जाऊनही येतात. अर्थात धर्मवाल्या(धर्म स्वीकारलेले) सुशिक्षित आदिवासीना देखील त्यांनी आदिवासी संस्कृती सोडून दिल्याने मोर्चासाठी जंगलातून गरीब आदिवासीना मोर्चे कॉन्ट्रॅक्टरां मार्फत मागवून मुंबई नागपूर फिरवायला म्हणून न्यावे लागतात. नाहीतर पॅन्टशर्टवर *गमछा* तर देशातील सर्व खेडूत टाकत असतात. त्यामुळे फक्त स्वतःच्या गळ्यात गमछा टाकून आदिवासींचा मोर्चा आहे असे दाखवता येत नाही. ओरिजिनल आदिवासी ढोल सकट आणल्या शिवाय इव्हेंट पार पडत नाही. असो!.
आपण स्वीकारल्या धर्मातील बिगर आदिवासी उमेदवार जर एस टी जागा बळकावून घेत असेल तर त्यावर शांत राहून मूक संमती द्यायची, आपण ज्या बिगर आदिवासी संघटनेत किंवा बिगर आदिवासी राजकीय पक्षात काम करतो किंवा त्यांशी संबंधित आहोत त्यातील कोणी बोगस आदिवासी उमेदवार म्हणून आढळला की चुप्पी साधायची. असे चाललेले आहे का? (विविध राजकीय पक्षांतील बोगस आदिवासी लोकप्रतिनिधी) ही एक बोगस आदिवासी मुद्दयावर आदिवासींची उदासीनता. तर दुसरी उदासीनता म्हणजे नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण घेणारे आदिवासी युवक कॉलेजकुमार बोगस आदिवासी विरोधी मोर्चात फार कमी दिसतात. जे की लवकरच राखीव जागांचे लाभार्थी होणार आहेत. तर ज्याना कुठल्याही राखीव जागा व सवलती मिळाल्या नाहीत व जवळपास मिळते दुरापास्त आहे, असे दुरदुर्गम भागातील गरीब शेतकरी व शेतमजूर आपला मात्र आपला रोजगार बुडवून त्या मोर्चात जातात. बोगस आदिवासी उमेदवार घुसखोरीला व अनुसूचित जमातीत घुसणाऱ्या जातींना आपण कुठल्या स्तरावर आणि कुठपर्यंत विरोध दर्शवितो व कुठे सोयीस्करपणे चुप्पी साधतो आणि कुठल्या स्तरावर त्यांच्याशी सोयीस्करपणे समरस होतो, हे येथे परिणाम करणारे असते. हे लक्षात घ्यायला हवे. ज्यावरून आपल्याला व आपल्या मुद्यांना गांभिर्य प्राप्त होणार किंवा गांभीर्य प्राप्त होणार नाही हे म्याटर करते. याचा विचार व्हायला हवा. 'दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे' असे चित्र चुकीचा संदेश देणारे असते. व त्या त्या विषयाच्या गांभीर्यावर विपरीत परिणाम करणारे असते.
आदिवासींच्या राखीव जागांवर व अनुसूचित जमाती या यादीवरच अतिक्रमण होत आहे. आदिवासींच्या उन्नतीसाठी तरतूद केलेले त्यांचे हक्क व अधिकार पळवून नेऊन त्यांना आहे असेच शोषित वंचित ठेवले जात आहे. हे वास्तव कुणालाही गंभीर वाटत नाही, हे त्याहूनही गंभीर. आपण नेहमी म्हणतो व ऐकतो की आदिवासींच्या हक्कांना घटनात्मक संरक्षण प्राप्त आहे, कायद्याचे संरक्षण आहे, आदिवासींच्या हितासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे, स्वतंत्र मंत्रालय(खाते)आहे. इतके भरपूर संरक्षण व आधार असताना आदिवासी मात्र देशोधडीला? आदिवासींना कुठलीही यंत्रणा मदत का करीत नाही? असा प्रश्न पडतो. त्यांना वाली कोण आहे? या देशाच्या शासनातील त्यांचा पालक कोण? कोणाकडे त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याची ड्युटी आहे? हेच नेमके आदिवासींना सांगण्या बद्दल आदिवासींमधे प्रचंड उदासीनता आहे. म्हणजे बोगस आदिवासी समस्येवर उपाय सांगितले जात नाही. ही देखील एक प्रकारची बोगस आदिवासी मुद्द्यावर उदासीनताच होय. अर्थात जनरल नॉलेज म्हणून या बाबी आपणा सर्वांनी शोधून काढून ,सर्वांना माहिती करवून दिल्या पाहिजे.
🏹🖍️🪄अजय गावीत
आदिवासी टाईगर सेना ATS