Ads Area

(Google Ads)

'लगीन'(विवाह पद्धती)

                       आदिवासी कोकणी कोकणा समाजातीलविवाह            
                                       सोहळा(लगीन) 
                                  माहिती update करणे सुरु आहे.                                                                                                                                                                                                 

        कोकणी कोकणा समाजामध्ये  लग्नकार्यात आपल्या-आपल्या भागात  विशिष्ट अशा  चालीरीतीने लगीन लावण्याची प्रथा आहे.या प्रथेचा थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देत आहे.या मध्ये काही चालीरीतीमध्ये  त्या-त्या भागानुसार थोडाफार बदल असू शकतो.कारण  कालानुरूप बर्याच प्रथामध्ये आधुनिक बदल दिसून येतात.

पार्श्वभूमी:

   आदिवासी कोकणा कोकणी समाज संस्कृती हा जीवनाचा पायामानून आपले जीवन जगत आहेत.प्राचीन काळापासून आदिवासी श्रम,समूह,आणि सहकार्य याच मानवी जीवनमुल्यांच्याआधारे आपले जीवन जगत आहे. आजही आदिवासीँच्या जीवनातील प्रत्येक हालचाल किँवा जीवन व्यवहार, श्रम, समुह आणि सहकार्य याच्याच आधारे होत असते,सण, उत्सव, लग्न, गावपंचायतीद्वारे न्याय- निवाडा,पद्धतीने आजही केला जातो.

आदिवासी कोकणी कोकणा समाजात समाजमान्य व एकपत्नीत्व विवाह प्रथा प्रचलित आहे.या समाजामध्ये आपले कुळ ,आडनाव सोडून इतर कुळात लग्न केली जातात.मामांच्या मुलीशी देखील लग्न केले जाते मात्र आत्याच्या मुलीशी शक्यतो लग्न केले जात नाही.तसेच इतर जवळच्या कोणत्याही नात्यात लग्न जमवले जात नाही.अगदी चुलत मुळात असले तरी अशा नात्यात लग्न केले जात नाही.साधारणपणे १८-२० वर्ष वयामध्ये मुला-मुलींची लग्न करण्याची प्रथा आहे .धकाधकीच्या जीवन्मानामुळे लग्नाच्या वयात थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली दिसून येते.पूर्वी समाजामध्ये लग्नाला जवळपास ३-४ दिवस लागायचे परंतु इतरांच्या अनुकरणामुळे आता एका  दिवसात विवाह सोहळा  उरकला जातो.या संपूर्ण लग्नकार्यात अनेक प्रकारच्या आदिम प्रथा पहावयास मिळतात.लग्नकार्यात सर्वाना समान दर्जा दिला जातो.आदिवासी कोकणी कोकणा समाजातील लग्न कार्याविषयी थोडक्यात माहिती क्रमश:देत आहे.


१) मुलगी पसंत करणे  :
                समाजामध्ये मुलगा किवा मुलगी वयात आले कि अथवा कमावते झाले कि घराची वडीलधारी मंडळी आपल्या मुलामुलींसाठी स्थळ पाहण्याची घाई करतात.सर्व प्रथम  परिचयाच्या गावात,परिसरात स्थळ पाहण्यास सुरुवात करतात.आणि योग्य स्थळ असले कि मग  मुलगा  आपल्या एक दोन मित्रासह किवा जवळच्या नातेवाईकांसह  मुलीच्या घरी मुलीला पाहण्यासाठी जातो.सर्वप्रथम मुलगी आपल्या पारंपारिक पोशाख घालून आलेल्या पाहुण्यासाठी पाणी वगैरे घेऊन येते,यानंतर  मुलाचे नातेवाईक मुलीला एकदोन प्रश्न विचारतात.यातून मुलगी कशी बोलते याचा शोध घेतला जातो. अगदी ५-१० मिनिटात मुलाला मुलगी कशी वाटते हे पाहायचे असते.यानंतर पाहुणचार करून मुलाकडची  मंडळी परत जाते.जर मुलगी पसंत असली तर तसा निरोप ते मुलीकडच्या लोकांना सांगतात. आणि मुलीकडील मंडळी देखील मुलगा पसंत असल्यास दोघात लग्न करण्याविषयी सम्मती होते.

२)पेन पिणे निळा पान (धरबांधन) :  
             दोन्हीकडच्या मंडळीची संमती झाल्यावर मुलाकडची गावपंच(जेष्ठ माणसे पोलीसपाटील,सरपंच,मुख्य माणसे)मुलीच्या घरी पेन पिण्यासाठी जातात.याठिकाणी दोन्हीकडील गावपंच जमा होते आणि मग सर्वांच्या समक्ष हे नाते कसे जमले? कोण पाहुणे? कसे आले? कुठून आले? वगैरे.....त्यांचा परिचय दिला जातो आणि मुलामुलीच्या वडिलांना लग्नासाठी पूर्णपणे तयार आहात काय ? अशाप्रकाच्या शंका-प्रश्न गावपंचाकडून विचारली जातात.आणि मुलामुलीसह आईवडील वगैरे सर्वांची  संमती घेतली जाते.आणि सर्वांच्या साक्षीने हे नाते जमले असे जाहीर केले जाते अथवा ठरवले जाते.यानंतर दोन्हीकडच्या पक्षाकडून पूर्वी सव्वा रुपये आत्ता अकरा -अकरा रुपये जमा केले जातात . आणि त्याची  साखर अथवा दारू आणली जाते.आणि  सर्व पंचाना दारू पाजली जाते,किवा साखर वाटली जाते म्हणजे सर्वांचे तोंड गोड केले जाते अर्थात पेन पिली जाते.अशाप्रकारे लग्न पक्के समजले जाते याला पेन पिणे निळापान  किवा 'धरबांधन' असेही  म्हटले जाते.         
      यानंतर सर्वांच्या समक्ष साखरपुड्याची तारीख ठरवली जाते.अर्थात गावामध्ये एकाच दिवशी आणखी कोणाचा कार्यक्रम असू नये असा यामागिल उद्देश असतो.
 
३)नारळ टोपी :
साखरपुडा (कुंकू) लावण्याच्या आधी नारळटोपीचा कार्यक्रम केला जातो. नारळ टोपी कार्यायक्मरम झाला म्ध्येहणजे हे लग्न दोन्हीकडील मुलामुलींसह नातेवाईकाना देखील हे लग्न रीतसर मान्य आहे व सर्वांच्या साक्षीने ह विधी केला जातो. मुलीच्या आईवडिलाकडून ड्रेस,टॉवेल,नारळ,टोपी,करदोडा इत्यादी वस्तू विधीपूर्वक  भेट दिल्या जातात.आणि त्याची सर्व नातवाईकांची एकप्रकारे भेट,ओळख  घालून दिली जाते.अर्थात मुलाचा विधिवत स्वीकार केला जातो.पूर्वी लग्न  जमल्या जमल्या हा कार्यक्रम उरकण्यात येत होता परंतु अलीकडे साखरपुड्यातच हा कार्यक्रम करण्याची प्रथा रूढ होताना दिसून येत आहे.
             
४) साखरपुडा:
                  आदिवासी कोकणी कोकणा समाजात लग्नापूर्वी साखरपुडा (कुंकू)लावण्याची प्रथा आहे.साखरपुडा लावण्याची पद्धत हि इतरापेक्षा अगदी निराळीच असते.कुंकू लावण्यासाठी मुलाकडची मंडळी मुलीकडे येत असते.पूर्वी या कार्यक्रमात ठराविक मंडळी म्हणजे गावातील मुख्य माणसे,मुलामुलीचे आईवडील काका चुलते अशा ठराविक मंडळीसह साखरपुडा उरकला जाई.अलीकडे  या कार्यक्रमाला छोट्या लग्नाचेच स्वरूप प्राप्त होत असते,म्हणजे जवळपास दोन्हीकडील भरपूर नातेवाईक या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात.या सर्वांची जेवनाची वगैरे सोय मुलीकडील मंडळीला करावयाची असते.पूर्वी साखरपुड्यात फक्त पुरुष मंडळी जात असे परंतु कालांतराने आता दोन्हीकडील लहानथोर, स्रीपुरुष उपस्थित असतात.
    साखरपुड्यात मुलीसाठी मुलाकडील मंडळी साखरपुड्याचा विशिष्ट अशा पदार्थाने भरलेला ताट भरून आणतात.ज्यामध्ये मुलीचा संपूर्ण  श्रुंगार,कपडे,५ प्रकारची फळे,साखरेचा पुडा गुळाने भरलेल्या वाट्या इत्यादी वस्तू असतात.यामध्ये  पान,सुपारी,शोप देखील आणली जाते व टी साखरपुडा झाल्यावर सर्वाना वाटली जाते .सर्वप्रथम गावच्याच नाईकडून गावाचे पाटील सरपंच मुखिया यांच्याकडून कुंकू लावण्यासाठी हुकुम मागितला जातो म्हणजे परवानगी घेतली जाते.त्यानंतर दोघांच्या मामांची देखील परवानगी घेतली जाते.मुलगी साज श्रुंगार करून मांडवामध्ये येते.आणि होणार्या सासरे वडीलधारी मंडळीला मानाचे पाणी देते,सासरे जेष्ठ मंडळी  देखील मुलीला रिकामा  ग्लास परत न करता त्यामध्ये पैसे टाकत असतात.असा हा सर्व मानाचा कार्यक्रम  झाल्यावर मग मुलगी पाटावर बसते आणि त्यानंतर मुलाकडील पाच स्रिया किवा पुरुष सर्वांच्या परवानगीने मुलीला साडी चोळी फळे इत्यादी वस्तू भेट देत कुंकू लावतात.यानंतर मुला-मुलीचे वडील एकमेकांना मानाचा पानाचा विडा देतात आणि एकमेकांची भेट घेतात सर्वाना नमस्कार करतात .यानंतर सर्वाना साखर आणि पानसुपारी वाटली जाते.अशाप्रकारे कोकणी कोकणा समाजात साखरपुडा (कुंकू) लावण्याची रीत आहे.यामध्ये त्या-त्या भागानुसार थोडाफार बदल असु शकतो.
       यानंतर लग्नाची तारीख म्हणजे मुहूर्त( यासाठी कोणत्याही ब्राम्हणाची मदत घेतली जात नाही) काढून एक तारीख ठरविली जाते.दोन्ही गावात कोणाचा आणखी काही कार्यक्रम असल्याची खात्री करून मगच तारीख ठरवली जाते हे विशेष.

 लगीन


आदिवासी कोकणी कोकणा समाजात समाजमान्य विवाह पद्धती आहे.सर्व समाज मान्य विधी केल्यानंतर विवाहाससमाज व गावपन्चांची मान्यता मिळाल्यावर आणि साखरपुडा वगैरे विवाहपूर्व विधी आटोपल्यावर लग्नाचा मुहूर्त अथवा शुभ दिवस ठरवला जातो.यामध्ये बर्याच रूढी परंपरांचा  समावेश होतो.अर्थात या सर्व विधीना एक दोन दिवस आधीच सुरुवात केली जाते. मुलाकडे आणि मुलीकडे असे दोन्हीकडे विविध रीतिरिवाजाप्रमाणे विधी केल्या जातात.या ठिकाणी या सर्व बाबींचा थोडक्यात परिचय करून देत आहे.




) घट्या देव (कुळदैवतांचे पूजन)




आदिवासी कोकणी कोकणी कोकणा कुकणा समजत विवाहापूर्वी कुलदैवतांचे लग्न लावण्याची प्रथा आहे.मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कुलाचे स्वतंत्र असे मंडळ असते.हे सर्व करीत असताना त्याठिकाणी गावातील तसेच त्या कुळातील सर्व नातेवाईक उपस्थित असतात.





सर्वप्रथम मुलाच्या आईवडिलांच्या हस्ते कुलदैवतांची दुध आणि शुद्ध पाण्यात अंघोळ केली जाते.आणि सर्व देवतांना एका धातूच्या भांड्यात पायरीप्रमाने रांगेने बसवले जाते.यामध्ये खंडेरावदेव,बहिरमदेव,वाघदेव,नागदेव,मुंडादेव,बानुं,म्हाळसा,चंदनसूर्या,इत्यादी देवदेवता असतात.या सर्वांची मांडणी अत्यंत काळजीपूर्वक केली जाते.एका पाटावर देवांना ठेवल्यावर त्यांच्या चारही बाजूस शुद्ध पाण्याने भरलेले तांबे(पात्र) ठेवले जातात. नंतर या चारही तांब्यांना दोऱ्याने(हळद लावून) पाच वेगवेगळ्या कुळातील व्यक्तीच्या हस्ते गुंफले जाते दोरा गुंफत असताना विशिष्ट अशा भगताकडून मंत्र उचारला जातो.


                              “  ढवळा घोडा पायम तोडा


                                 कम्बरी करदोडा ................”


                              देवाचं लग्न लावण्याचा हुकुम........


                           यळकोट यळकोट जय मल्हार चा घोष केला जातो.


यानंतर देवांच्या लग्नाची तयारी केली जाते.देवांना बाशिंग, नवे कापड, नारळ, सुपारी, नागेल पान ,हळद कुंकू ,धान्य वगैरे  चढवले जाते. सर्व उपस्थित मंडळीला अक्षदा वाटल्या जातात.आणि गावातीलच एका जेष्ठ व्यक्तीकडून मंगलाष्टक म्हटले जाते आणि देवांचे लग्न लावले जाते.





२) जागरण गोंधळ (वहि हा गाण्याचा प्रकार)

  आदिवासी कोकणी कोकणा समाजात लग्नाच्या आदल्या दिवशी संपूर्ण रात्र जागरण केली जाते .संपूर्ण रात्रभर देवतांचे गौरव पूर्ण अशा वह्या म्हटल्या जातात.प्रत्येक वहिला स्वतंत्र अशी चाल असते .त्याला ढाक या धोलकीसारख्या वाद्याची साथ दिली जाते.यामध्ये प्रामुख्याने दोन गात केले जातात एक गात नवीन वही म्हणणारा असतो आणि दुसरा गात एक-एक कडवे पुन्हा म्हणणारा असतो.पूर्ण रात्र वेगवेगळी गाणी म्हटली जातात.यामध्ये बरीच गाणी हि प्रसंगावर आधारित देखील असतात.जसे कि देणगी वगैरे मागण्यासाठीची वही किवा देवतांची अंघोळ,फिरण्याचे ठिकाण वर्णन गीते अशी वेगवेगळी गाणी ऐकण्यास मिळतात.तसेच पाहते म्हणावयाची गाणी देखील असतात.
नमुन्यासाठी काही वह्या याठिकाणी आपणास उपलब्ध करून देत आहे.आपण त्यावर क्लिक करा पाहण्याचा आनंद घ्या.


















३)पूर्वतयारी (मांडव पडणे )


  लग्नाच्या आदल्या दिवशी देवदेवतांचे विवाह वगैरे झाल्यानंतर मांडव म्हणजे मंडप पूजले जाते याची देखील विशिष्ट अशी पूजाविधी असते. सर्वप्रथम परिसरातील विविध उंबर पिंपळ वगैरे झाडांच्या फांद्या तोडून आणतात.आणि त्याचा मांडव दारापुढेच बनवला जातो.दाराच्या आजूबाजूला दोन-दोन मडके किवा डेरे पाणी भरून ठेवेली जातात.सोबत संबळ वाद्य वाजवले जाते. आणि मोठ्या दिमाखात नैसर्गिक मंडप तयार केला जातो.अलीकडे वृक्षसंवर्धन आणि वृक्षांच्या अभावामुळे आधुनिक मंडप वापरली जातात.आणि मग या अख्या मांडवाला  कच्च्या धाग्याने आणि मांडव पुजण्याचे खास कोकणी भाषेतीलच गाणी म्हणत सुतवले (गुंडाळले)जाते.आणि ८-१० लोकांना जेवण दिले जाते याला मांडव पंगत असेही म्हटले जाते.यानंतर खंतुल्या,तेलन पाडले हा विधी केला जातो, अर्थात मांडवाच्या किवा लग्न कार्य असणाऱ्या अंगणात नवरदेवाचे भावाला खंतुल्या बनवले जाते.त्यास टोपी घालून त्याच्या डोक्यावर एक कुसा/कुदळ(खणण्याची वस्तू) दिली जाते आणि अंगणातच एका कोपऱ्यात खास


        "खंतुल्या वरी व खंतुल्या वरी तेलुना पाडा व तेलुना पाडा . . . . . . . . . "


अशी गाणी गात तेलन पाडले जाते किवा थोडे खणले जाते.हि एक अत्यंत सुंदर आणि समाजातील विशेषआणि वेगळी अशी प्रथा आहे.
४)घाण सुतवणे
            हि एक अत्यंत आगळीवेगळीप्रथा समाजात आढळून येते,लग्नाच्या दोन दिवस आधी मुलीकडील मंडळी आपल्याकडील धान्य (सावा) सवासिनी कडून  विशिष्ट विधी करून ,गाणे गात उखळात  सावा  हळकुंड पैसे सुपारी वगैरे टाकून कुटून काढतात मुलाकडे पोहोच करतात यानंतर मुलाकडील कडील सवासिनी देखील असाच विधी करतात. नवरी नवरदेवास संपूर्ण विवाहात पाटावर बसवताना याच घाण वर बसवले जाते.


५) हळद समारंभ      
  हळद समारंभास सुरुवात होते.हळद आधी गावातील सवासिण कडून घरटी(जात) वर दळून घेतली जाते हळद दलात असताना देखील त्या प्रसंगावर आधारित असेच गाणे म्हटली जातात.आणि हळद दळली जाते.हळद दळताना गावातील प्रत्येक घरातून कोणीतरी प्रतिनिधी असते म्हणजे सर्वांच्या साक्षीने आणि सहकार्याने प्रत्येक प्रथा क्रिया केली जाते.हे खूप महत्वाचे आहे कारण यातून समाजात एकोपा वाढण्यास मदत होते.आणि समाजातील  सहकार्य वृत्ती दिसून येते. घरातील भिंतीना विधा रंगाच्या ठिपक्यांनी सजवले जाते ठिपक्या करताना देखील एक सुंदर असे गीत गायले जाते,हळद लावताना सर्वात आधी नवरदेवाचे वडील हळद लावतात.त्यानंतर आई आणि मग आजी आजोबा मामा मामी वगैरे ....हळद लावतात.हळद लावताना देखील विशेष अशी काळजी घेतली जाते अर्थात हळद लावताना  ती पायाकडून शिराकडे अशी वर चढवली जाते,याउलट हळद लावली जात नाही शिराकडू पायाकडे हळद लावणे अशुभ मानले जाते. संपूर्ण हळद समारंभात खूप वेगवेगळ्या क्रिया केल्या जातात.हळद लावल्यानंतर नवरदेवाचे पाव्हणे नवरदेवाला  जमिनीला पाय न लावता उचलून घरात घेऊन जातात. व अंगणात नवरदेवाची  सर्व नातेवाईक भेट घेतात व त्याचे ओवाळून औक्षण करतात. विविध क्रिया केल्या जातात यावरून समाजातील वेगळेपण दिसून येते.


६) मुख्य विवाह (टाळी लावणे )


आदिवासी कोकणी कोकणा कुकणा समाजात लग्न किवा टाळी लावण्याची पद्धत अत्यंत साधी आणि फारशी वेळखाऊ नसते यामध्ये बहुतांश लोक समाजातीलच कोणीतरी ब्राम्हणाचे (तात्पुरते मंगलाष्टक म्हणणारी व्यक्ती )काम करतो . म्हणजे समाजातीलच जाणकार बांधव याठिकाणी ब्राह्मणाची भूमिका पार पडत असतो हि अलीकडच्या काळातील अत्यंत भूषणावह बाब आहे. लग्नात  ब्राम्हणांना  फाटा देणे हि फार उल्लेखनीय आणि सुधारणावादी पद्धत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.शक्यतो खान्देशात मुलाकडे टाळी लावण्याची पद्धत आहे तर नाशिक/बागलाण  परिसरात मुलीकडे टाळी लावण्याची पद्धत आहे. बऱ्याचवेळा दोन्हीकडील मंडळी बसून कोणाकडे लग्न ठेवायचे  हे आपसात ठरवून घेत असतात


    सकाळी ज्या ठिकाणी  लग्न असेल त्या ठिकाणी समोरच्या पक्षाने वेळेवर पोहचणे गरजेचे असते त्यानंतर विविध विधींना खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आलेल्या पक्षाचे विशिष्ट अशा खास सामाजिक गीताने स्वागत केले जाते आणि पूजन वगैरे केले जाते.




७)आहेर देणे-घेणे
           आदिवासी कोकणी कोकणा समाजात देखील आहेर देण्या घेण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आली आहे परंतु याचे स्वरूप मात्र अत्यंत वेगळे आहे . 
 आहेराची सुरूवात व्याही बाहीचा ओहोटाणे केली जाते. यामध्ये दोन्हीकडील  व्याही एकमेकांना धोतर,कपडे  साडी /लुगडे चोळी च्या स्वरुपात भेट देतात व आणि एकमेकांच्या पाया पडतात.
  नंतर मुलाकडून  नवरीच्या मामा-मामीला मामा जोट,स्वरुपात कपडे धोतर चोळी साडी वगैरे भेट दिली जाते. त्याचप्रमाणे  मुलाकडून नवरीच्या बहिणीला बहिण साडा, नवरीच्या आजीला आजल साडा,नवरीच्या आईला माय साडा असे मानाचे आहेर दिले जातात.अर्थात कपडे देऊन एकमेकांचा मान-सन्मान  केला जातो.यानंतर  दोन्ही कडील जवळील  नातेवाईकांना धोतर,साडी,फडकी,टॉवेल, सिट अशा स्वरुपाचे आहेर दिली जातात.आलेल्या नातेवाईकांना एकप्रकारची भेट दिली जाते.
 आणि या कपड्यांच्या बदल्यात या सर्व नातेवाईकाकडून  मामापासोडा,बहिणसाडी,आजलसाडी,मायसाडी बदल्यात नवरदेव व नवरी यांना गाय,बकरी भेट आंदण दिली जाते .अर्थात नवीन संसाराला हातभार मदत या स्वरुपात केली जाते.
  इतर नातेवाईक ,भाऊबंद, पाहुणे मंडळी हे नवरदेव व नवरीला यथाशक्ती  पैसे,भांडे इत्यादी भेट देतात यास मुंदी असे म्हणतात.
 ६)मोलटी :
   आदिवासी कोकणी कोकणा समाजात लग्न झाल्यावर मुलीची मोळटी (वाळणा)  केली जाते. अर्थात मुलीला नव-नवीन सासरी एकदमच राहायला अडचण होऊ नये किंवा हळूहळू सवय व्हावी म्हणून एक-दोन दिवस सासरी पुन्हा माहेरी अशी काहीशी परिक्रमा काही दिवस सुरु असते. याला मोळटी असे म्हणतात. यामध्ये नवरी मुलगी माहेरी अथवा सासरी जात असताना तिच्या डोक्यावर फडकीची गासोडी(गाठोडं) बांधून दिली जाते. यामध्ये गुळ,भाकरी,खोबरे,धनधान्य असते. ज्यामुळे आपल्या मुलीने पोटभर खाऊन निरोगी राहावे असा संदेश दोन्हीकडून दिला जातो. अशी प्रथा इतर समाजात देखील आढळून येते. असे केल्याने नवीन सुनेला सासरी राहण्याची सवय होत जाते आणि काही दिवसाने कायमचे तेथेच रममाण होण्यास मदत होते. शिवाय दोन्हीकडील नातेवाईक मंडळीला देखील पाहुणचार,ओळखी पालखी होण्यास मदत होते.त्याचप्रमाणे दोन्हीकडील मंडळीला एकमेकांना समजून घेण्यास देखील मदत होते.



७)मोह्तीर(पुनर्विवाह)





            श्री.यशवंत  पवार साहेब, उपाध्यक्ष -राज्य उत्पादन शुल्क विभाग ,कोल्हापूर विभाग यांचा लेख ---

 आदिवासी कोकणी समाजातील विसाव्या शतकातील विवाहसोहळ्यातील ठळक वैशिष्टे

       आपल्या आदिवासी कोकणी समाजात विवाहसोहळा पार पाडण्याच्या सर्वसाधारण पद्धतीचा मागोवा घेऊ या,
     याबाबत पूर्वी म्हणजे साधारणतः 30 - 35 वर्षापूर्वी च्या पद्धती आणि आज च्या पद्धतीत बराच मोठा  बदल झालेला आहे, अर्थात बदल हा निसर्गाचा नियम आहे,हे लक्षात घेवून बहुतेकांनी सदरील बदल स्वीकारलेला दिसून येतो.
 
 १) स्थळ बघणे
फार पूर्वी मुलगी बघण्याची पद्धत प्रचलित नव्हती.
प्रथम मुलाच्या मामाची मुलगी उपवर असल्यास प्रस्ताव ठेवला जायचा, याबाबत मुला मुलीच्या आई वडिलांना योग्य वाटल्यास किंवा नातं तुटायला नको म्हणून किंवा  ये जा करण्यास निमित्त राहील या साध्या हिशोबाने मान्यता दिली जायची,
मुलगा किंवा मुलीचा होकार - नकाराचा किंवा पसंतीचा प्रश्नच नसायचा,
मामाची मुलगी नसल्यास किंवा त्या स्थळाची दोन्ही बाजूकडून संमती नसल्यास अन्य नातेवाईकांकडील  स्थळ शोधून मुलाचे आई वडील स्थळ निश्चित करीत असत, अशी सर्व साधारण जुनी पद्धत होती.
 थोडक्यात त्या काळी मुलाचे वडील मुलीचे स्थळ शोधण्याची  पद्धत होती.
त्याकाळी मुलीच्या वडीलांची मुलाच्या वडिलांकडे  शेतीवाडी किंवा  परिस्थिती बरी असावी अशी माफक अपेक्षा असायची,अर्थात त्याकाळी सर्वांचीच परिस्थिती गरिबीचीच (साधारण) होती,

 २)निळा पान
स्थळ निश्चित झाल्यानंतर  मुलाकडील चार लोक मुलीच्या घरी पूर्वी पायी पायी किंवा बसने किंवा बैलगाडीने जाऊन सगाई पक्की करायचे.
कुंकू लावणे     
 * निश्चित केलेल्या दिवशी मुलाकडील 15 ते 20 ज्येष्ठ पुरुष  मंडळी कुंकू लावण्यासाठी 2 ते 3 बैलगाडीने जात असत, त्यावेळी महिला मंडळी किंवा तरुण मुले कुंकू लावायच्या कार्यक्रमाला जात नसत,
* साधारणतः रात्री 8 वाजेच्या दरम्यान कुंकू लावले जायचे,
* नवरी मुलगी फक्त नवरदेवाच्या वडिलांनाच पाणी देण्याची पद्धत होती,     
* त्यावेळी कुंकू लावल्यानंतर उपस्थित सर्व स्त्री पुरुष,मुलांना खाण्याचा पान ,त्याला काथा,चुना लावून,सुपारी देण्याची पद्धत होती,
*त्यानंतर दाळ भात/भगर असे साधे जेवण उपस्थितांना दिले जायचे,
*त्याकाळी कार्यक्रम स्थळी प्रकाशासाठी  दिवाबत्ती चा वापर केला जायचा,  (ठाणेपाडा गावी सन 1983 मध्ये वीज आली)
* घान (सावा) लग्नाच्या आधी दोन चार दिवस आधी नवरी मुलीच्या घरी पोहोच केले जाते.
पत्रावळी बनविणे
*लग्नाच्या 10 ते 15  दिवस आधी दररोज जंगलातून वडाची व पळसाची पाने तोडून आणली जायची आणि लग्नाच्या घरी गल्लीतील पुरुष मंडळी एकत्र जमून दररोज पत्रावळी (पाच पानांची एक) बनवायचे. त्या पत्रावळी चा वापर लग्नात जेवणासाठी  करीत असत.
मांडव पाडणे
 * वाजंत्री (सामळ्या वादक) मंडळी लग्न घरी येऊन दिवसभर जस जसे कार्यक्रम पार पडत त्या प्रसंगानुसार वाजा वाजवीत
असतात.
  * मांडवाच्या दिवशी पायर व जांबुळाची पाने तोडून हिरवा मांडव तयार करीत,त्या मांडवाला सावरची मुख्य बेळ गाडली जाई,
 *मांडवच्या दिवशी तिसऱ्या प्रहरी  घट्या देवाची पूजा करतात,तसेच  आपल्या वाडवडीलांची पूजा केली जाते,दोन दोन महिलांचे गट प्रसंगानुरूप लयबध्द पणे गाणे गात.
खोळ
*जर नवरा मुलगा लहान असताना  आजारातून लवकर बरा होत नसल्यास अन्य समाज बांधवांच्या खोळ (पदर) मध्ये त्याला टाकले जाई आणि त्यात तो बरा होई,  तेव्हापासून तो  मुलगा  त्या खोळ घेतलेल्या दाम्पत्याचा समजला जाई,मग या मांडवाच्या दिवशी त्या  दाम्पत्यांच्या  खोळीतून मुलाला घेतले (खोळी तून मुक्त) जाई,त्या वेळेस त्या दाम्पत्यांना  साडी धोतर देऊन कृतज्ञता व्यक्त केले जाई. त्यानंतर नवरदेवास हळद लावतात.
ज्यान/वऱ्हाड निघणे
 *लग्नाच्या  दिवशी तिसऱ्या प्रहरी नवरदेवाची नातेवाईक,पाहुणे मंडळी भेटी गाठी,गळा भेट घेतात,नवरदेव ज्येष्ठ लोकांच्या पाया पडतो,
*अशाच प्रकारे नवरी मुलीच्या घरी सुध्दा लग्न गावाच्या अंतराचा विचार करून सकाळी किंवा दुपारी नवरी मुलीस वरील पद्धतीने हळद लावतात व गाठी भेटी घेतात,नवरी मुलगी ज्येष्ठ लोकांच्या पाया पडते,
* नवरदेवाच्या गाठी भेटी नंतर नवरदेवास सवासनी सह सजवलेल्या बैलगाडीत बसून गावाच्या शिवारापर्यंत नवरी मुलीला व वऱ्हाड ला घ्यायला जातात.
* वऱ्हाडीत साधारणतः 10 ते 15 बैलगाड्या असायचे,प्रत्येक बैलगाडीत 7 ते 8 महिला,पुरुष,मुले बसायचे,महिला मंडळी प्रसंगानुरूप दोन दोन महिला मिळून गाणे गातात.बैलांना सजवले जायचे आणि कुणाची  बैलगाडी सर्वात पुढे राहील अशी चढाओढ केली जायची.
 टाळी लावणे 
* लग्न मांडवात  टेबल,खुर्च्या लावून त्यावर नवरा व नवरी लग्नासाठी बसत, टेबल खुर्च्या मराठी शाळेतून आणल्या जात, तेव्हा गावातील समाजातील सुशिक्षित व्यक्ती किंवा शाळेचे शिक्षक किंवा न्हावी (राऊत) तोडके मोडके मंगलाष्टके म्हणून  लग्न किंवा टाळी लावत,
  * त्यानंतर जेवणासाठी साधारणतः दाळ भात किंवा भगर असे साधे जेवण असे.
तमाशा       
* जेवणावळी आटोपल्यावर रात्री मनोरंजनासाठी गावातला तमाशा असे,या तमाशात महिलांची भूमिका/ पात्र पुरुष मंडळी वठवित असत, त्याकाळी प्रत्येक गावात अशा प्रकारे छोटासा तमाशा असे, प्रत्येक गावात त्या काळी उत्कृष्ट तबला वादक,नाल वादक, पेटी वादक इत्यादी कलाकार  असायचे,
आहेर देणे
* आहेराची सुरूवात व्याही बाहीचा ओहोटा म्हणून धोतर साडी दिली जायचे,त्यावेळी आहेर घेणारी व्यक्ती  राऊतला व वाजंत्री वाल्यांना दोन पाच रुपये दक्षिणा देण्याची पद्धत होती.
* या मुख्य आहेर नंतर नवरीच्या मामा मामीला मामा जोट, नवरीच्या बहिणीला बहिण साडा, नवरीच्या आजीला आजल साडा,नवरीच्या आईला माय साडा इत्यादी आहेर दिले जाई,
*  त्यानंतर दोन्ही बाजूकडून त्यांच्या नातेवाईकांना धोतर,साडी,फडकी,टॉवेल, सिट अशा स्वरुपाचे आहेर दिली जात.
मुंदी
* त्याकाळी मामा,मावशी, बहिण,भाऊ इत्यादी जवळच्या नातेवाईकाकडून नवरदेव व नवरी यांना गाय,बकरी आंदण दिली जायचे.
 * इतर नातेवाईक ,भाऊबंद, पाहुणे मंडळी हे नवरदेव व नवरीला यथाशक्ती  पैसे (मुंदी) वाजवत असत.
* तसेच नवरदेव, नवरी यांना आपले नातेवाईक ताट,वाटी,ग्लास,तांब्या इत्यादी संसारोपयोगी भांडी भेट म्हणून देत असत,
मिष्टान्न जेवण
* आहेर आटोपल्यावर वऱ्हाड मंडळींना गव्हाची चपाती, खीर किंवा गोड दाळ (चवळी किंवा उडीद)  जेवण दिले जाई.
समारोप
* अशा रीतीने लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यावर नवरी मुलगी सर्व नातेवाईकांच्या पाया पडते,
* तसेच पाहुणे मंडळी एकमेकांच्या वयोमानाप्रमाणे गळाभेट किंवा पाया पडत,त्यानंतर नवरी आपल्या वऱ्हाड सोबत आपल्या गावी जात असे.
* त्यानंतर च्या दिवशी मोटी किंवा वाळणा होई.
       अशा प्रकारे साधारणतः तीन दिवस  मांडव,टाळी, बारसिंग सोडणे, मोटी या चार दिवसांचा भरगच्च लग्नाचा कार्यक्रम/ लग्नसोहळा आनंदात पार पडत असे.
 * नंदुरबार,धुळे जिल्ह्यात लग्न सोहळा आजही मुलाच्या घरी करण्याची पद्धत आहे.
* पूर्वी जर लग्न मुलीच्या घरी लावायचे मुलीच्या वडिलांनी आग्रह धरला तर मुलीच्या घरी लग्न लाऊन पुन्हा नवरदेवाच्या घरी लग्नाच्या नंतरचे बारसिंग सोडणे इत्यादी समारंभ नवरदेवाच्या घरी केले जायचे,या लग्न सोहळ्याला वायता म्हटले जायचे,
* लग्न आटोपल्यावरही काही दिवस लग्न घर परिसरात संबळ( वाजा) वाद्याचा आवाज कानी गुंजत असे.
           ---------------------------
थोडसं, एकविसाव्या शतकातील बदललेल्या लग्नसोहळा ची ठळक वैशिष्ट्ये
*मुलींच्या वडिलांना वर शोधावे लागते किंवा मध्यस्थांमार्फत प्रथम प्रस्ताव ठेवावा लागतो.
*मुलामुलीची पसंती आवश्यक असते.
*निळा पान कार्यक्रमाला पाहुण्यांचा सहभाग जास्त वाढला.
*लग्न समारंभासाठी मुलाच्या वडिलांना मुलीच्या वडीलाने आर्थिक मदत करण्याची पद्धत रूढ झाली.
*कुंकू लावणे या पद्धतीला साखरपुड्याचे नामाभिधान मिळाले.
*कुंकू लावण्याची वेळ संध्याकाळ ऐवजी दुपारी निश्चित झाली.
* लग्नाचा व साखरपुड्याचा बडेजाव वाढला.
*नवरदेवास  नारळ टोपी ची पद्धत नव्याने सुरू झाली.
* मुलीचे वडील व  काका हे सर्व जण नवरदेवास नारळ,टोपी,शर्ट,पँट,टॉवेल देण्याची पद्धत सुरू झाली.
* नवरी मुलगी साखरपुड्यात नवरदेव मुलाच्या वडिलांना व त्यांच्या सर्व काकांना पाणी (थंड पेय) देण्याची पद्धत सुरू झाली.
*साखरपुड्याला महिला,तरुण मुले मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला.
*साखरपुड्यात नवरदेव मुलाच्या आई,काकू,मावशी इत्यादींना साडी देण्याची नवीन पद्धत रुढ झाली.
*नवरदेव,नवरी एकमेकांना अंगठी  घालण्याची पद्धत सुरू झाली.
* लग्नात व साखरपुड्यात मिष्टान्न भोजन देण्याची पद्धत रूढ झाली.
*मांडव पाडणे,हळद लावणे,पित्रा आळणे इत्यादी काही पद्धती आजही टिकून आहे,
*हळदीच्या रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत डिजे
बँडबाज्यावर तरुणांचे नाचण्याची पद्धत रूढ झाली.
* लग्नात संबळ वादक/ वाजंत्री कमी होत आहेत, महागडी डीजे बँडबाजा आणण्याची पद्धत रूढ झाली.
* साखरपुडा व लग्नातील महिलांची जुनी गाणी लोप पावत चालली आहेत.
* विवाह सोहळ्यात पाहुण्यांचा सत्कार समारंभ  व फेटे  पद्धत सुरू झाली.
* मोटी पद्धत बंद किंवा कमी होत चालली.
*शहरातील मंगल कार्यालयात लग्न सोहळ्याची पद्धत नुकतीच सुरू झाली.

     अशा प्रकारे आपल्या आदिवासी कोकणी समाजातील विवाह सोहळ्यात काल आणि आजच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, यातील काही अनिष्ट प्रथा आपल्या काही सामाजिक संघटना प्रबोधन व जागृती करून बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत,त्याला काही प्रमाणात यश मिळताना दिसून येत आहे.
     
    धन्यवाद.......
       
           सौजन्य - यशवंत मंगा पवार

            मु.पो. ठाणेपाडा ता. जि.नंदुरबार




 🔺🔺थेट ऑनलाईन माहिती लिहीत असल्यामुळे आणि पुनर्तपासणी न केल्यामुळे व्याकरण दृष्ट्या वाक्यरचनेत दोष असू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.