माहिती update करणे सुरु आहे
कथा डोंगऱ्यादेवाची निसर्गपुजक आदिवासी संस्कृतीची...
---------------------------------------------
भारतीय लोकजीवनात कामना सिद्धीचे व्रते भरपूर आहेत परंतु भारतीय लोक जिवनाचे एक अंग असलेल्या आदिवासी जमातीमधे अशी काही व्रते आहेत की, ती आचरण करण्यास अतिशय अवघड आहेत.मात्र तरीसुध्दा पुर्वजांची परंपरा ,सतत पुढे चालत रहावी,आदिवासी संस्कृतीचे सवंर्धन व्हावे
म्हणून आजचा सुशिक्षित आदिवासी सूध्दा ही व्रते अगदी काटेकोरपणे तितक्याच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करीत आहे आदिवासींच्या काही व्रतांपैकी 'डोंगऱ्यादेव ' या व्रताचे महत्व विशेध करणारा हा लेख..
--------------------------------------------
उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात ,डोंगराच्या कुशित राहणाऱ्या आदिवासींचे जिवन म्हणजे एक प्रकारची खडतर तपश्चर्याच.जिवन संघर्षाच्या वाटचालीत परंपरागत चालत असलेल्या सामुदायिक उत्सवांना , व्रतांना अंत:करणा पासून जपण्याचे काम आदिवासी समाज आजही मनोभावे करीत आहे.डोंगऱ्यादेव हे आदिवासींचे अतिशय खडतर व तितकेच महत्वाचे व्रत मानले जाते.हे व्रत आदिवासींच्या विविध जातीपैकी प्रामुख्याने कोकणा , महादेवकोळी भिल्ल , वारली , पावरा , मावची आदी जमातीचे लोक मोठया प्रमाणात साजरा करतात.
डोंगऱ्यादेव हे व्रत सामुदायिक रित्या पार पाडणारे नाशिक जिल्ह्यातील कळवण , पेठ , सुरगाणा , बागलान , दिंडोरी , ईगतपूरी , व त्रंबकेश्वर, धुळे जिल्ह्यातील साक्री तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व नवापूर या आदिवासी तालुक्यांमध्ये सालाबादा प्रमाणे साजरा केला जातो. प्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगऱ्यादेव हे व्रत तिन किंवा पाच वर्षांनी पाळतात.नियोजित वर्षाच्या मकशी म्हणजे मार्गशिर्ष महिण्याच्या अमावस्येला हे व्रत सुरु होते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते.साधारणतः पंधरा दिवस पाळले जाणारे हे व्रत आदिवासी अलीकडे आठ दिवस पाळतात.ज्या गावात हे व्रत असते त्या गावातील आदिवासी या व्रताची महीणाभरा पासून तयारी करतात. सुरवातीला दवंडी देऊन गाव जमा करतात. प्रत्येक घरातून लोकवर्गणी निश्चित केली जाते आणि आपापल्या सगे सोयरे , नातेवाईकाना मुळ (आमंत्रण) धाडले जाते,लोकवर्गणी जमा झाल्यानंतर, व्रतासाठी आवश्यक असलेल्या लाल बोकड ,लाल कोंबडा ,लाल कोंबडी, काळी पाठ (बकरी) मेंढा,फिरंग्या कोंबडा ,धवळा कोंबडा आदी वस्तुंची जमवा जमव करतात.
---------------------------------------------
भारतीय लोकजीवनात कामना सिद्धीचे व्रते भरपूर आहेत परंतु भारतीय लोक जिवनाचे एक अंग असलेल्या आदिवासी जमातीमधे अशी काही व्रते आहेत की, ती आचरण करण्यास अतिशय अवघड आहेत.मात्र तरीसुध्दा पुर्वजांची परंपरा ,सतत पुढे चालत रहावी,आदिवासी संस्कृतीचे सवंर्धन व्हावे
म्हणून आजचा सुशिक्षित आदिवासी सूध्दा ही व्रते अगदी काटेकोरपणे तितक्याच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करीत आहे आदिवासींच्या काही व्रतांपैकी 'डोंगऱ्यादेव ' या व्रताचे महत्व विशेध करणारा हा लेख..
--------------------------------------------
उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात ,डोंगराच्या कुशित राहणाऱ्या आदिवासींचे जिवन म्हणजे एक प्रकारची खडतर तपश्चर्याच.जिवन संघर्षाच्या वाटचालीत परंपरागत चालत असलेल्या सामुदायिक उत्सवांना , व्रतांना अंत:करणा पासून जपण्याचे काम आदिवासी समाज आजही मनोभावे करीत आहे.डोंगऱ्यादेव हे आदिवासींचे अतिशय खडतर व तितकेच महत्वाचे व्रत मानले जाते.हे व्रत आदिवासींच्या विविध जातीपैकी प्रामुख्याने कोकणा , महादेवकोळी भिल्ल , वारली , पावरा , मावची आदी जमातीचे लोक मोठया प्रमाणात साजरा करतात.
डोंगऱ्यादेव हे व्रत सामुदायिक रित्या पार पाडणारे नाशिक जिल्ह्यातील कळवण , पेठ , सुरगाणा , बागलान , दिंडोरी , ईगतपूरी , व त्रंबकेश्वर, धुळे जिल्ह्यातील साक्री तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व नवापूर या आदिवासी तालुक्यांमध्ये सालाबादा प्रमाणे साजरा केला जातो. प्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगऱ्यादेव हे व्रत तिन किंवा पाच वर्षांनी पाळतात.नियोजित वर्षाच्या मकशी म्हणजे मार्गशिर्ष महिण्याच्या अमावस्येला हे व्रत सुरु होते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते.साधारणतः पंधरा दिवस पाळले जाणारे हे व्रत आदिवासी अलीकडे आठ दिवस पाळतात.ज्या गावात हे व्रत असते त्या गावातील आदिवासी या व्रताची महीणाभरा पासून तयारी करतात. सुरवातीला दवंडी देऊन गाव जमा करतात. प्रत्येक घरातून लोकवर्गणी निश्चित केली जाते आणि आपापल्या सगे सोयरे , नातेवाईकाना मुळ (आमंत्रण) धाडले जाते,लोकवर्गणी जमा झाल्यानंतर, व्रतासाठी आवश्यक असलेल्या लाल बोकड ,लाल कोंबडा ,लाल कोंबडी, काळी पाठ (बकरी) मेंढा,फिरंग्या कोंबडा ,धवळा कोंबडा आदी वस्तुंची जमवा जमव करतात.
व्रताच्या पहिल्या दिवशी व्रत घेणारे सर्व लोक आणि पाच माऊल्या कन्सरा, वाघंब्रा, झेलाशेवर,फुलाशेवर,ताराशेवर यांना उपवासी ठेवले जाते. सायंकाळी सर्व स्नान करून आपल्या गावाच्या रितीरीवाजा प्रमाणे गावातील पाटलाच्या घरी अथवा मंदिरा समोर जमा होतात.येथे गावचा पाटील , भगत , मुधानी (मुख्य माऊली) खुट्या (डोंगऱ्यादेवाचा प्रमुख) पावरकर , कथकरी यांच्या हस्ते थोंब ठोकले जाते.वेळूच्या काठी भोवती, मुळासकट उपटलेली झेंडूची झाडे,देवअंबाडी , ऊस , देवकरडू ,ही झाडे अर्धीवर राहतील अशा तऱ्हेने रोवतात त्याच्याभोवती खुळखुळ्याची काठी मोरपिसांचा कुच्चा ,पावरी (वाळलेल्या भोपळ्या पासून बनविलेले एक वादय)ठेवतात. या व्रताची परिपूर्ण माहीती असलेला भगत येथे सव्वाशे पुंजा टाकून थोंबाची पूजा करतो.पुजा अर्चा आटोपल्यावर भगत डोंगऱ्यादेवाच्या कथेस प्रारंभ करतो.ही कथा (कासाचे ताटात कोताई मेन लाउन त्यावर भानसऱ्या सर (जंगलातील एका झाडाची काडी )उभा करतात.तो सर दोन्ही हाताच्या बोटाने हळूवार ओढल्यास त्याचे कंपन होउन , तिचा अतिशय मधूर असा सुर निघतो ,त्याच्या सुरात सुर मिसळून गायीली जाते.भगत सुरवातीला पाच नमन म्हणून कथेस प्रारंभ करतो, झिलक्या त्याला साथ देतो.या कथेतून डोंगऱ्यादेवांच्या सर्व माऊल्या , भूतांची नावे घेताच व्रत घेतलेल्या लोकांच्या अंगात हवा येते , वारे संचारते आणि सुड उठून सर्व माऊल्या, भूत घुमू लागतात. व्रत घेतलेल्या लोकांच्या समूहाला ' माऊल्या किंवा भाया ' अशी संज्ञा आहे.या कालावधीत व्रतस्तांना नावाने हाक मारत नाहीत.फक्त ' माऊली 'म्हणून हाक मारतात.
पहिल्या दिवशी मंदिरासमोर किंवा पाटलाच्या घरासमोर देव खेळविल्यानंतर त्याच रात्री मुधानी माऊली तेथून थोंब हालविते.आणि सर्वांना घेऊन गावातील 'चोखीखळीवर येते. मुधानीने दर्शविलेल्या ठिकाणी थोंब ठेवला जातो.या जागेस मठ किवा मकान असे म्हणतात. दरम्यान उपाशी असलेल्या माऊल्या उपवास सोडतात.रात्री पुन्हा व्रत घेतलेल्या माऊल्या गोल रिंगन करून थोंबा भोवती बसतात.भगत कथकरी पुन्हा कथेस प्रारंभ करतो.पाच नमन म्हणून समुद्र किनाऱ्यापासुन -केमच्या डोंगरापर्यंत सर्व डोंगऱ्यादेवांच्या गडांचा उल्लेख करतो.गावाच्या शिवारातल्या म्हसोबा ,भौऱ्याभूत,नागदेव , वाघदेव, आग्यादेव , गाऱ्यादेव , हिरवा देव , रानदेव, पायऱ्याची कन्सरा, धानीच्या सर्व माऊंल्या , च्या नावाने आरोळी ठोकताच सुड उठतो. थोंबाभोवती बसलेल्या सर्व माऊल्या घूमू लागतात.प्रत्येक माउली आपल्या डोंगऱ्यादेवांच्या गडाच्या तथा गौळाच्या दिशेने तोंड करून शेला धरतात (हात जोडतात)
खुट्या हातात खुळखुळ्याची काठी घेऊन , कमरेला असलेला गौरीसाठ (अंबाडीच्या तागा पासुन विनलेला खाकडा) जोरात फटकावतो, आणि " तो पायऱ्यांना.... भुत रे..असे म्हणताच सर्व माऊल्या , भुत एकच टाहो फोडतात व घूमायला लागतात,यानंतर सर्व माऊल्यांसह , ग्रामस्थ थोंबाभोवती गोल फिरत नाचु , गाऊ लागतात.
सावऱ्या माळीवर कोण
गायी चारे , चारे व
सावऱ्या माळीवर
उन्ह्या गायी चारे, चारे व
खडकाच्या टपावरी
कोण पावा वाजे,वाजे व
खडकाच्या टपावरी
उन्ह्या पावा वाजे वाजे व ..
दुधामे तळ्यावरी ..
कोण गायी पाजे, पाजे व.
दुधामे तळ्यावरी...
उन्ह्या गायी पाजे ,पाजे व..
अशी विविध गाणी गाऊन, नाचून, पहिल्या दिवशी मोठया उत्साहात जागरण केली जाते.
हे व्रत आदिवासींच्या दृष्टीने अतिशय खडतर व्रत असून, या व्रतात अनेक प्रकारची बंधने आहेत.भायांनी तथा माऊंल्यानी या सात दिवसाच्या कालावधीत मठातच मुक्काम करावयाचा असतो.स्वतःच्या घरी सुध्दा जायचे नाही.व्रत काळात दारू व मासांहार करायचे नसते.भात , गहूची चपाती ,गोडेतेल,हळद खायचे नाही.फक्त नागलीची भाकरी , भगर , दाळ खायची असते. माऊंल्यानी मठातच भोजन करायचे, चप्पल चामड्याची वस्तू वापरायची नाही.स्रीसंगत पुर्णपणे वर्ज असते.
दुसऱ्या दिवसा पासून रोज माऊल्या शेज,कमारी मागण्या साठी बाहेरगावी, जवळपासच्या वस्ती पाडयावर जातात.यावेळी आदिवासी स्रिंया दिव्याचे ताट करून माऊंल्याना ओवाळतात आणि नागलीचे पिठ ,भात , बाजरी , लाल मिर्ची आदिच्या स्वरुपातील शेज,कमारी बरकत्या बोवाच्या झोळीत टाकतात . यावेळी बरकत्या बोवा , धन धान्यांची बरकता लाभु दे...गायी गुराना लक्ष्मीला सुख शांती लाभू दे...असे आशिर्वाद देतो. आदिवासी आदराने सर्व माऊल्यांना आपल्या घरात , गोठयात बोलावून मक्याच्या फुल्या , कोंडी, भाजलेल्या भुईमुंगाच्या शेंगा,डांगर फराळ म्हणून खाऊ घालतात.
सायंकाळी माऊल्या गाव मागून परत मठावर आल्यावर , कमारीच्या धान्यातून स्वंयपाक बनवितात आणि उपवास सोडतात, पुन्हा पहिल्या दिवसा प्रमाने व्रतास सुरवात होते. अशाप्रकारे सलग सात दिवस डोंगऱ्यादेवांची ही दिनचर्या अंखडीत सुरू राहते.
सातव्या दिवशी सायंकाळी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला गावातील चोखीखळी ढाळली जाते.भगत मठावरील थोंबाची विधीवत पूजा करून थोंब उपटतो.त्यांच्या सोबत व्रतात सामिल असलेल्या सर्व माऊल्या ,भाया , अबाल वृद्ध , ग्रामस्थ, डोंगऱ्यादेवाचे गाणे म्हणत , गड घेण्यासाठी गौळाच्या दिशेने रवाना होतात. रात्री गडाच्या (गौळाच्या) पायथ्याशी मुक्काम ठोकतात.या जागेला ' रानखळी ' असे म्हणतात.तेथे पुन्हा थोंब रोवला जातो.दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ, भगत , मुधानी गौळा जवळ जातात,तेथे स्वच्छता , सारवण करतात.पाच आरत्या , महादऱ्या (मोठा दगडी दिवा) अगरबत्ती लावतात.गौळाच्या गुहेसमोर कोरा शेला (उपरणे) धरतात.तेथे भगत कन्सरा (नागली) तांदूळाच्या सव्वाशे पूंजा टाकतो.संपुर्ण पुजा अर्चा झाल्यावर भगत मोठयाने पाच वेळा लक्ष्मीच्या नावाने 'लक्ष्मे, असा आवाज देताच ,खाली रानखळीवर थोंबाभोवती बसलेल्या माऊल्या ,भायांचा सुड उठतो (अंगात येते) आणि सर्व माऊल्या घुमू लागतात , गाणे म्हणून नाचू लागतात.
(या गाण्याची प्रत्येक ओळ दोन वेळा गातात)
शिटीना पावा वाजे रे ,महादेव रे
शेंदोडनी हवा भारी रे,महादेव रे
शिटीना पावा वाजे रे,महादेव रे
कन्साऱ्यानी हवाभारीरे महादेव रे
शिटीना पावा वाजे रे महादेव रे
भुयारनी हवा भारी रे ,महादेव रे
शिटीना पावा वाजे रे,महादेव रे
मांडव्यानी हवा भारी रे महादेव रे
शिटीना पावा वाजे रे,महादेव रे
पायऱ्यांनी हवा भारी रे ,महादेव रे
शिटीना पावा वाजे रे ,महादेव रे
या अशा अनेक प्रकरच्या डोंगऱ्यादेवांच्या नावांची गाणी गायीली जातात.
या दिवशी मात्र सर्व माऊल्या पहाटे पाच वाजताच नेहमी प्रमाने नदीवर जाऊन स्नान करतात. त्यानंतर प्रत्येक माऊलीच्या कमरेला कोरा शेल्याची (ऊपरण्याची ) ओटी बांधली जाते. ओटीत डाळी पोहे , नारळ बांधतात. सर्व माऊल्या झुंज्यामुंज्यालाच गडावर चढून गौळाजवळ जातात.तेथे गौळाजवळ एक कोरा शेला आडवा बांधलेला असतो,तो ओलांडून सर्व माऊल्या ओटीतील डाळी पोहे वाहतात दर्शन घेतात आणि " हे डोंगऱ्यादेवा, सालाबादा प्रमाणे आम्ही आज तुझ्या दर्शनाला आलो आहोत, तूझा खाना बोना तुला अर्पन करीत आहोत, तरी आमच्या लक्ष्मीला (गायी गुरे ढोरे ) आम्हाला ,आमच्या मुला बाळांणा आमच्या गावाला सुखी ठेव आमच्या शेती बाडीत धान्याला बरकत येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करतात.
भगत या जागी लाल कोंबडा जिवंत सोडतो तर लाल बोकडाला फक्त मानवतो येथे मात्र बोकड बळी दिला जात नाही.काही ठिकानचे डोंगऱ्यादेवाचे गौळ डोंगराच्या अत्यंत अवघड कपारीत,गुहेत आहेत.अशा गौळात घूसणे म्हणजे एक प्रकारे दिव्य परिक्षाच असते.परंतु या कालावधीत गौळात घूसने माऊल्यांना फारसे अवघड नसते.काही गौळांचे द्वार इतर दिवसांपेक्षा या दिवशी आकाराने मोठे होत असल्याचे सांगतात.ही सुध्दा एक प्रकारे डोंगऱ्यादेवांचीच कृपा आहे अशी आदिवासींची श्रद्धा आहे. माऊल्यांचे दर्शन झाल्यानंतर ओटीसोबत घेतलेला नारळ येथे गौळाला हळूच ठोकतात,फोडत नाही.
येथील पूजा आटोपल्यावर सर्व माऊल्या आपल्या गाव वस्ती जवळील धानीवर (स्थानी) येतात.भगत येथे स्वच्छता सारवण करुन धानीला शेंदूर लावतो.या जागेवर सुध्दा तांदूळ कन्सराच्या सव्वाशे पूंजा टाकल्या जातात.हा या व्रताचा समाप्तीचा दिवस असल्याने येथे आदिवासी महीला ,अबाल वृद्ध , पाहूणे रावळे , सगे सोयरे मोठया संख्येने उपस्थित राहतात. नेहमी प्रमाणे धानीवरही कथा लाऊन सुड उठविला जातो.थोडे नाचगाणे झाली की गावातील पाच पंच , भगत , मुधानी , खूटया शेज वाळतात, भगत झेंडूची पाच फुले हातात धरून माऊल्यांना (आपापला वारा) फुले जिंकायला लावतो.या नंतर माऊल्यांच्या अंगातील वारे मोडले जाते.धानीजवळ कोरा शेला अंथरुन सर्व माऊल्या प्रत्येकी एक ओंजळ या प्रमाणे कमारी(नागली) घालतात.त्या कमारीचे धानीवर जमलेल्या सर्व ग्रामस्थांना प्रसाद म्हणून वाटप करतात. या जागेवर आदिवासी लोक ,महीला विविध प्रकारचे नवस करतात , फेडतात. मुलबाळ संतती होत नसलेल्या महिलांना डोंगऱ्यादेवाला केलेल्या नवसातुन संतती झाल्याची आदिवासींची श्रद्धा आहे.
व्रत घेतलेल्यांचे अंगातील वारे नष्ट व्हावे म्हणून आपापल्या वाऱ्यानुसार बोकड , कोंबडयाचा बळी दिला जातो.गौळाला मान देऊन आनलेला लाल बोकड , कोंबडा धानीवर बळी देतात. शिवारातील रानवा देवाला धवळा कोंबडा जिवंत सोडतात. भौऱ्याभूत - खैरा कोंबडा,गाव माऊल्या - लाल कोंबडा , लाल कोंबडी , काळभूत- लाल कोंबडा, म्हसोबा फिरंग्या कोंबडा ,हिरवा देव - काळी पाठ(बकरी) आदी वस्तूंचा बळी देण्याचा कार्यक्रम होतो.लोकवर्गणीतून खरेदी केलेल्या सर्व बोकडांना बळी देऊन रात्री सर्व गावाला गाव जेवण दिले जाते .याला भंडारा असे म्हणतात.
दुसऱ्या दिवशी वाडी वस्तीवरुन मागितलेल्या कमारीचे ,नारळ प्रसादाचे सर्वाना वाटप करून टोप्या घालण्याचा कार्यक्रम होतो.अशाप्रकारे आदिवासींच्या डोंगऱ्यादेवाच्या व्रताची सांगता होते.
----------------------------------------------
" आमच्या आदिवासी लोकांची वस्ती प्रामुख्याने अती दुर्गम भागात ,जंगलात ,डोंगर दऱ्यात आढळते.आम्ही शेती व मजूरी करतो.आमचा जोडधंदा गायी, गुरेढोरे , बकऱ्या ,कोंबडया पाळून उदारनिर्वाह करणे हा होय.आणि हीच खरी आमची संपत्ती आहे. ही जनावरे म्हणजे आमची लक्ष्मी आहे.चारा पाण्यासाठी ती सतत डोंगर दऱ्यात भटकत असतात. त्यांचे जंगलातील हिंस्रपशु पासून, डोंगरात वास्तव्य असलेल्या आमच्या देव देवतांपासून संरक्षण व्हावे या मुख्य उद्देशाने आदिवासी डोंगऱ्यादेवाची आराधना,व्रत करतात.त्या वंशपरंपरे नुसार आम्ही सुशिक्षित आदिवासी देखील हे व्रत अत्यंत निष्ठेने व मनोभावे करीत आहोत
सौजन्य.श्री.डी. एम. गायकवाड
अध्यक्ष
कळवण तालुका आदिवासी संस्कृती संवर्धन समिती
9423934242 / 9922360775
वर्तमानपत्रातील काही बातम्या
चैतन्याचे वातावरण : 'थोम' मांडणीनंतर होते पूजन
डोंगर्यादेव उत्सवाची उत्साहात सांगता | ||
■ प्रत्येकाच्या अंगणात दगडी दिवा लावून हातात तांदूळ घेतले जातात आणि ते धरतीला अर्पण केले जातात. निसर्गातील डोंगर, दर्या-खोरे, नदी-नाले, पशू-पक्षी यांच्या नावाने तांदळाची पूजा करून धरतीला आवाहन केले जाते.
■ निसर्गाची कोणावर अवकृपा आणि संकट येऊ नये यासाठी कोंबडीची अंडी, लिंबू, नारळाची ओवाळणी करून निसर्गातील देवदेवतांसह पहाड, पर्वत आणि पशू-पक्ष्यांना आवाहन करून देवखळीवर आमंत्रित करण्यात येते. नंदुरबार :आदिवासी समाजात सुखसमृध्दी नांदावी, सर्वांचे कल्याण व्हावे यासाठी प्रत्येक कुटुंबातील प्रमुख व्यक्तीतर्फे डोंगर्यादेव माऊलीची पूजा करण्यात येते. निसर्ग पूजन करून नुकताच पारंपरिक उत्सव साजरा करण्यात आला. यामुळे ग्रामीण भागात चैतन्याचे वातावरण संचारले होते. गावापासून काही अंतरावर असलेल्या डोगरावर जाऊन आदिवासी समाज डोंगर्यादेव माऊलीची पूजा करण्यात येते. पूजन करणार्या भक्ताला शेवर्या माऊली, मुद्यामी माऊली असे संबोधले जाते. यांच्या हातून पूजेची मांडणी केली जाते त्यास 'थोम' असे म्हटले जाते. पूजेच्या आधी घरातील प्रमुख व्यक्ती परिसराची साफसफाई करतो आणि अंगणात शेणाचा सडा टाकतो. उत्सवात पुजारी गाणे गातो तर त्याचे साथीदार पारंपरिक वाद्य वाजवतात. यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य संचारते. पूजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अग्नी पेटविली जाते आणि तिची पूजा करण्यात आली. देवखळीला पुजारी आणि भोप्या अग्नीची प्रदक्षिणा घालतात. अग्नीत तुळस आणि झेंडूची फुले टाकण्यात येतात. त्याचा सुगंध सर्वदूर दरवळत राहतो. सुगंधी आणि पारंपरिक वाद्याच्या आणि पावरीच्या तालावर सर्व जण ठेका धरून पारंपरिक नृत्य करतात. काहींनी रूपकलेच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. टापरा माऊलीची पूजा अग्नीवर नियत्रंण मिळविण्यासाठी टापरा गवत, तुळस आणि झेंडूची फुले आणि काड्या लावून टोपी तयार करण्यात येते. हातात बांबूची अडीच फुटाची काठी आणि चिरक्या धरल्या जातात. यालाच 'टापरादेवी' म्हटले जाते. पूजेनंतर सर्वजण गावात येतात आणि घरोघरी जाऊन पीठ, मिरची, तेल आणि धान्य गोळा करतात. मिळालेल्या वस्तुंपासून भंडारा तयार करण्यात येतो. देवखळीजवळ समाज बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक भोजन केले. नाचणी, बाजरी, ज्वारी, मक्याचे पीठ शितमाऊल्या आणि डोंगर्यादेव निसर्ग पूजनासाठी सर्वजण रवाना झाले. निसर्गाच्या सान्निध्यात रानखळीवर नवसपूर्तीच्या गावगडाच्या दरबारात पूजा मांडणी करून त्याठिकाणी पीठाचा दिवा लावण्यात आला. पोर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात आदिवासी बांधवांनी गाणी म्हणत नृत्य केले. निसर्गाला प्रसन्न करून सर्व माऊल्या हजर होतात. उत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याने निसर्गदेवतेला नारळ अर्पण करण्यात आले. जमीन, अग्नी, पाणी आणि अन्नाचा नैवेद्य निसर्गाला अर्पण करण्यात आला. मानव व निसर्गातील जीवनसृष्टीच्या कल्याणसाठी आदिवासी समाज १५ दिवसांचा तप करतो. सर्वांना सुखाने आणि समाधानाने जगण्याची प्रेरणा मिळावी यासाठी o्रम करून समूहाने निसर्गाची पूजा करतात. निसर्गाची पूजा हाच धर्म समजून निसर्ग कुलदैवत डोंगर्यादेव उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. डोंगर्यादेव उत्सवानिमित्त वाघाळे, ता.नंदुरबार येथे विविध देवदेवतांच्या अवताराची वेशभुषा करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक कार्यक्रमस्थळी आल्यानंतर त्यांची पूजा करताना महिला.
सौजन्य - सदर लेख दैनिक लोकमत या वृत्तपत्रातील आहे .१६/११/२०१६ |
Document Collect all songs
उत्तर द्याहटवा