Ads Area

(Google Ads)

डोंगऱ्या देव उत्सव व गड

 

सदर ब्लॉग आदिवासी कोकणी,कोकणा  समाजाची ओळख आणि सामाजिक परंपरांचा परिचय करून देण्यासाठी तयार करण्यात आला  आहे.त्याचप्रमाणे जुन्या रूढी ,परंपरांची जतन करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.ब्लॉगमध्ये पिंपळनेर परिसरातील सामाजिक परंपरांचा प्रभाव प्रामुख्याने दिसून येईल.

आदिवासी कोकणी कोकणा समाजाचे डोंगऱ्या देव उत्सव :- 

   
      

आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या गावात व डोंगऱ्यादेवाचा कार्यक्रम सुरु असताना. गावातील लोकांचे नवसपूर्ती झालेल्या कुटूंबातील घरधरनी डोंगऱ्यादेव पूजाविधी मांडतात.
या कार्यक्रमात  गाव मंडळीसह शेवऱ्यामाऊली तसेच शितमाऊलीच्या साहाय्याने देवखळीत पावरीच्या मधुर सुरांवर पायांचा ठेका धरून हाताने टाळ्यांच्या गजरासह निसर्गदेवतेची गौरवगाथा, गाणी/वळती गायीली जातात. दिवाळीच्या चंद्रदर्शनानंतर आदिवासी गावात डोंगऱ्या देवाच्या कार्यक्रमामुळे गावागावात हर्षउलहासाने वातावरण बाहरलेले आहे.

     आदिवासी भागात डोंगऱ्यादेवाचा कार्यक्रम कार्तिक किंवा मार्गशीर्ष(नोव्हेंबर आणि डिसेंबर) महिन्यात चंद्रदर्शनानंतर निसर्गदेवता डोंगऱ्यादेवाला बोललेले नवस फेडण्यासाठी नवसपूर्ती किंवा डोंगऱ्यादेवाच्या कृपेने वैभव प्राप्त झालेले कुटुंब डोंगऱ्यादेवाची पूजा शेवऱ्यामाऊली(पुजारी) च्या मंत्रोच्चाराने भोपामाऊली(देवाचा सेवक)डवरीमाऊली(पावरकर)व गावकरी मंडळींच्या साक्षीने मांडत असतात. घरधनी माऊली आपल्या घराचे अंगण गोमूत्र व शेणाने सारवतात. त्या देवखळीवर(अंगणात) दररोज रात्री माऊल्या डोंगऱ्यादेवाच्या वळत्यां(गाण्यां) मध्ये विविध आदिवासी देवतांचे वर्णन, गौरव गात फेर धरून एका ताला सुरात नाचत असतात. वळतीची प्रत्येक ओळ बदलली की नाचाचा प्रकारसुद्धा बदलत असतो. अशाप्रकारे रोजच घरधनी माऊलीमुळे  गावात आनंदाला उधाण आलेला असतो. त्यामुळे प्रत्येक माऊली घरधनी माऊलीची देवखळी जागविण्याचा प्रयत्न करीत असते. या उत्सवाच्या काळात देवखळीवर येणारी पुरुष मंडळी एकमेकांना भेटल्यावर "शितमाऊली" असे म्हणून देवाला स्मरुन एकमेकांना नमस्कार करतात. देवाच्या जागरणाचा कार्यक्रम साधारणतः चंन्द्रदर्शन ते पौर्णिमेपर्यंत सुरु असतो. यात प्रमुख्याने १४ व्या दिवशी गडावर जाऊन देवाची पुजा मांडली जाते. या दिवशी रात्री सर्व माऊल्या निसर्गच्या सानिध्यात राहून निसर्गदेवता डोंगऱ्यादेवाचा जागरण करीत असतात. याच रात्री पौर्णिमेच्या संपूर्ण चंद्राचे शीतल किरण अंगावर घेत देवाच्या वळत्या गात डोंगऱ्यादेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्व माऊल्या नाचण्यात दंग झालेले असतात. पौर्णिमेला सुरूवात झाल्यावर डोंगरच्या कडा-कपारीत देवाची पुजा मांडून दिवा लावून या निसर्गदेवतेला आव्हाहन करून निसर्गाने आम्हाला साथ द्यवी. या जीवसृष्टीतील चिडी-मुंगी, पशु-पक्षी व मानवलोकांचे कल्याण व्हावे अशी विनवणी करून शेवऱ्या माऊली प्रार्थना करीत असते. पहाटेला सर्व माऊल्या गडाला(कडकपारीच्या डोंगरदेवाला/डोंगऱ्यादेवाला) जाऊन कडाकपारीला नारळाने ठोकून देवाला दर्शन देण्यासाठी एकप्रकारे साद(साकड) घालीत असतात. त्यानंतर सर्व माऊल्या घरधनीच्या घरी परतात. त्यांच्या स्वागतासाठी गावातील वरिष्ठ मंडळीसह महिला व अबालवृद्ध वाट पहात असतात. माऊल्या घरी आल्यानंतर देवाला कोंबडा बोकडाचा मान दिला जातो. व संध्याकाळी गावजेवणाचा भांडारा केला जातो. 


आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या डोंगर्यादेव उत्सवातील विविध गड (बार ) पुंजले जातात. जवळपास प्रत्येक गावाच्या आसपास डोंगऱ्या देवाचे स्थानक असणारे ठिकाण असतेच. अशा गडांची  नावे पुढीलप्रमाणे :
  1.  कंसऱ्या गड ता.आहवा जि. डांग (गुजरात राज्य)                                                                                                              हे देवस्थान गुजरात राज्यातीळ अहवा डांग जिल्यात असून पिंपळनेर -सुबीर नवापूर रोडावर शेंदऱ्याआंबा या गावापासून सुमारे ३-४ किमी अंतरावर अत्यंत घनदाट   जंगलात कंसऱ्या गड वसलेले आहे.जवळच शबरीधाम हे प्रसिद्ध देवस्थान देखील आहे. त्याचप्रमाणे पम्पा सरोवर येथे देखील विलोभनीय धबधबा पाहण्यास मिळतो. जमिनीपासून सुमारे ५० फूट उंचीवर हे डोंगर आहे या डोंगरावर थोड्या उतार भागातच श्री कंसऱ्या गडाचे स्थान आहे. अत्यन्त रमणीय आणि देखण्या अशा घनदाट झाडीत एका छोट्याशा नाल्याच्या काठावरच कंसऱ्या देवाचे कपार लागते.थोड्या निमुळत्या आणि चिंचोळ्या होत जाणाऱ्या कपारीत अथांग दूरवर  देवलोकात जाणारी वाट असावी असा भास होत भाविकांच्या मनात सहजच येईल अशा विलोभनीय स्थानी श्री कंसऱ्या गड वसलेला आहे.येथील पिण्याचे पाणी अत्यंत गोड असून जणू काय ताजे नारळाचे पाणीच आहे असा भास पाणी पिताना झाल्याशिवाय राहत नाही .येथील गगनचुंबी झाडे अस्मानाला गवसणी घालत आहेत.तर मधेच गडाच्या पायथ्याशी वाहत जाणारा झरा भाविकांचे लक्ष वेधल्या शिवाय राहत नाही.अत्यंत पवित्र आणि नवसाला हमखास पावणारा अशी ह्या देवस्थानाची ख्याती आहे आणि म्हणूनच येथे दरवर्षी लाखो समाजबांधव दर्शनासाठी येत असतात. त्याठिकाणची नैसर्गिकता जाऊ नये म्हणून येथील स्थानिक नागरिक याठिकाणी कोणत्याही प्रकारचे मंदिर वगैरे बांधण्यास मज्जाव करतात. गडाच्या दारापाशी थोड्याफार काँक्रीटने भाविकांना बसण्यासाठी सपाट जागा करण्यात अली आहे.तर भाविकांना नाचगानी ,आणि मुकामी राहण्यासाठी गडाच्या पायथ्याशी देवखळ्या तयार करण्यात आलेल्या आहेत.                                                                                 
  2. शेंदवड गड -शेंदवड  ता.साक्री जि.धुळे                                                                                                          हे देवस्थान साक्री तालुक्यातील शेंदवड या गावच्या पश्चिम दिशेला असून अत्यंत खडतर आणि जमिनीपासून खूप उंच अशा ठिकाणी हे स्थान आहे. सगळ्यात उंच शिखरावर शेंदवड भवानी मातेचे सुंदर असे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्याची वाट अत्यंत बिकट असून येथपर्यंत पोहचण्यास मोठी हिम्मत लागते.गडाच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी मोठा रास्ता आहे. त्यामुळे पायथ्यापर्यंत गाडीने जाता सहज  येते. गडावर जाण्यासाठी/चढण्यासाठी मात्र पायीच जावे लागते . गडाच्या पूर्वेला शिखराजवळच डोंगऱ्या देवाचे स्थान असून याठिकाणी देखील दरवर्षी खूप मोठ्या संख्येने समाजबांधव,आणि इतर भाविक मंडळी येत असतात.या भागाला अलीकडेच महाराष्ट्र शासनाने पर्यटन क्षेत्र घोषित केलेले आहे. 
  3. कोल्याटा गड -बर्डीपाडा ता.साक्री जि.धुळे                                                                                                   साक्री तालुक्यातील बर्डीपाडा या गावाजवळ गावाच्या ईशान्य दिशेला कोलाट्या गडाचे स्थान आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील कोंडाईबारी गावापासून ३किमी अंतरावर  बर्डीपाडा गाव आहे. येतुन ३ किमीअंतरावर भरडू (मालनगाव) डॅम आहे या धरणापासून उत्तरेकडे कोलाटयागड आहे. गडाच्या पायथ्याशीच असलेल्या मालनगाव डॅम   पाण्याने अत्यंत तुडुंब भरलेला असल्याने गडावरून अत्यंत नयनरम्य दृश्य पाहावयास मिळते. कोलाट्या गड जमिनीपासून सुमारे ५००मी उंचीवर असून गडाच्या शिखराला खूप मोठी गुहा/बोगदा  असून ह्याच गुहेत डोंगऱ्यादेवाचे स्थान आहे . या गुहेमध्ये/बोगद्यामध्ये  वाकून वाकून भाविक (माऊल्या )दर्शनासाठी आत जात असतात.या गुहेतून   वर उंच शिखरापर्यंत जाता  येते. असे म्हटले जाते कि,जसजसे या उत्सवात पौर्णिमा जवळ येत जाते तसतसे या बोगद्याची रुंदी विस्तारत जाते आणि भाविकांना सहजच दर्शन घेता येते .आणि म्हणूनच या गडावर भक्त अत्यन्त निस्सीम श्रद्धेने येत असतात. परंतु या दिवसात येथे येण्यासाठी विशिष्ट असे व्रताचे पालन करावे लागते. असे म्हणतात कि जे भाविक नियमांचे पालन  न करता या ठिकाणी येतील त्याना काहीतरी शिक्षा होते. आणि तो या गडाचे दर्शन करू शकत नाही .त्याला असेच परतावे लागते. परंतु जो नीट नियमांचे पालन करून जातो त्यास मात्र दर्शनास कोणताही अडथळा येत नाही गडाच्या शिखरावरून आजूबाजूची जवळपास २०-२५ गावे सहजच नजरेस पडतात. याठिकाणी दरवर्षी भरपूर समाजबांधव या कार्तिक महिन्यात दर्शनासाठी येत असतात.                                                                      
  4. धाऱ्याबाऱ्या गड -बासर  ता.साक्री जि.धुळे 
  5. झळका गड-झळके ता.नंदुरबार  

  6. बगळ्या गड-जामखेल  ता.साक्री जि.धुळे 
  7. असलपेढा -टेंभा बागुलपाडा ता.साक्री जि.धुळे 
  8. निवळी/निवळा -करण्झटी  ता.साक्री जि.धुळे 
  9. मांडव गड नवापाडा ता.साक्री जि.धुळे 
  10. आजीपाळगड वडपाडा ता.साक्री जि.धुळे 
  11.  चिचल्यागड बंधारपाडा ता.नंदुरबार जि.नंदुरबार 
  12.  भिवसनगड मावजीपाडा ता.साक्री जि.धुळे 
  13.  मोगरा गड पाचमौली ता.साक्री जि.धुळे 
  14.  शेवगागड पचाळे ता.साक्री जि.धुळे 
  15.  पातळ गड वाल्हवे ता.साक्री जि.धुळे 
  16.  नारळ गड पांगण ता.साक्री जि.धुळे 
  17. भुयर गड विरखेल ता.साक्री जि.धुळे 
  18. खारकी गड विरखेल ता.साक्री जि.धुळे 
  19. धनाई पुनाई झिरणीपाडा ता.साक्री जि.धुळे 
  20. कुवर्ली गड शिरपूर ता.नंदुरबार जि.नंदुरबार 
  21. झळकागड झळका निंबी ता.नंदुरबार जि.नंदुरबार 
  22. बगला गड ढेकवद ता.नंदुरबार जि.नंदुरबार 
  23. धवळबारी गड शिर्वे ता.नंदुरबार जि.नंदुरबार 
  24. पावा गड मानुर पेठ नाशिक जि.नाशिक 
  25. धवळ्या गड मांगी तुंगी ता.सटाणा जि.नाशिक.
  26. तवली डोंगर गड सुरगाणा रोड ता.सुरगाणा जि.नाशिक
  27. पखाल्या गड ढवळीविहीर ता.साक्री जि.धुळे
    फखाल्या  गड हा जमिनीच्या आत तळघरात  आहे. गडाच्या पायथ्याशी धरण तुडुंब वाहत आहे दक्षिणेकडे सुमारे 50फूट एवढया उंचीचे सुंदर डोंगर आहे पाउस वारा वादळ नैसर्गिक आपतीमध्ये देखील  याठिकाणी सुमारे  300 माउलीचे संरक्षण होईल अशी सोय आहे .डोंग-यादेव सनाव्यतिरिक्त  इतर दिवशी देखील  सेवा करणारे भाविक  सेव-या माउली इथे देवाची सेवा करत असतात .गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर गड आहे.  गडावर  सेवा करणारे सेवक दहा वर्षापासून गडाच्या अवतीभवती झाडे लावत असल्याने अत्यंत नैसर्गिक आणि थंड असे वातावरण असते .
  28. तिखळ्या गड जामझिरे ता.साक्री जि.धुळे                                                                                                                            साक्री तालुक्यातील दहिवेल-राईनपाडा रस्त्यावर जामझिरे हे गाव आहे .गावाच्या अगदी दक्षिणेकडील बाजूस तिखल्या डोंगर आहे .हे डोंगर पावसाळ्यात अत्यंत विलोभनीय दिसते.मात्र पावसाला संपल्यावर झाडे नसल्याने डोंगर काहीसा मोकळा मोकळा दिसतो.डोंगराचा आकार अत्यंत सुंदर आणि देखणा असल्याने रस्त्याने जाताना एक नजर डोंगराकडे गेल्याशिवाय राहत नाही.हे डोंगर सुमारे ५०० मी उंचीचे असून याच डोंगराच्या शिखरावर साधारणपणे पश्चिम बाजूला  डोंगऱ्या देवाचे स्थान आहे. या स्थानाला आदिवासी कोकणी कोकणा समाजात अत्यंत महत्वाचे असे स्थान आहे.या ठिकाणी देखील दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये भरपूर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आणि नवसपूर्तीसाठी येत असतात.नवसाला हमखास पावणारा अशी या देवस्थानाची ख्याती आहे.
  29. रतनगड            
  30. रेशम्या  गड भिलदर ता.सटाणा जि.नाशिक  
  31. गंभीरगड 
  32. भोवऱ्या /पायऱ्या गड शेवरे ता.सटाणा जी नाशिक 
  33. साग्यागड
  34. कांडुळया. 
  35. गारया.
  36. शिळांदरया. 
  37. गायकवाडया.
  38. मोरया.
  39. वाघ्या.
  40. धनसरा गड आमळी ता.साक्री जि.धुळे                                                                                                                                             श्री क्षेत्र कन्हैयालाल महाराज आमली ता.साक्री जि.धुळे पासून उत्तरेला एक उंच डोंगर दिसतो या डोंगराच्या उंच शिखरावरच डोंगऱ्या देवाचे स्थान असून आमली गावापासून सहज नजरेला पडेल अशा ठिकाणी धनसरा गड आहे.आसपासच्या गावांतील समाज बांधवाचे  खास श्रद्धास्थान असलेले हे देवस्थान आहे.धनसरा गडाची उंची सुमारे १०० मी एवढी असावी.गडाला २-३ फुटाची कपार असलेल्या ठिकाणी डोंगर्यादेवाचे स्थान आहे.या डोंगरावर अन्य देवांचे आणि गुप्त धनाचे देखील स्थान आहे असे मानले जाते हे धन काही वेळा झगमग करत असताना बऱ्याच लोकांच्या नजरेस पडते असे या ठिकाणचे काही जेष्ठ व जाणकार लोकं सांगतात.या ठिकाणी देखील अत्यंत सुंदर असे वातावरण आणि डोंगरातील शुध्द हवा,कन्हैयालाल महाराजांचे  टुमदार मंदिर, आजूबाजूला असलेले विलोभनीय दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही. गडाच्या उतरेकडे जंगल असून या गडाच्या शिखरावरून घनदाट जंगल पाहण्यास खूप आनंद घेता येतो.दरवर्षी कार्तिक आणि आश्विन महिन्यात या ठिकाणी भाविक जमत असतात.
  41. साठीवाटी गड तोरणकुडी .साक्री जि. धुळे 
  42. रेशम्या/भुयार गड गैंदाना  डोंगर देवदरा नवेनगर  साक्री जि. धुळे
  43. पायरया  गड देवदरा नवेनगर पो.जेबापुर ता साक्री जि.धुळे.
  44. मुरंबी गड शिवपाडा ता.दिंडोरी जि.नाशिक
  45. मधळ्या गड पारगांव ता साक्री जि.धुळे.  
  46. भीवसन गड  राईनपाडा ता.साक्री जि.धुळे.
  47. धवल्या व कुवाऱ्या गड गोळवाड ता.सटाणा जि.नाशिक     
  48. नि-हळ (निलंगा)डोंगर=दळवटपंचक्रोसील गडांची नावे-निलंगागड दरेगाव (हा़) ता.कळवण.परिसरातील राजागड येथे राजमावली देवकन्सरा स्थायीक झाली असे मानले जाते. रायकनड नि-हळ डोंगर येथे निळप (निलंगादेवी) हिने तिचा पती टाफरा याला पकडले. टाफरा हा मांडव, शेंदवड गड,इत्यादीगड खोदत खोदत धुळे नंदुरबार भागातून कळवण भागात रायकनगड येथे आला. त्याला शोधत शोधत निळप या डोंगरावर आली व तेथे तिला टाफरा सापडला. म्हणून या डोंगराला नि-हळ(निलंगा देवीचा डोंगर म्हणतात. 
  49. भोऊरकडा ठाणापाडा ता.सुरगाणा., हातगड ता.सुरगाणा,
  50. कोल्हाळ्यागड जिरवाडा.ता.कळवण,
  51. भोराईगड (तिरंम्यागड) भाडणे (हा) ता.कळवण.गाग-यागड,
  52. शिनगा-यागड शिंगासी ता.कळवण. राजागड दळवट ता.कळवण.
  53. पाडशाडोंगर पाय-यागड करंभेळ,भाकुर्डेता.कळवण. 
  54. गायदांडगड कोसुर्डे ता.कळवण.
  55.  धुळखाकरगड आमदर ता.कळवण, 
  56.  रायकनगड जामले(हा.)ता.कळवण ,
  57. पाय-यागड गायदरपाडा ता.सुरगाणा.       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad