आदिवासी कोकणी कोकणा समाजात डोंगरदेव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यामध्ये विविध निसर्ग देवतांची आळवणी करीत असताना विविध निसर्ग देवतांची नावे घेतली जातात. त्यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे देवांगणी अर्थात "सातीशेवर"होय.
आणि मग "सातीशेवर"म्हणजे काय असा प्रश्न सहाजीकच पडतो. तर याविषयी जाणकार मंडळी कडून जाणून घेतले असता असे आढळून आले की, शेती करीत असतांना पिक घरात येईपर्यंत पिकावर विविध प्रक्रिया कराव्या लागतात.अगदी लागवडीपासून ते पिक काढणीपर्यंत बराच खटाटोप करावा लागत असतो.यात प्रामुख्याने सात प्रकारच्या मुख्य क्रिया मानून या सात क्रियांना "सातीशेवर" असे म्हटले जाते. सातीशेवर बाबत क्रमः थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न याठिकाणी करीत आहोत.
खालीलप्रमाणे :-
१) काळशेवर
आपण ज्या जमिनीवर राहतो ती जमीनीमुळे आपल्याला अन्न धान्य शेती वगैरे करून खायला प्यायला मिळते आणि म्हणून तिचे उपकार / आभार फेडणे महत्वाचे आहे. ज्या धरती मातेने सर्व मनुष्य जातिचे पोषण केले आहे अशी हि धरती माता अर्थात काळी माती म्हणजेच काळशेवरी होय. आदिवासी कोकणी कोकणा संस्कृतीत डोंगर देव उत्सवात या काळशेवरी म्हणजेच धरती मातेचे महत्व यातून व्यक्त केले जाते. आणि तिचे आभार म्हणून पूजा केली जाते.
२)नीळशेवर
आणि याच धरती मातेवर मनुष्य प्राणी हिरवेगार असे पिक पिकवतो.किवा या हिरवेगार वनस्पती वर अनेक प्राणी आपल्या जीवनाची गुजराण करीत असतात.व आपल्या पोटाची भूक भागवत असतात म्हणून धरती मातेवर पिकणारे हे पिक म्हणजेच नीळशेवर होय.या नीळशेवर चे सुद्धा आभार किवा पूजन आदिवासी कोकणी कोकणा समाजातील डोंगरदेव उत्सवात आवर्जून केले जाते.
३) फुलशेवर
या पृथ्वी तलावावर उगवणाऱ्या या हिरव्यागार वनस्पतींना काही कालावधी नंतर फुल अर्थात मोहर वगैरे येते यालाच फुलशेवर असे म्हटले जाते.वनस्पतीला जेवढे चांगले फुल तेवढी जास्त फळे अर्थात उत्पन्न आणि म्हणूनच वनस्पतीच्या वाढीच्या या क्रियेला सुद्धा आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या डोंगरदेव उत्सवात विशेष महत्व आहे.
४) दुधाशेवर
वनस्पतीला चांगली फुले आल्यानंतर लहान -लहान फळे येण्यास सुरुवात होते.याअवस्थेत फळे किवा कणस दुध अवस्थेत असल्याने या दुधाळ अवस्थेला दुधाशेवर असे म्हटले जाते.वनस्पतीच्या वाढीच्या या क्रियेला सुद्धा आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या डोंगरदेव उत्सवात विशेष महत्व दिल आहे.
५) गोंडाशेवर
वनस्पतीच्या दुधाळ अवस्थेनंतर फलधारणा किवा कणस बनायला सुरुवात होते अर्थात यावेळी वनस्पतीला गोंडे येतात.म्हणून वनस्पतीच्या गोंड धारणा अवस्थेला गोंडाशेवर असे म्हणतात.वनस्पतीच्या वाढीच्या या क्रियेला सुद्धा आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या डोंगरदेव उत्सवात विशेष महत्व आहे.
६) झेलाशेवर
वनस्पतीला कणस रुपी गोंडे आल्यानंतर ती परीपक्व होतात व यानंतर कणसांची मळणी /उफणणी वगैरे करावी लागते या मळणी उफणणी करण्याच्या क्रियेलाच झेलाशेवर असे म्हटले जाते.अर्थात धान्य गोळा करण्याची हि देखील अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे.आणि म्हणूनच वनस्पतीच्या धान्य गोळा करण्याच्या क्रियेला सुद्धा आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या डोंगरदेव उत्सवात विशेष महत्व आहे.
७) रासशेवर
या सर्व प्रक्रियेनंतर एका खळ्यात धान्याची रास करून पूजा विधी केला जातो म्हणजेच धान्याच्या या रास करण्याच्या क्रियेला रासशेवर असे म्हटले जाते.अर्थात खूप अशा कष्टाने धान्य घरात येत असते ज्यावर मनुष्य प्राणी आपले जीवन जगत असतो म्हणून हि शेवटी दिसणारी रास म्हणजेच रासशेवर होय.
अशाप्रकारे वनस्पतीच्या वाढीच्या या सर्व क्रियाना आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या डोंगरदेव उत्सवात विशेष महत्व आहे.आणि म्हणून प्रत्येक प्रक्रियेला विशेष महत्व देऊन त्यांची पूजा 'देवांगणी' या रूपाने केली जाते.