Ads Area

(Google Ads)

डोंगऱ्या देव उत्सवाची धामधूम

नाना प्रकारची आदिवासी लोकगीते, लोकांच्या हातात असलेली घुंगरू काठीबांबूचा खराटा, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज अन् तोंडातून भूररर..! असा आवाज आदिवासी भागातील रानात, डोंगर दऱ्यांच्या कपारीत घुमत आहे. निमित्त आहे आदिवासींच्या डोंगऱ्या देव उत्सवाची. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
      आदिवासी आम्ही डोंगरवासी, चंद्र सूर्यापासून आदिवासी यासारखी विविध गीते पावरीच्या तालावर म्हटली जात आहेत. पावरीचे सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्रच डोंगऱ्या देव उत्सवाच्या निमित्ताने उभे राहते. या उत्सवाला मोठी परंपरा आहे. हा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. याच उत्सवाला भाया असेही म्हणतात. कळवण तालुक्यातील कुंडाणे, नांदुरी, वंजारी, सुकापूर, दळवट आदी गावातील भाया उत्सव प्रसिद्ध असून, हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात.
आदिवासी बांधवांची निसर्गावर अपार श्रद्धा असल्याने जंगलातील पशूपक्षी, वाघ देव, नागदेव, मोर, चंद्र-सूर्य हेच त्यांचे दैवत असल्याने गावाच्या वेशीवर किंवा रस्त्यावरील बारीत वाघदेवाची मूर्ती दिसून येते. काही देवांना ठराविक नावाने ओळखले जाते. यात हिरवा, कंसरामाता, लक्ष्मी, रानवा आदी देवतांची अखंड दीप लावून सलग पाच दिवस पूजा केली जाते.गावातील हनुमानाच्या मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत पाच माऊलींच्या हातून देवतांडा उभा केला जातो. या जागेवर मुळासकट उपटून आणलेले झेंडूचे रोपटे लावतात. या देवतांडाजवळ मोराच्या पिसांचा गुच्छ, काकडी, नागलीचे दाणे, उडदाचे दाणे ठेऊन दिवा ठेवला जातो. कार्यक्रमाच्या ठरविलेल्या मुदतीप्रमाणे पाच, सहा किंवा बारा दिवस या थोम्बाजवळ माऊल्या फेर धरून नाचतात. या उत्सवादरम्यान या टापराला उपवास करून नियम पाळावे लागतात. या माऊल्या सकाळी अनवाणी फिरून शेजारील गावामध्ये जातात. गाणे म्हणून फेर धरून पावरीवर नृत्य करतात. घरोघरी जाऊन धान्य जमा करतात.
उत्सवाची समाप्ती करण्यासाठी सर्व माऊल्या व उत्साही नागरिक गावाजवळील डोंगरावर गड जिंकण्यासाठी जातात. त्या ठिकाणी डोंगराची म्हणजेच डोंगऱ्या देवाची विधिवत पूजा केली जाते. रात्रीच्या वेळी डोंगरावर कार्यक्रम घेतला जातो. अनेक गावांमध्ये दत्त जयंतीनिमित्त या उत्सवाची सांगता होते. त्यानंतर महाप्रसादाचा (गावभंडारा) कार्यक्रम होतो.

भाया उत्सव
आपल्या गावात सुख शांती लाभो, शेतात काम करताना निसर्गाचा कोप होऊ नये, शेतात पेरलेले पीक चांगले यावे व घर संसाराची भरभराट व्हावी आदी कारणासाठी भाया उत्सव साजरा करून सांगतेच्या वेळी कोंबड्या व बोकडाचा बळी दिला जातो. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad