सुरगाणा तालुक्यात अपरिमित वृक्ष तोडीमळे औषधी वनस्पती सह रानमेवा , रानभाज्यांचा अनमोल निसर्गाचा खजिना नष्ट होण्याच्या मार्गावर. याचे जतन व संवर्धन व संशोधन करण्याची गरज.
श्री.रतन चौधरी.(मो. 9423070792)
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला तसेच समुद्र सपाटी पासून महाराष्ट्रात कळसूबाई नंतर उंच असलेला केम पर्वत.याच रांगेत असलेले थंड हवेचे ठिकाण सापुतारा हे गिरिकंद व तवली पर्वतावर वसलेले आहे.याच रांगेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक वास्तू हतगड किल्ला आहे. याच किल्ल्यावर कातळ शिल्पांच्या कडे कपारीत अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजिना आहे. तर याच पर्वताच्या रांगेत केम पर्वतावर केमाई मातेचे मंदिर असून या पर्वतातून गिरणा, उनंदा,औरंगा,नार,पार,अंबिका,वाझडी,या सप्त नद्यांचा उगम होतो.यापैकी गिरणा, उनंदा या पुर्व वाहिन्या तर बाकीच्या पश्चिम वाहिन्या आहेत.याच नद्यांच्या द-या खो-यात, कडे कपारीत वनोऔषधीचा एकेकाळी अनमोल असा खजिनाच होता. आज मात्र तो मानवाच्या हव्यासापोटी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाल्याने तसेच सागवानाची चोरटी तूट झाल्याने नष्ट होण्याच्यामार्गावर आहे. महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत 'दंडकारण्य' हे गुजरात सरकारचे राखीव जंगल असून याच जंगलात तालुक्याच्या लगतच आहवा डांग जिल्ह्य़ात सुबीर या गावी शबरी मातेचे मंदिर असून बोरीची झाडे असलेले' शबरीवन' हे जंगल आहे.याच जंगलात आजही थोड्याफार प्रमाणात दुर्मिळ वन औषधी वनस्पती आढळतात.महाराष्ट्र राज्याच्या सिमावर्ती करंजुल(क), खुंटविहीर,पिंपळसोंड, उदालदरी,तातापाणी, हडकाईचोंड, रघतविहीर,कुकूडणे, गोंदूणे,मांधा,राशा, सुळे,बाफळून,भवाडा, राक्षसभूवन,करंजुल पे, खिर्डी,भाटी,खडकी,मधुरी या गावांना दुर्मिळ वनोऔषधीचा खजिना थोड्याफार प्रमाणात आढळून येत असला तरी काही वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. पुर्वीच्या काळी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसल्याने आदिवासी समाजातील वनोऔषधीचे जाणकार वैद्य हे पारंपरिक पद्धतीने काही आजारांवर उपचार करीत असत.यामध्ये सर्पदंश,विंचू दंश, श्वानदंश,हिस्रप्राणी दंश,काखेत गाठ येणे, पोट दुखी,जखम होणे,अंगावरून जाणे,पोट फुगणे,ताप येणे,डोके दुखणे,अशक्तपणा,हातापायाला झालेली जखम,हाडे मोडणे एरव्ही आजही आदिवासी भागात नको असलेला गर्भपात करण्यासाठी काही वैद्य जंगलातील कंदमुळे,झाडपाला या औषधी वनस्पतींचा वापर करतात असे समजते. त्याचप्रमाणे जनावरांना झालेले आजार यासह एक ना अनेक आजारांवर रामबाण उपाय केले जात असत.किती ही विषारी साप चावला तरी प्राण वाचविण्यात यश मिळत असे. मात्र हा 'आजीचा बटवा,म्हणून संबोधला जाणारा वनऔषधींचा खजिना व जंगलातील नैसर्गिक ठेवा असलेला रानमेवा बेसुमार वृक्षतोड तोडीमुळे नामशेष / लृप्त होण्याच्या मार्गावर आहे.
* * जंगलातील रानभाज्यांचे घटक नष्ट होत असल्याने आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण ही वाढत आहे. हा रानमेवा नैसर्गिक रित्या असल्याने पालापाचोळा,गवत या सारख्या सेंद्रिय खतावर वाढलेला असल्यामुळे त्यामधून भरपूर पोषणमूल्य असलेले जीवनसत्वाचे घटक शरीराला मिळत असत. गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत.रानभाज्यांमधे तंतूमयाचे प्रमाण भरपूर असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. वेगवेगळ्या प्रथिनांचे घटक,लोह, कॅल्शियम यामुळे शरीराचे चांगले पोषणमूल्ये मिळून पौष्टिकता वाढत असल्याने यामधून पुरक पोषण होत असे. अलीकडे नाशिक सारख्या ठिकाणी जिल्हा कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी लिना बनसोड यांच्या मार्गदर्शनाने 'रानभाजी व सेंद्रिय शेती माल विक्री आठवडी बाजार पंचायत समिती नाशिकमध्ये दर रविवारी भरविण्यात येत आहे.राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाची सुरुवात करून शहरी व ग्रामीण भागातील आदिवासी जनतेची सांस्कृतिक नाळ जोडण्याचा छोटासा प्रयत्न शासनाकडून या माध्यमातून केला जात आहे. शहरी भागातील नागरिकांना या रानभाज्यांची ओळख व्हावी त्याची चव चाखता यावी याकरीता आयोजन करण्यात आले.
* रानभाज्या शक्यतो पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.या भागात आढळून येणा-या औषधी वनस्पती ह्या आज नामशेष होत आहेत. जंगलातील नैसर्गिक रित्या आढळणारी
* जंगलातील फळे - आवळा,करवंदे ,अळवं , टेंभरुण,तोरणां , हुंभा,खडक पायरा, बेहडा,धामणा,जांभूळ, खरबाटा,असंदा, भोकर,गळघुगर, गणतुरा,आंबुपायरा, गोमट,मेका,चिंचा, गोमट,मेका,चिंचा,शेपु आंबा,घोट्या आंबा. नाक्या आंबा,रायवळ अशी हि फळे.
* रानभाज्या-शेवळा, चाईचा मोहर,करटुले, दिहगडी,शापुड, कहाकडा,लोत,दिवेली,तेरा,खुरसणीचा पाला,तरवटा, झारझुरा,भोकरची भाजी,शेवगा,कुहरुळ, बुराळी कोड,मोखाची पाने,खरशींग शेंगा, करटोला,वाघाट, पेंढराचे फळ,आंबाडा, काकडाचे लोणचे, डांगराचे कोंब, वासद्या( बांबूचे कोंब) ,गोगवल,भडमूग दाणे, नदीतील सोळा गवत, तांदूळका,बोरथडा, चवळवेल,लुंडावेल,नेवाळा,आदीं ह्या रानभाज्या.
* कंद वर्गीय भाज्या- हलंद,कडूकंद, वरा,कोयची,सुरंद,अळू, वाजकंद,रताळी आदी..
* झाड पाला,पानांची भाजी - मोखाची भाजी,कांचनची ( कुहरुळ)माटा,कुरडू, देव व रानटी कुरडू आदी...
* जंगलातील औषधी वनस्पतींची नावे- बाफळ्या,अर्जुन सादडा,बोरीची साल, असंद,मोहाचे झाड, गुंजवेल,करकांगवल, सागाचे बी,कवदरीचे मुळ,कुर्डू मुळ,बिबवा, बाहवा,हिरडा, बेहडा,आपटा सिदाची शेंग,बाभूळ शेंग,निरगुडीचा पाला, आंबू हळद,उंबर, गरवळ,एरंड, फांगळुट,मोर वेल, लिपट्या,टणटणी, हरळी,सशाची घोंगडी( शतावरी),कळलावी( अग्निशिखा फुल), कोंबड वेल अमरवेल, आबयची शेंग, कांड्या बेंदोर, खरबाटा साल, शेवगा साल,उदाळा साल, कहांडोळ साल, पानकेवडा,सावर, कचुरा,आटीच्य् शेंगा, कोरफड,निळसोटी, आगपान,चित्रोक, चिबड कडू, महरु आदी...
* अळींबचे प्रकार- भुईफोड,चिकण्या, राजकुवर,कुणबी कुवर, राज अळींब,सिता अळींब,पचव अळींब. पोळ अळींब,लाकूड भेंड,रोबांडी अळींब, वाथरटा आदी.
मोहाचे झाड हे तर आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून या कडे बघितले जाते. मोहाची टोळंबी( मोहट्या), करडई,कोसींब तेल, करकांगवलीचे तेल, रोयचा गवताचे तेल यासह अनेक वनस्पती पुर्वी या भागात आढळून येत असत. या वनस्पतींची ठिकाणे ही शिंदे जवळील केम,सापुतारा गिरीकंद,घागबारी येथील तवल्या डोंगर, कुकूडणे येथील कुकड्या,रघतविहीर येथील पिलवा डोंगर,बाफळून येथील बाफळ्या, डोल्हारे येथील लोहा-या या डोंगरावर ह्या वनस्पती हमखास सापडत असत. याच भागात गुळवेल,कळलावी( अग्निशिखा) वासनवेल या वनोऔषधीचा एकेकाळी दाट जंगल असल्याने खजिनाच भरलेला होता.हा खजिना आज नामशेष होत आहे . वासनवेल सारखी वनस्पती ही कोरोना सारख्या आजारावर प्रभावी गुणकारी ठरत असुन या बाबत सध्या संशोधन सुरू आहे. आयुर्वेदिक औषधाची चाचणी यशस्वी झाली तर तो एक आशेचा किरण दिसू लागेल. त्यामुळे वनविभागाने याची दखल घेऊन या वनस्पतींचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.नाहीतर भविष्यात येणा-या पिढीला हि आदिवासी भागातील औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती चित्रातच पहाव्या लागतील. प्रतिक्रिया- "अतिदुर्गम भागातील तातापानी गरम पाण्याचा झरा. येथे परिसरातील आयुर्वेदिक वनौषधींची लागवड करुन नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला ठेवा जतन व संवर्धन, संरक्षण करणे आवश्यक आहे. आमच्या परिसरातील जंगलात आयुर्वेदिक वनौषधींचा खजिना आहे. अपरिमित जंगलतोड झाल्यामुळे या भागातील औषधी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या शेकडो वनस्पतींचे जतनासाठी या ठिकाणी आयुर्वेदिक वनौषधीं वनस्पतीची वनविभागाने उद्यान निर्माण करावे. तरच या वनस्पतींचे जतन व संवर्धन होऊन हा पारंपरिक उपचारपद्धतीचा वारसा पुढील पिढी करीता जपून ठेवला जाईल.
जलपरिषद मित्र. रतन चौधरी सुरगाणा. फोटो -
तालुक्यात आढळणारी *कळलावी ( अग्निशिखा) वनोऔषधी. * गुळवेल. * वाथरटा- अळींब * वासदया- बांबूचे कोवळे कोंब.
वास्ते |
कवळी (सफेद मुसळी) |
करटूले |
काहाकार्या |
कडूकंद |
काटेरी माटा |
कवदर |
वाघार |
अप्रतिम माहिती सर आपण याचं जतन केले पाहिजे सर्वांनी यासाठी एकत्र येऊन याचं संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.
उत्तर द्याहटवाहो नक्की जतन केले पाहिजे.
हटवा