नागली/ नाचणी एक पारंपरिक वाण.
नागली/ नाचणी kokanikokana |
नागली/ नाचणी kokanikokana |
आदिवासी बहुल तालुक्यात पारंपरिक पद्धतीने नागलीचे पिक घेतले जाते.शेकडो वर्षांपासून डोंगर उतारावर नागलीची पेरणी केली जाते. नागली मध्ये हलकी व गरवी नागली असे प्रकार आहेत. हलकी म्हणजे लवकर पिक येणारी तर गरवी म्हणजे उशिराने पिक येणारी. हलकी मध्ये बेंद्री तसेच गरवी नागली मध्ये पांढरी सितोळी,विटकरी लाल रंगाची असते. खाण्यास सर्वच चविष्ट लागते.शेकडो वर्षांपासून आदिवासींच्या दैनंदिन जीवनातील आहारामध्ये नागलीचा समावेश आहे.त्यामुळे नागली हे आदिवासींचे प्रमुख अन्न मानले जाते.
नाचणी किंवा नागली
हया धान्याला आदिवासी बोलीत 'कणसरी, देव असे म्हणतात.नाचणी हे पीक घेण्यासाठी खरीप हंगामात पेरणी करीता मार्च महिन्या पासूनच झाडाचा पालापाचोळा, गुरांचे शेण( गोवर) जाळून'राब' भाजणी केली जाते. पावसाला सुरुवात झाल्यानंतर जून महिन्यात भाजलेल्या राबामध्ये नागलीचे बी पेरले जाते. रोप वाढले की रोप खणून मशागत करून तयार केलेल्या जमिनीत चास अथवा प्रत्येक रोप ओल्या जमीनीवर टाकून पावसाळ्यात शेतात लागवड केली जाते पीक परिपक्क झाल्यानंतर कापणीच्या दिवशी नाचणीची म्हणजे कणसरा देवाची पुजा केली जाते.पुजेसाठी ह्या पीकाला आदिवासी बांधव कोंबड्या, बक-याचा नैवद्य दाखवितात.आदिवासी भाषेत कोंबडीला तलग अथवा टोळगी किंवा कोंबडाला टोळगा असे म्हणतात.मटनाचा स्वयंपाक शेतातच करतात. कणसरी देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर यथा योग्य शेतातच जेवणावर ताव मारतात. उरलेला नैवद्य घरी नेता येत नाही तो रानात म्हणजे शेतातच सोडून द्यावा लागतो.अशी आदिवासी बांधवांमध्ये श्रदधा आहे व नाचणी हया पिकाची कापणी व मळणी साधारण मार्च महिन्यात केली जाते मळणी झाल्यानंतर धान्याच्या राशीची पूजा खळ्यात लाल रंगाचा कोंबडा मारून केली जाते.कोंबड्याची मटन करुन शेतातच स्वयपाक करुन तिथेच भोजन केले जाते.मटण घरी नेता येत नाही.नाचणीच्या धान्यामध्ये पळसाचे फुले टाकून पूजा केली जाते संपूर्ण पूजा झाल्यानंतर धान्य घरी नेतात. आशा प्रकारे आदिवासी समाजाच्या रूढी परंपरानूसार प्रत्येक वर्षी नाचणीचे (नागली) श्रदधेने पूजा केली जाते.आदिवासी भाषेतना गलीला नाचणी असेही म्हणतात. सुरगाणा तालुक्यात ४२७० हेक्टर क्षेत्रावर नागलीचे उत्पन्न घेतले जाते. राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी (शास्त्रीय नाव - इल्युसाईन कोरॅकोना) म्हणजेच नागली हे तृणधान्य शरीरासाठी पौष्टिक समजले जाते. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरच लोह,नायसिन,थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणाऱ्या कॅल्शियमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू,कष्टाचे काम करणारे,वाढत्या वयाची मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात.
नागली हे पीक दुर्गम,आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात. नागली हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे हे पीक आहे. नागलीचे बी मुठीने जमिनीवर फेकून पेरणी करतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये नागलीचा वापर पुष्कळ प्रमाणात केला जातो आणि विशेष म्हणजे कष्टकरी वर्गात तो अधिक होतो त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी मदतच होते. नागली पौष्टिक आहार असल्याने आदिवासी गरोदर माता किंवा बाळंतीण झालेल्या मातेला नागलीची पेज दिली जाते. पुर्वीच्या काळी नागली हेच आदिवासींचे पारंपरिक धान्याचे वाण असल्याने आदिवासींचे
आरोग्य नेहमी चांगले असते. नागली पौष्टिक अतिशय पौष्टिक असल्याने ,तब्येतीसाठी फार चांगली आहे असं हल्ली आपण वारंवार ऐकतो पण नागली आणि त्याचे गुणधर्म याविषयी आपल्याला फार पूर्वीपासूनच माहिती आहे .आजकाल कोणत्याही खाद्यपदार्थांच्या दुकानात गेले की नागलीचे पीठ ,सत्व किंवा पापड ,बिस्किटे असे अनेक पदार्थ बघायला मिळतात .
नागली तुरट ,कडवट चवीची ,पचायला हलकी,शक्तिवर्धक आणि गुणाने थंड आहे.त्यामुळे पित्तशामक ,उष्णता कमी करणारी आहे .उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप घाम आल्याने जो एक प्रकारचा अशक्तपणा येतो त्यासाठी नागली अत्यंत उपयोगी असा घरगुती उपाय आहे.नागलीचे मीठ आणि हिंग मिसळून वाफवलेले सत्व ( उकड किंवा उत्तर महाराष्ट्राच्या भाषेत सांगायचे तर खिशी) किंवा दूध ,साखर टाकून केलेली खीर उन्हाळ्यात विशेषकरून घरातील लहान बळे किंवा वयस्कर व्यक्तींसाठी उत्तम आहार आहे .
नागली रक्तवर्धक आहे त्यामुळे स्त्रिया ,गर्भवती यांनी नेहमी आहारात ठेवावी.
नागलीमध्ये पिष्टमय पदार्थ कमी आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेही व्यक्तींनाही पथ्यकर आहे.
हाडांची झीज कमी करणे ,ताकत वाढवणे यासाठी नागली उपयुक्त आहे. आदिवासी बांधवांमध्ये आहारात पुर्वी मोठ्या प्रमाणात
नागलीचा समावेश असल्याने लोकांमध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी कंबरदुखी या सारखे आजार नव्हते. कारण आहारात नागली, उडीदाचे बेसन किंवा भुजा बिना तेलाचे तसेच मोहट्याचे तेल यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खुप असते.
नाचणी/नागली का खावी
नाचणी पचायला हलकी असते. आजारी पडलेल्या रुग्णांसाठी नागलीची पेज पौष्टिक असते. नागली खाल्ल्यास पोटाचे विकार उद्भवत नाहीत.नाचणी पित्तशामक,थंड,रक्तदोष कमी करणारी आहे. नाचणी सत्त्व किंवा दुध, साखर, गुळ टाकून केलेली खीर लहान बाळ किंवा वयस्कर व्यक्तींसाठी उत्तम आहार आहे. भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवली जाते.
नाचणीला आदिवासी भागात नागली, रागी किंवा काही भागात फिंगर मिलेट म्हणतात. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरी सारखे बारीक असतात. नाचणी मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर असते.
नाचणीचे फायदे
१. नाचणी खावी कारण हाडांसाठी - सध्या आपण सर्वत्र ऐकतो ते म्हणजे हाडांच्या तक्रारी उदा. गुडघेदुखी, हाडांचा ठिसूळपणा जास्त प्रमाणात आढळून येतो. हाडांचा अशक्तपणा,हाड ठिसूळ होणे, हाड खिळ खिळी होणं, हे आजार आजकाल दर दहा जणांपैकी एका मध्ये आढळतात. हाडांचे आजार असणा-यांना आहारात 'नागली' शिवाय पर्याय नाही.
२. नाचणी खावी कारण वजनावर नियंत्रणा करीता होणार फायदे- तांदळाच्या पदार्थांऐवजी नाचणी पासून बनवलेले पदार्थ खावेत. नाचणी पचायला हलकी असते. नाचणी मुळे शरीराला फक्त उर्जा
च मिळत नाही , तर अमिनो ॲसिड मिळते. वजनावर नियंत्रण येणार तसेच भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवली जाते.
३. नाचणी खावी कारण लहान मुलांसाठी गुणकारी असते. मुलांना गुळ आणि गाईंच्या तुपात पासून बनवलेला नाचणी हलवा घ्यावा. नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळे मुलांची पचन शक्ती उत्तम पद्धतीने सुधारते.
कोरोना काळात आदिवासीनी मोठ्या प्रमाणात आहारात केला नाचणीचे आंबिलचा वापर
फार पूर्वीपासूनच आदिवासींच्या जीवनशैलीतील खाद्य संस्कृतीत पारंपरिक वाण 'नागली' या धान्याचा समावेश आहे. पुर्वजांच्या आहारात' सकाळी चहा ऐवजी ' नागली किंवा गावठी ज्वारी पासून पिठ किंवा धान्य जात्यावर भरडून ते रात्रभर पाण्यात भिजत घालून त्यापासून पातळ पेज बनवली जाते ती म्हणजे'आंबील' होय. आजही आदिवासी भागात सकाळी चहा ऐवजी नागलीची पातळ पेज बनवली जाते. पुर्वजांनी खाद्यसंस्कृती, अनेक प्रथा, परंपरा, पौष्टिक आहार यांना खुप वैशिष्ट्य पुर्ण जपले आहे. आंबील घराघरांत बनवली जात असे. पुर्वी सर्व सामान्य ते प्रतिष्ठित अशा सर्वांच्याच आहात 'आंबिली' पदार्थांना महत्त्वाचे स्थान होते. कोरोना काळात आदिवासी भागात जेवण नसल्याने आंबीलचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आढळून आले.
कणसरी म्हणजे नाचणी
इ.स.१८८५ मध्ये प्रकाशित झालेले ब्रिटिश गॅझिटीअर मध्ये नाचणी किंवा नागलीला *कणसरी* या शब्दाचा उल्लेख आढळतो. आदिवासींचे प्रमुख खाद्य म्हणून उल्लेख आढळतो.
कोणत्याही वेळी शपथ घेतांना आदिवासी बोलीत *कणसरी* या शब्दाचा उच्चार केला जातो. हा शब्द वापरला तर कोणत्याही प्रकारचे काम करण्याची पक्की खात्री दिली जाते.आदिवासी बांधव पुर्वी पासुन कणसरी हे नाव घेऊन शपथ वाहतात. आदिवासी भाषेत गितेवर हात ठेवत वाहिलेल्या शपथे पेक्षाही या शब्दाची व्युत्पत्ती, महती खुप मोठी आहे. तसेच पापड बनवायला नाचणी विकली जात नाही. नागली धान्य कधीच जाळली जाते नाही. या धान्याची पुजा अर्चा केली जाते.
नाचणीचे मेनू
आदिवासी भागात नाचणीची भाकरी, पौष्टिक लाडू, उंडे, बोळकी,पापड, बिस्किटे असे मेनू बनविले जातात. नागली ची भाकरी व उडदाची घट्ट दाळ, भुजा, मिरचीचा ठेचा हा मेनू खुपचं प्रसिद्ध आहे.
शब्दांकन - श्री.रतन चौधरी सुरगाणा