माहिती संकलनव संशोधन. रतन चौधरी. सुरगाणा. डांगी भाषा अभ्यासक.
सुरगाणा तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत कोकणा, महादेव कोळी, भिल्ल, वारली या जमाती महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सिमावर्ती भागातील डोंगर द-या खो-यात शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या समाजात अनेक सण उत्सव आजही पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. यातच पावसाला सुरुवात झाल्यानंतर तेरा सणा नंतर पचवी हा सण साजरा केला जातो. या सणा विषयी पुर्वी पासून अनेक समज गैरसमज आहेत.
याविषयी ज्येष्ठ नागरिक देवराम देशमुख वय वर्षे ८१ यांच्या कडून माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले की" आदिवासी बांधवां मध्ये तेरा, पचवी, पोळा, पितरा, दसरा, दिवाळी, होळी शिमगा,अखाती असे सण उत्सव आजही पारंपरिक पद्धतीने साजरे करतात. नागपंचमी हा सण पचवी या नामोल्लेखाने साजरा केला जातो. या दिवशी केवळ नागाचीच पूजा केली जाते असे नाही तर या दिवशी बांबूच्या कुडाच्या भिंतीवर शेण मातीने सारवले जाते त्यावर चुना किंवा तांदळाच्या पिठाने बांबूच्या काडीचा ब्रशने पचवी लिहली जाते यामध्ये भिंतीवर चौकान काढून त्यामध्ये आदिवासींच्या नैसर्गिक देवता जसे वाघदेव, नागदेव, विंचू ,मोर, सुर्य, चंद्र, झाडे, फुले, पाने हि नैसर्गिक देवतांची चित्रे तसेच लाकडी औत,बैल,कासरा, भात, नागली लावतांना शेतकरी, औत हाकतांना शेतकरी, जंगलात गुरे चरायला घेऊन जाणारा, गुरे चारणारा बाळदी अशी रेखाचित्रे रेखाटली जात असत.
घरातील कुटुंब प्रमुख हा या दिवशी उपवास केला जातो. संध्याकाळी गुरे जंगलातून घरी आल्यावर पुजा केली जाते. काढलेल्या चित्रांचे बांबूच्या सुपात आदिवासींच्या देवता, रानावनातील भुतं, खेतं यांच्या नावाने सुपात तांदळाच्या पुंजळया पाडल्यानंतर फार पुर्वी दगडी दिवा उपलब्ध नसल्यामुळे चिबड( रान काकडीचा प्रकार) मधोमध काप घेऊन त्यातील बिया काढून दिवा बनवत असत. किंवा दगडी दिव्यात तेल वातीचा दिवा लावून शेंदूर,गुलाल लावून दिवा ओवाळत आदिवासींच्या विविध देवता हिरवा, कणस-या, कणसरी, धनस-या, डोंगर मावली, महादेव, खंडेराव, बहिरम, चोखा हिरवा, बाटोक हिरवा, मूंज्या, इहमाय, मेचको हिरवा( गुप्त) सर्वात खतरनाक देव, यांची मनोभावे पूजा,प्रार्थना केली जाते. या दिवसा पासून काही नवीन मेनुचा आहारात समावेश केला जातो. यामध्ये अळचे पातवड, तांदळाच्या पिठाचे उंडे, नागलीच्या पिठाचे बोळकी, उपवासाची भगरीची कोंडी हे पदार्थ बनवले जात असत. अळूच्या पानांना बेसन पीठचा अथवा तांदळाच्या पिठाचा लेप देऊन त्यांना घड्या घालून एका पातेल्यात अर्ध पातेले पाणी घेऊन चुलीवर ठेवले जाते. पाण्याच्यावरती बांबूच्या काडीचा आधार देऊन अलगद पणे पाण्याच्यावर दाथरा बनवून त्यावर पीठ लावलेले घडी केलेले पातवड वाफेवर शिजवून घेतले जाते. पक्कं शिजलं की एका ताम्हण( परात) मध्ये घेऊन थंड झाल्यावर विळ्याने उभे आडवे कापून वड्या तयार करून त्याला पळीतील तेल, मोहरीची फोडणी दिली जाते. वरण, भात केला जातो. हाच निवद( नैवद्य) या रेखाटन केलेल्या चित्रातील नैसर्गिक देवतांना दाखविला जातो. सकाळी ते नैवद्य न फेकता गोठ्यातील गायींना घालून दिला जातो. तांदळाच्या ओल्या पिठाचे उंडे (लाडू) बनवून वाफेवर शिजवून घेतले जातात. तर त्या प्रमाणे नागलीच्या पीठात गुळ घालून बोळकी वाफेवर शिजवून घेतले जाते. या दिवशी उपवासाकरीता वरयी तव्यावर भाजून ती जात्यावर दळून त्या कोरड्या पिठात गुळ घालून उपवासाची कोंडी तयार केली जाते. हे पदार्थ लहान थोर आवडीने खात असत त्यामधून अनेक पोषणमूल्य मिळत असल्याने आपोआपच लहान बालकांचे कुपोषण कमी होत असे.
पचवी सणाबाबत गैरसमज/ गैरसमजुती/ पारंपरिक समाजावर असलेला अंधश्रद्धेचा पगडापचवी या सणाबाबतीत काही आदिवासी क्षेत्रात अनेक समज, गैरसमज,गैरसमजुती तसेच अंधश्रद्धा आहेत त्या अशा या दिवशी आदिवासी महिला किंवा पुरुष भुताळीण, भुताटकी,डगरा,डगरी भगताची विद्या प्राप्त करण्यासाठी सुरुवात केली जाते असा गैरसमज फार पुर्वी पासून होता. हि विद्या घेण्यासाठी गुरु या दिवसापासून केला जातो. मंत्र.,तंत्राच्या कांडया शिकविल्या जातात. या दिवशी सुरुवात करुन ती विद्या वाघबारस पर्यंत सुरु असते. शेवटी विद्या पुर्ण झाल्यावर गुरु दक्षिणा रुपात विद्या देणा-याला काही तरी बळीच्या रुपात द्यावे लागत असे. ते दिले नाही तर विद्या प्राप्त करणारी, घेणारी व्यक्ती वेडसर होणार किंवा कुटुंबातील पतनी, मुले यांच्यावर मोठं अरिष्ट संकट येणार अशी अंधश्रद्धा पुर्वी होती. काही अंधश्रद्धा अशा आजही काही काही भागात पाचवीच्या दिवशी अगर आदल्या दिवशी नवविवाहित मुलींना माहेरी आई वडिलांकडे पाठविले जात नाही. कारण या दिवसापासून भुताळीण, चेटकीण, भगताची विद्या शिकविली जाते या दिवशी रात्री अचानक आवाज कोणी दिला किंवा हाक दिली तर घरातून बाहेर पडायचे नाही. या दिवशी भुत, पिशाच्च, चेटकीण, भगताचा वावर असतो या दिवशी शेतकरी आपल्या शेतात जात नाहीत किंवा शेतातील बांध, बंदीस्त दगड उचलत नाहीत कारण सर्पाचा वावर असतो भगताची विद्या हि महादेव, पारबतीची विद्या असून सर्वात कठोर, कठीण विद्या हि पारबतीची आहे. या विद्येचे निती, नियम पाळण्यास सर्वात अवघड आहेत. भगत हा गावांतील पुजा अर्चा करीत असतो. सुख दुःख पाहणी करतो. आजही कोणाला भूत बाधा झाली , झटक लागली तर उतार हा भगता कडे करावा लागतो. सर्पदंश झाला तर साप चावला असे सांगितले जात नाही तर एका सांकेतिक भाषेत" पान' लागणे असे म्हणतात कारण सर्पदंश झालेला माणूस या भीतीनेच दगावतो. असे एक ना अनेक या सणाबाबतीत काही भागातील आदिवासी समाजात समज गैरसमज आहेत. यामधील वाईट अंधश्रद्धा दुर करुन चांगल्या गोष्टी आत्मसात करून त्याचा अंगीकार करुन निसर्गाशी नाते जोडत त्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी आदिवासी समाजाने पुढे सरसावले तर निश्चितपणे निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागेल.
पचवी 'पचवी' हा सण पावसाळा ऋतूमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येतो. पचवी सणाला नागपंचमी म्हणूनही ओळखले जाते. खऱ्या अर्थाने सुरगाणा,पेठ व डांग परिसरात जास्त जंगल असल्याने परड, नाग, मण्यार, फोडसा, दिवड, रुखिंड ,विंचू ,धामन्या, काखे, दुतोंड्या यांसारखे अनेक विषारी व बिनविषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचा या भागात वावर आहे. यांपासून संरक्षण मिळावे या हेतूने पचवीला अर्थात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. त्यासाठी येथील लोक घराच्या भिंतीवर थोडासा भाग शेणामातीने सारवून त्यावर खडू ,चुन्याद्वारे शेतकऱ्यांच्या हाती नांगर, बैल,पाय वाटेने शेतात डोक्यावर भाकरी घेऊन जाणारी घर मालकीण, घर, घराच्या ओट्यावर रांगणारे मुल ,झाड ,झाडावर माकड व मोर, मोरावर नेम धरून समोर उभा असणारा धनुष्यधारी माणूस, शेतात नाग ,मावल्या, तारपी वाजवून नृत्य करणारे लोक, कुत्रा इत्यादी बोलकी चित्रे रेखाटली जातात. याच रेखाटलेल्या चित्र कृतीला 'वारली चित्र' म्हणून ओळखले जाते. ही सर्वत्र लोकमान्य झाली व फॅशन्स म्हणून लोकांनी ती स्वीकारली आहे. या परिसरातील लोक संपूर्ण निसर्गातील घटना प्रसंगांचे चित्र काढून त्याची आदराने पूजा करणे महत्त्वाचे मानतात. पचवीच्या दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे पाचवीच्या दिवशी रानावनात फिरतांना आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये म्हणून पुरुष निसर्गदेवतेचा उपवास करतात. सर्वसाधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात दरम्यानच्या काळातपर्यंत पाऊस कमी झालेला असतो. मोसमी पावसाचा उत्तरार्ध असल्यामुळे सर्वत्र परीसरात हिरवेगार व दमट वातावरण असते. त्यामुळे या काळात अशा वातावरणामुळे साप व इतर सरपटणारे अनेक प्राणी सर्वत्र फिरत असतात आणि हा काळ सापांच्या पुनरुउत्पादनाचा व महत्त्वाचा असतो. त्यामुळे सर्वत्र वाढलेल्या गवतात शेळ्या,गाई, म्हशी व इतर गुरे चरण्यासाठी गेलेल्या गुराख्याला, शेतमालकाला व शेतात गेलेल्या माणसांना सर्पदंशाचा धोका असतो. सापाबद्दल उपकाराची जाणीव म्हणून 'पचवी' हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा करतात.
नागपंचमी आदिवासींच्या प्रमुख सणांपैकी नागपंचमी हा एक सण. कित्येक हजारो वर्षांपूर्वी जगात कुठेही अक्षर लिपी नव्हती त्यावेळी मानव आपल्या भावना दगडी शिळांवर, गुहेत चित्रांद्वारे व्यक्त करीत होता नंतर हेच रेखाटन त्याच्या घरातील भिंतीवर आली त्यापैकीच ही कला सणाच्या माध्यमातून आजही आदिवासींनी जतन केली आहे. पंचमीच्या दिवशी आदिवासी आपल्या घराच्या भिंती सारवून सर्व प्रकृतीच जीवसृष्टीच ,जीवनशैलीच रेखाटन करतो सुर्य चंद्र तारे ऊन वारा, पाऊस, किडा, मुंगी, साप विंचू, पाळीव प्राणीं यांचे रेखाटन करतो. ह्या जीवसृष्टीत प्रत्येक सजीव निर्जीवांच एक स्थान आहे भूमिका आहे हे त्याने कित्येक वर्षांपासून च्या निरीक्षणातून अधोरेखित केले म्हणून तर तो जहरील्या जीवांची पण पूजा करतो सर्व जीवांच चक्र अबाधित रहाव म्हणून प्रार्थना करतो प्रकृती विषयीची ही जाण त्याला निसर्ग पुजक बनवते . पंचमी च्या दिवशी उपवास केला जातो खासकरून आवत्या हा उपवास करतात उपवासाला भगरीची कोंडीचा निवद दाखवून सेवन करतात तसेच हे चित्र रेखाटताना प्रत्येक घरी तेथिल सदस्य आपल्या विचार व कल्पना शक्तीने रेखाटन करतो त्यामुळे घराघरातील रेखाटन वैविध्यपूर्ण असते कट्टरपणा नसतो हे असच हवं असा अट्टाहास मुळीच नसतो फुल स्वातंत्र्य असते ह्या वैशिष्ट्य पूर्ण बाबी लक्षात घेऊन चर्चा आज सर्वत्र आदिवासी दिन साजरा केला जातो. विजय कामडी आदिवासी म्हणजे नुसते ढोल पावली नाच गाणे नाही किंवा फाटका तुटका गबाळा मजबूर लाचार तर बिल्कुल नाही तर ह्या वेशात समृद्ध जीवनशैली जगणारा मानव आहे परंतु आजकाल अंधानुकरणातून आपली शिक्षीत , सुशिक्षित पिढी ही बाहेर विकत मिळणारे चित्र घेवून ज्याची कहानी पूर्णपणे अलग आहे तिची पूजा करतात आदिवासींसाठी हे चुकीचं आहे. ह्या चित्रांमध्ये कला, प्रमाणबद्धता अपार कल्पकता आहे म्हणून तर पाश्चिमात्यांना ह्या कलेची भूरळ पडली व फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ही कला सजावटीमध्ये विराजमान झालेली पाहायला मिळते. आपली संस्कृती,आपली परंपरा जोपासण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही समुहामार्फत पंचमी रेखाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.आपल्या आदिवासी समाजात पचवी हा महत्वाचा सण असुन, आदिवासी समाजात घरील भिंतीवर शेणाने सारवुन त्यावर चुन्याच्या साहाय्याने निसर्ग देवतांचे चित्रे रेखाटून त्याचे पूजन केले जाते. परंतु सध्याच्या डिजिटल युगात ही परंपरा लोप पावत चालली आहे.आजकाल बाजारात मिळणारे चित्र भिंतीवर चिटकवून त्याचे पूजन केले जाते. परंतु ही पध्दत आदिवासी समाजाच्या संस्कृतीस शोभनीय नाही. म्हणून चांगली संस्कृती, परंपरा जोपासली जावी व ती एक पिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित तसच प्रवाहीत व्हावी या उद्देशाने नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी, शहरात राहणाऱ्या समाजबांधवांना पारंपरिक पद्धतीने पचवी रेखाटन शक्य होत नसल्याने मिळेल त्या साधनांच्या साहाय्याने पचवी रेखाटन करून त्यांनी आपली परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सणाच्या निमित्ताने या लेखाततून आदिवासी जीवनशैली वर टाकलेला एक प्रकाश झोत व दृष्टीक्षेप.
माहिती संकलनव संशोधन. रतन चौधरी. सुरगाणा. डांगी भाषा अभ्यासक.
फोटो- आदिवासी बांधवांच्या पिढीतील देव देवता.
श्री.रतनचौधरी :- " आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आदिवासी बांधव प्रगतिकडे वाटचाल करीत असून वाईट चालीरिती,रूढी, परंपरा,अंधश्रद्धेला फाटा देत. आपली प्रगती करीत आहेत. आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्यास पुढील पिढी अंधश्रद्धेचा असलेला पगडा दुर सारुन चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपली प्रगती करेल. प्रकृती हि जीवन याचा अवलंब करुन निसर्गाशी नाते जोडत आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत
( वेगवेगळ्या भागातील चालीरीती संस्कृती व परंपरा यामुळे या लेखाशी सर्वच सहमत असतीलच असे नाही.)