Ads Area

(Google Ads)

बोहाडा(भोवाडा) एक आदिम लोकोत्सव लुप्त होण्याच्या मार्गावर

*बोहाडा(भोवाडा) एक आदिम लोकोत्सव लुप्त होण्याच्या मार्गावर*. 
सुरगाणा 
( आदिम संस्कृती जतन व संवर्धनक - रतन चौधरी ९४२३०७०७९२) 
भारत भूमी हि लोक कला, रुढी, परंपरा, संस्कृती, भाषा, पेहराव यांनी नटलेली विविधांगी विविधतेत एकता या सूत्रात हारा प्रमाणे असलेली भूमी आहे. याच भूमीत आदिम लोकोत्सव 
आदिवासी लोक संस्कृतीचा उगम  प्राचीन काळापासून भारतामध्ये विविध प्रांतात बघावयास मिळतो. या आदिम लोक कला या संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन करणे हे आव्हान आजच्या  आदिवासी समाजातील शिकलेल्या तरुण युवकांपुढे उभे ठाकले आहे. लोक कलेचा हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणे आवश्यक आहे. 
साधारणपणे या लोककला निसर्गाशी निगडीत आहेत. डोंगर माऊली, अवसर, पिढी घडवणे, लग्न पद्धत या सह विविध प्रकारचे सण, समारंभ समाजात साजरे केले जातात. नृत्य हे लय, ताल,ठेका, गायन, वादन याचा मिलाफ करून सादर केले जाते. 
      आदिवासी समाजात फार पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा *भोवाडा(बोहाडा) हा* लोकोत्सव सात,पाच,चार,तीन दिवस साजरा करतात. फार पूर्वीपासून स्थायिक झालेला आदिवासी समाज हा जंगल,   डोंगर, दरी, खोरीत कोणत्याही प्रकारचे हेवेदावे, रुसवा, फुगवटा न करता एक मेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ या उक्तीप्रमाणे अत्यंत गुण्यागोविंदाने हा समाज अनादिकालापासून  नांदत एकत्र नांदत आहे.आदिवासी बांधवांचे जीवन निसर्गावर आधारित असल्याने निसर्ग देवतांची पूजा, अर्चा, नवस सायास करीत पुजा करतात.साधारणपणे १८०० व्या शतकाच्या पूर्वार्धात भोवाडा या लोककलेचा प्रारंभ झाला असावा  असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. कारण याच सुमारास आदिवासी समाज गाव, वाडा, पाडे, वसतिस्थान निर्माण करुन डोंगरावर, दरी खो-यात, पाणवठ्यावर राहून आपली उपजिविका गुजरान करु लागला होता. शेती करणे, गुरे सांभाळणे या करीता जंगलाशी संपर्क येऊ लागल्याने नैसर्गिक आपत्ती वादळ, वारा, वीज, महारोग, साथीचे आजार, पाळीव प्राण्यांचे आजार, जंगलातील हिंस्र पशू, भुते, खेते, रानवा, हिरवा, 
 वाघदेव, नागदेव, सूर्य, चंद्र, मोर, विंचू दंश आदीं पासून 
 गावाला काही कोप होऊ नये. गावात सुख समृद्धी, भरभराट लाभावी, शेतीत भरघोस उत्पन्न मिळाले पाहिजे या करीता 
निसर्ग देवतेला, गावाची रक्षण करणारी गावदेवीला जो गावाचा पुजारी( भगत) यांच्या सह गावातील बुजुर्ग जाणती माणस नवस बोलायचे की, आमच्या गावाला सुख,समृद्धी लाभली तर आम्ही पाच,सात,चार,तीन दिवस  भोवाडा उत्सवाचा जागर करुन नवस फेडण्यासाठी कार्यक्रम आयोजित करु.  निसर्ग देवतेला दिलेला शब्द कटाक्षाने पाळला जातो. भोवाडा उत्सव सोहळ्याची सुरुवात गुढीपाडवा किंवा  चैत्र महिन्यातील पौर्णिमा साजरी झाल्यानंतर भोवाडा उत्सवाचा जागर कार्यक्रमांना सुरुवात केली जाते. तेथ पासून ते जून महिन्यात पावसाला सुरुवात होईपर्यंत भोवाडा लोक कलेचा उत्सव सोहळा साजरा केला जातो. पिंपळसोंड येथील रहिवासी भोवाडा सोहळा सोंगे( मुखवटे बनविणार कलाकार) यांनी सांगितले की हि लोककला आज पर्यंत 
 सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड, उंबरवाडा(पि), मालगोंदे,
 उंबरठाण, बोरचोंड 
पळसन, हातरुंडी, खोबळा, 
 कुकूडणे, बा-हे, मोधळपाडा, वांगण(सु)  या गावाने उत्सवाचे आयोजन केले आहे. तर दिंडोरी तालुक्यातील चौसाळे, ननाशी  
 डांग जिल्ह्यातील आहवा, साकरपातळ, सुसरदा, दगुनिया, सुळे, नडगचोंड, घोड ओहोळ, 
सिलोटमाळ, नानापाडा, धोधलपाडा, डोकपातळ, 
चिकट्या, नडगखादी, दगडपाडा, 
 गुजरात बलसाड जिल्ह्यातील कोरवळ, गुंद्या, सातवाकल,  बिलदा, मामाभाचा, हनुमंत माळ, बोपी, चिकाडी, वांसदा वांगण, 
 पेठ, बागलाण तालुक्यातील साल्हेर, मुल्हेर 
 इगतपुरी,नगर मधील राजूर, अकोले ठाणे जिल्ह्यातील पालघर,डहाणू, वाडा, विक्रमगड  आदी भागात हा उत्सव साजरा केला जातो.
 फार पूर्वी आदिवासी भागात करमणूकीची साधने नव्हती त्यामुळे नवस पुर्तीच्या नावाने ओळखला जाणारा भोवाडा उत्सव पाहण्यासाठी दुर वरुन पायपीट करीत तरुण, तरुणी, बाल गोपाळ, भोवाडा नृत्य सादर करणारे हौसी कलाकार या उत्सवात हिरिरीने सहभागी होत असत. या उत्सवात अनेक तरुण, तरुणींचा परिचय होत असत याच परिचयाचे धागेदोरे पकडून अनेकांचे आदिवासी रिती रीवाज  परंपरेनुसार लग्न होत असत. या भोवाडा उत्सवा कडे एक हमखास करमणूक, विरंगुळा, मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले जात असे.
*भोवाडा उत्सवातील सोंगे/ मुखवटे*
या उत्सवात विशेषतः रामायण, महाभारत काळातील तसेच जंगलातील पशू ,पक्ष्यांची, दैत्य, असूर, दैनंदिन जीवनातील पात्रे, निसर्ग देवता आदी
प्रतिमेचे मुखवटे तयार केलेले असतात यामध्ये 
 *ताट्या (ताटी) डोक्यावर परिधान करून वाचवण्यात येणारे* रावण,श्रीकृष्ण, बळीराम(बलराम), कार्तिक स्वामी, नवनाथ, विराट, दत्तात्रेय, पंचमुखी, मारुती, विश्व स्वरूप. 
*टोप* वीरभद्र
 *मुखवटे/सोंगे* भक्त पुंडलिक, वराह( डुक्कर), गणपती, ऐडका, चाच्यासूर, सुर्पनखा, खाप-याचोर, ससा, शंकर भगवान, पार्वती, तारकासूर, नळ निल, तिळसंक्रात, पोपट, एकादशी, व्दादशी, काळभैरव ( काळ बहिरम), संद्रयासूर, वाल्मिकी, नारदमुनी, चंद्र, सूर्य, भीम, अर्जुन, ज्योतिर्लिंग, अश्व( घोडा), गरुड, श्रावणबाळ कावडधारी,त्राटिका, आसाळी, सोंड्या दैत्य,बुद्ध बृहस्पति, कच्छ(कासव),मत्स्य (मासा), मयुर (मोर), नंदी(बैल), झुंबाड, मारुती, नडग( अस्वल), वाल्या कोळी (वाल्मिकी),नाग, नागिन,
*इतर कलेची पात्र* सरस्वती, महिषासुर, शंखासुर, रावण, राम, लक्ष्मण, सिता, त्रिपुरासूर(शंकर), मारुती ( जंबुमाळी), त्राटिका ( राम, लक्ष्मण), भिक्षादित्या( विटाळ), विक्रमादित्य वेताळ राजा, खंडेराव, गजासूर शंकर, इंद्रजित रावणाचा पुत्र, खाप-या, नृसिंह, आगे वेताळ ( अग्नी देवता), शेंद-या सूर, एकादशी, मृतमाय, मृत मान्य, बाळंतीण, भीम अरासंघ, रक्तादेवी, रक्त बीजे, अंबामाता, भस्मासुर, मोहिनी, वीरभद्र दक्ष राजा, हिरण्यकशिपू, कयाटू, टुगू, चारण हे मनोरंजनाचे लोक कलेवर आधारित सोंग आहे,
*भोवाडा उत्सवाचा कार्यक्रम कालावधी*
 भोवाडा उत्सवाचा कार्यक्रम हा पाच,ते सात दिवसांचा असतो. 
भोवाडा उत्सव असलेल्या गावात पाच ते सात दिवस आनंदाचे, उत्साही,चैतन्याचे वातावरण भारलेले असते. गाव वेशीवर आंब्याचे, गवत, भाताच्या साडाचे, कागदाचे रंगीबेरंगी पताका,तोरण गावभर बांधून सजवले जाते. गावाच्या मध्यभागी एका सागाच्या दांड्याला गवताची पेंढी बांधून त्या जागेची पूजा करुन तो लाकडी दांडा मंदीरा समोर उभा केला जातो त्याला मुरवत( मुहूर्त) असे म्हटले जाते. या काळात सगे, सोयरे, नातेवाईक यांना भोवाडा उत्सवाचे निमंत्रण दिले जाते. या दिवसात गावातील पाच घरी गौराई घातली जाते. येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी वापरण्यात येणारे पाच प्रकारचे धान्य/ कडधान्ये बांबूच्या टोपलीत उगवण्यासाठी पेरणी केली जाते. बियाणे उगवण, रुजवण क्षमता तपासणी केली जाते. भोवाडा उत्सवाचा समारोप हा मंगळवार किंवा शुक्रवार या दोन्ही पैकी एका दिवशी देवीच्या मिरवणुकीत तरुणींच्या गौराईने समारोप केला जातो. 
या उत्सवात आदिवासींचे काळ्या( वाजंत्री), संबळ हे वाद्य वाजवित लय,ताल,सुर,ठेका, चाळा, शेकडा, गौळण, रावण चाळा असा वाजंत्रीचा ताल धरत संबळाच्या तालावर नृत्याचा ठेका धरला जातो. अत्यंत बेभान होऊन अनवाणी नृत्य केले जाते. भोवाडा उत्सवाची सुरुवात निसर्ग देवतेची आराधना करीत गावदेवीची पूजा अर्चा करुन सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ठरलेल्या दिवशी सुरुवात केली जाते. राॅकेलची   हातात पेटती  मशाल( टेंभा) धरुन उजेड दाखवून प्रत्येक सोंगाला मिरवले जाते. 
प्रथम हातात आंब्याच्या डहाळ्या (डाखळ्या)  धरुन लहान मुले नाचत सुरुवात होते. त्यानंतर झुंबाड या सोंगाचा संच ताफ्याने मुलेच नृत्य करीत असतात. मुखवटे वाचवायची सुरुवात जेथून केली जाते तेथेच परत आल्यावर तेथे मुखवट्याची माहिती,अख्यायिका, पार्श्वभूमी सांगितली जाते या माहितीला 'सपादनी' असे म्हटले जाते. सपादनी देणारा हा वेद, उपनिषदे, पुराण, पौराणिक कथा, रामायण, महाभारत,साहित्य यामध्ये पारंगत जाणकार असणे गरजेचे आहे. 
अशा टप्प्या टप्प्याने दरदिवशी दोन, तीन, चार तास असा कालावधी वाढवून शेवटच्या दिवशी सकाळी देवीच्या मिरवणुकीने सकाळी सात ते आठ वाजता भोवाडा उत्सवाचा समारोप केला जातो.
*भोवाडा लोक कला लुप्त होण्याच्या मार्गावर*
  फार पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आदिवासींची लोककला आज  आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात लोप पावत नामशेष कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. या कलेकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न बघता आदिवासींची पारंपरिक लोककला, संस्कृती, रुढी, परंपरा  म्हणून याकडे पहाणे संयुक्तिक ठरेल. आज आदिवासी पारंपरिक वाद्य, पारंपरिक पद्धतीने गायली जाणारी मौखिक गीते, लग्न गीते हि इलेक्ट्रॉनिक  परदेशी वाद्य मुळे रिमिक्स होत चालली आहेत. सर्वच बाबतीत आदिवासी संस्कृतीवर आक्रमण सुरू झाले आहे. या भोवाडा उत्सवामुळे गावातील संघटन, हेवेदावे, रुसवा फुगवे, कठीण परिस्थितीत सुख दुखात एकमेकाला सहकार्य करणे, मदतीला धावून जाणे, सलोख्याचे संबंध, एकजूट, खंबीर नेतृत्व, आमचे गाव, आमचे सरकार,भांडण तंटा गावपातळीवर सोडवणे, परस्पर समन्वय, सहकार्य या गोष्टी सहजपणे घडून येत असत. असे उत्सव होत नसल्यामुळे गावात एकोप्याने, गुण्यागोविंदाने नांदणे, थोरा मोठ्याचा सन्मान, आदर बाळगणे या गोष्टी गावपातळीवरुन हद्दपार होतांना दिसून येत आहेत. यामधील वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा अंगिकार करून या नामशेष होण्या-या कला संस्कृतीची जोपासना करणे आवश्यक आहे. 
*मुखवटे बनविणारे कलाकारांची वाढला*
  भोवाडा उत्सवासाठी लागणारे कागदी मुखवटे बनविणारे कलाकार हे दुर्मिळ झाले आहेत. दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव  येथे साठ ते सत्तर वर्षापुर्वी  पुंजा महाले पाटील हे कागदी लगद्यापासून मुखवटे तयार करीत असत. तदनंतर त्यांचा मुलगा भास्कर महाले यांनी हि कला हस्तगत केली होती. तेथेच तुकाराम तेली हा कलाकार मुखवटे साकारत असे त्यांचे निधन झाल्याने हि कला लोप पावली त्यांच्या कडून मुखवटे तयार करण्याचे कौशल्य शिकलेले पिंपळसोंड ता. सुरगाणा येथील  शिवराम चौधरी हे हुबेहूब मुखवटे तयार करीत आहेत.
*भोवाडा उत्सवाचे मुखवटे पोहचले दिल्लीत लाल किल्लाच्या सांस्कृतिक कार्यक्रम मंचावर*

शिवराम चौधरी या कलाकारने बनविलेले मुखवटे हे
२६ जानेवारी २०२३ च्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील लाल किल्लावरील राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकाविला जातो तेथील सांस्कृतिक कार्यक्रम मंचावर नृत्य करण्यात आले. आहवा डांग जिल्ह्यातील दवळीदोड येथील कलाकार यांनी भारतीय सांस्कृतिक कार्य मंत्रालय नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात या मुखवटयांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच बीग बि  फिल्म स्टार अमिताभ बच्चन यांनी गुजरात  सरकार सांस्कृतिक कार्य मंत्रालय गांधीनगर यांच्या तर्फे गुजरात टुरिझम सापुतारा फेस्टिवल मध्ये  हे मुखवटे परिधान करून गुजरात टुरिझमची जाहिरात दुरदर्शन वर झळकली आहे. दरवर्षी सापुतारा फेस्टिवल मध्ये भोवाडा उत्सव कलापथक सहभागी होत आहे. शिवराम चौधरी यांनी कणसरा चौक नाशिक, अहमदाबाद, बडोदा, सापुतारा म्युझियम, राजस्थान, ओरिसा, आदिवासी संशोधन परिषद पुणे, इंदौर मध्ये प्रदेश, जागतिक आदिवासी गौरव दिन, जिल्हा परिषद आयोजित कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम, चॅनेल एबीपी माझा, टि.व्ही 9,मिग ओझर  आदी ठिकाणी झालेल्या  कार्यक्रमात भोवाडा कला पथकाने कला सादर करुन दाद मिळवली आहे.
 या लोककलेचा जतन व संवर्धन होणे हि काळाची गरज बनली आहे. या करीता कलेची गोडी असणाऱ्या रसिकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
 ( भोवाडा उत्सव कलाकार  शिवराम चौधरी रा.पिंपळसोंड ता. सुरगाणा जि. नाशिक ( महाराष्ट्र) संपर्क ७५८८४८६११०/७७४४०४०८५७)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad