Ads Area

(Google Ads)

आदिवासी भोवाडा उत्सव परंपरा: आमची संस्कृती आमचा अभिमान

आदिवासी भोवाडा उत्सव परंपरा: आमची संस्कृती आमचा अभिमान
    *भोवाडा कलेचा उगम* आदिवासी समाजात सण उत्सव, संस्कृती यांना मौखिक अधिष्ठान लाभले आहे.या लोककला, लोकथा मौखिक परंपरा असली तरीही यामध्ये नैसर्गिक रित्या जीवन जगण्याचे सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळते.त्यापैकीच एक भोवाडा अर्थात बोहाडा हि कला आदिवासी समाजात १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून सुरु असल्याचे दिसून येते.
*कलेचे धार्मिक व सामाजिक, सांस्कृतिक अधिष्ठान*
भोवाडा कलेला पुर्वी पासूनच अधिष्ठान लाभले आहे.समाज निसर्गाच्या सान्निध्यात रहात असल्याने  निसर्गातून मिळणा-या पारंपरिक साधनांचा वापर करून करमणुकीचे साधने निर्माण केली. पुर्वी काष्ठ शिल्पकार हे लाकडाचा वापर करुन सोंगी मुखवटे तयार करीत असत. लाकडावर कोरीव नक्षीकाम करून हुबेहूब मुखवटा तयार करणे हे काम हत्यारां अभावी पुर्वी खुपच जिकिरीचे तसेच वेळ खाऊ पणाचे होते.एक मुखवटा तयार करण्यास कित्येक दिवस लागत होते.
*भोवाडा व्यतिरिक्त  आजही अनेक परंपरा आदिवासी समाजात पहायला मिळतात*
फार प्राचीन काळी करमणुकीचे साधने नसायची त्यामुळे हा पारंपारिक बोहाडाची सुरुवात करण्यात आली. देवदेवतांचे संरक्षणासाठी निसर्गातील देवदेवतांचे सोंगे, मुखवटे नाचविण्याची प्रथा सुरू झाली. 
भोवाडा,बोहाडा बरोबरच तारपा नृत्य, ढोल, तुर, मांदोळ, डोंगरदेव माऊली, नवरात्र महोत्सव, सण समारंभ, आदिवासी रुढी परंपरा, लोककथा, लोकगीते, मौखिक परंपरा,खाद्य संस्कृती, पेहराव, नैसर्गिक साधन संपत्तीचा मर्यादित वापर करुन आनंदीत जीवनशैली जगणे हे समाजाला लाभलेले एक वरदान आहे. 
*भोवाडा उत्सव  लोककला, लोकनृत्य एक अमूर्त पारंपरिक वारसा*
भोवाडा उत्सवाची तयारी वर्षभरापूर्वी पासून केली जाते.आपल्या गावात सुख, शांती समृद्धी लाभावी, शेती, गोधन,व्यवसाय यामध्ये भरभराट व्हावी, गाव, कुटुंबावर कोणत्याही प्रकारची रोगराई, आपत्ती,जोखीम, संकटं येऊ नये,गुरे, वासरे सुरक्षित असावीत, धनधान्य भरभरून पिकू देत आदी गोष्टी  निसर्ग देवतेला साक्ष ठेवत 
साध्य करण्यासाठी नवस, सायास बोलला जातो तो फेडण्यासाठी पाच, चार ते सात दिवसाचा भोवाडा उत्सवाचे आयोजन लोकवर्गणीतून साजरा करण्याची पद्धत आहे.
*भोवाडा उत्सव साजरा करणा-या जमाती*
सह्याद्री,सातपुडा, कळसूबाई पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या कोकणा, कोकणी,भील,पावरा, मावची, वारली, महादेव कोळी, पारधी, कातकरी आदी जमाती मध्ये भोवाडा उत्सवाचे आयोजन केले जाते.पालघर,जव्हार,पेठ,साल्हेर, मुल्हेर,सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, पिंपळसोंड, बोरचोंड,बा-हे, कुकूडणे, हातरुंडी तर
दिंडोरी तालुक्यात चौसाळे, अंबानेर,उमराळे चाचडगाव पेठ तालुक्यात दलपतपूर, करंजाळी 
नगर जिल्ह्यातील राजूर, अकोले भागातील डांगण भागात, 
पांजूरे आदी ठिकाणी शंभर ते सव्वाशे वर्षे जुनी परंपरा आढळून येते.
*भोवाडा थापन*
 भोवाडा स्थापना ज्या दिवसापासून करायची आहे त्या दिवसाच्या मुहूर्तमेढ रोवण्यात येणा-या दिवसाला थापन म्हटले जाते.चैत्र पौर्णिमा संपल्यावर बोहाडाची स्थापना केली जाते.गाव सिमेवरील रस्त्यावर गवताची दोरी विणून  आंब्याची डहाळी, पाने लावून तोरण बांधले जाते.गावात मध्यवर्ती ठिकाणी एक खांब उभा करुन त्याला गवताची, भाताची पेंढी बांधून नारळ अर्पण करुन थापन केली जाते.मंगळवार किंवा शुक्रवारी सुरुवातीच्या दिवशी  सात वाजता स्थापना केलेल्या ठिकाणापासून मारुती मंदीरा पर्यंत कहाळी, संबळ, नगारा वाजंत्री वाजवून पूजेचे ताटाची डोक्यावर वस्र धरुन गाव भगत पुजारी याला पुजा करण्यासाठी मिरवत घेतले जाते. मंदिरात नारळ अर्पण करुन पूजा करतात.
सुरुवात हि मंगळावर, शुक्रवार या दिवशी केली जाते तर त्याच दिवशी देवीची मूर्ती मिरवणूक काढून बोहाडाची सांगता केली जाते.
*शिवराम चौधरी कलाकार जोपासतात पारंपरिक वारसा*
आदिवासी चालीरीती, परंपरा, संस्कृती हे समाजाला जगण्याची नव उमेद देत आहे.बोहाडा हा उत्सव निसर्गातील देवदेवता यांच्याशी नाते जोडणारा एक दुवा आहे. प्रत्येक मुखवटा हा   देवाशी आपुलकीचे नाते जोडणारा आहे. कागदी लगद्यापासून कलाकृती तयार करीत आहेत.पुर्वी लाकडाच्या तुकड्यातून देव देवतांची कलाकृती निर्माण केली जात असे.हि कला आजच्या आधुनिक विज्ञानाच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवली आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती घडवून आल्यानंतर मनोरंजनाची साधने निर्माण झाल्याने तमाशा, बोहाडा सारख्या लोककले कडे दुर्लक्ष झाले होते. 
या कले कडे हि जूनाट,टाकाऊ, मागासलेल्या समाजाची
कलाकृती आहे असा गैर समज झाल्याने काही काळ हि कला थांबली होती.या कडे बघण्याचा दृष्टीकोन आज वाढीस लागत आहे. चौधरी परिवारात चौथी पिढी आज भोवाडा उत्सवात रमली आहे. 
*निसर्ग देवतां व रामायण, महाभारतातील पात्रांचा समावेश*

*मांडव डहाळ्या*
 भोवाडा उत्सवाची सुरुवात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास होत असल्याने प्रत्येक सोंग सोबत संबळ,कहाळीच्या ताल, लय, ठेक्यावर नृत्य सादर केले जाते.हातात आंब्याच्या डहाळ्या व सोबत खुळा घेऊन "डाखळ्या" ची मिरवणूक काढली जाते. प्रत्येक मुखवट्याची ती मिरवणूक मारुती मंदीरा पर्यंत पोहचवून त्याविषयी महती, कार्य, उत्पत्ती याचे वर्णन करीत सांगता केली जाते. 
*गणपती सोंग*
गणपतीचे सोंग हे गणपतीची आरती वाजंत्रीवर वाजवून सुर संगम सुरात दोन मुखवटे भगवान शंकर,पार्वती एका रांगेत नृत्य करण्याची प्रथा आहे. मुखवटा परिधान करणा-याच्या कमरेला मागील नृत्यकलाकार नाचत असतो. संबळाच्या तालावर ठेक्यावर नृत्य सादर केले जाते. शृंगार करून पिंताबर वस्र परिधान करतात.दोन्ही हातात रुमाल असतात. 
मंदिराच्या आवारात गणपतीची आरती करून आख्यायिका सांगितली जाते.
*सारजा/ सरस्वती मयुरेश्वर*
सारजा हे मोरांचे सोंग आहे. पुरुष महिलेचा पोशाख परिधान करून हे सोंग नाचविण्याची प्रथा आहे.अलीकडे युवती पण सारजा नृत्य सादर करतात.मोरांचे पिसे खोवलेला कमरपट्टा असतो तो कमरेला मागील बाजूस बांधून नृत्य करतात.मोर नृत्य लक्ष वेधून घेणारे असते. वाजंत्रीच्या ठेक्यावर पावले पडतात.
*एकादश द्वादशी*
हे सोंग महिलांच्या पात्र घेऊन पुरुष सोबत नृत्य सादर करतात.साज, शृंगार चढवित पायात पैंजण, घुंगरु बांधून ठेक्यात नृत्य सादर केले जाते. अनवाणी हे नृत्य केले जाते.
*झुंबाड*
झुंबाड मुखवटे हे राक्षसांचे रक्षक  रुपात दर्शन घडविले जाते. पाच ते सात आक्राळ, विक्राळ चेह-यांचा समुह झुंबाडांचा असतो.विशेषत: हे मुखवटे हौस मौजेने लहान मुले बांधून नाचतात. 
*खाप-याचोर*
खाप-याचोर हे सोंग हातात कोयता किंवा धारदार शस्त्र घेऊन दरोडेखोर दरोडा टाकून पळून जाण्याचा तयारीत खाप-याचोर असतो. त्याच्या कमरेला दोर बांधून  एकाने जेरबंद केले आहे. पुढे नृत्य करणा-या साधु संताच्या हातात माळ आहे. ती माळ खाप-याचोराच्या
 गळ्यात टाकली जाते.
चोरी करणे हे पाप आहे, वाईट आहे  असे दर्शविले जाते.तेव्हा पासून तो सन्मार्गाला चालतो असा संदेश या नृत्यामध्ये दिला जातो.
*एडका*
एडका हे मेंढपाळ यांचे सोंग असलेला आहे.हे सोंग नाचवितांना शिंगानी समोरच्याला  मारायची कृती दाखवली जाते.समोर झाडाची पाने, फांद्या दाखवून त्याला पुढे पुढे नृत्य सादर करीत घेतले जाते. 
*डुक्कर वराह*
डुक्कराचे सोंग खुपच मजेशीर असते.कमरेला पंचा नेसून शरीर उघडे ठेवून संपूर्ण चिखलात लोळण घेत हे नृत्य सादर केले जाते.अंगावर पाणी ओतले जाते. प्रेक्षकांच्या अंगावर धावून गेले की प्रेक्षक पळ काढतात.
*वाली सुग्रीव*
 वाली सुग्रीव या सोंग मध्ये हातात तलवारी घेऊन युद्धाचा प्रसंग दाखवला जातो.दोन्ही मुखवटे समोरासमोर 
नाचवत मिरवणूक काढण्यात येते. 
*नृसिंह,नरशी*
नृसिंह हे सोंग भक्त प्रल्हादासाठी श्री नारायण भगवान यांनी घेतलेला नृसिंहाचा अवतार. हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर क्रोध शांत करण्याचा प्रसंग सादर केला जातो. हा मुखवटा आकाराने विशालकाय रुप धारण केलेल्या रुपात दाखवला जातो. दोराने पाठीशी  बांधून हा मुखवटा नाचवितात. या सोबत अनेक नृत्य कलाकार नृत्य सादर करतात. 
*हिडींबा*
हिडींबा हे सोंग महिलेचा वेश धारण करून 
 दोन्ही हातात टेंभे धरुन अग्नी प्रज्वलित करुन नृत्य सादर केले जाते. राम, लक्ष्मण, 
रावणाच्या युध्दाचा प्रसंग असतो. बोहाडा परंपरेत सर्वात आकर्षक सोंग महिलेच्या रूपात नृत्य दाखवतात. याकडे रणरागिणीचा भस्मसात करण्याचा प्रसंग असतो. हे सोंग मानाचे समजले जाते. शारदीय नवरात्र महोत्सवात नृत्य सादर केले जाते. 
*सूर्य चंद्र*
 सूर्य चंद्राची मिरवणूक मोठ्या थाटात घोड्यावर बसवून सोबत काढली जाते. 
*मारुती, बजरंग बली*
 मारुतीचे सोंग मानाचे बळ शक्ती असलेले समजले जाते. हातात गदा, पाठीमागे शेपटी लावून हे सोंग मिरवतात. 
*महादेव शंकर*
महादेव शंकराचे सोंग मानाचे असते.शंकराचा वेश धारण करून हे सोंग मिरवतात. 
*घोडा अश्वथामा*
घोडा हे सोंग घोडाचा चाळा" घोडा रे रावता.. घोडा खेळवता" या गाण्याची चाल लावत रुबाबदार ऐटीत हातात तलवार घेऊन हे सोंग मिरवतात.घोड्यावर स्वार होऊन हातात वेशन धरीत घोडा उडवतात.सोबत मावळे सहकारी नृत्य सादर करतात.शुर,वीरतेचे दर्शन घडते. 
*काळ बहिरी,भैरवनाथ*
काळभैरव हे सोंग महिलेच्या रूपात काळे कपडे घालून नृत्य करतात. हातात तलवारी असतात.काही महिला ओवाळतात. सोबत खंडेराव महाराज घोड्यावर स्वार होऊन येळकोट येळकोट.. जय मल्हार चा जयघोष केला जातो. 
*निळोबा, विरोबा*
घोड्यावर स्वार होऊन हे सोंग मिरवतात. 
*वेताळ,अग्नी देवता*
वेताळ हे अग्नी देवतेची उपासना म्हणून याकडे पाहिले जाते. बोहाडा परंपरेतील सर्वात आकाराने मोठे अवजड व आक्राळ, विक्राळ रुप धारण केलेले सोंग आहे.देवी पाठोपाठ हे सोंग मानाचे समजले जाते.सोबतीला वेताळाचा टोप असतो.हा तीन तालाचा असतो. प्रत्येक तालात  रंगीत ताव कागदाने बंद करून त्यामध्ये रंगीबेरंगी मेणबत्त्या लावून उजेड टाकला जातो. काही ठिकाणी अग्नी निर्माण करतात. 
*भीम*
भीम हे सोंग महाभारतातील सर्वात बलवान पात्र ठरले. हातात गदा घेऊन सोबत कसरती दाखवून हे सोंग मिरवतात. 
*शूर्पणखा*
शूर्पणखा हि रामायणातील सर्वात सौंदर्य असलेली लंकाधिपती राजा रावणाची बहिण.आकर्षक झगा घालून दोन्ही हातात तलवारी धारण करून नृत्य केले जाते. नाक कापलेले असल्याने बसके असते. सोबत धनुर्धारी लक्ष्मण असतो. 
*कर्ण, अन्याय देवी, पाच पांडव*, 

*रक्तायदेवी*
रक्तायदेवी च्या ताटीला दोन्ही बाजूंनी मुखवटे लावलेले असतात.
*देवी मुखवटे*
हे देवी मुखवटे महिषासुरमर्दिनी, जगदंबा माता, ऐना देवी, मरदेवी,देवी महालक्ष्मी, आदीमाया शक्ती तुळजाभवानी, 
या रुपात देवीचे सोंग मिरवतात.राक्षस दैत्यसूर, महिषासुर यांचा नायनाट करण्यासाठी देवीनी अवतार घेतला आहे.वाईट, खोटे यांचा नाश करणे,शक्ती अपरंपार आहे अशी धारणा आहे.देवीचे सोंग शुक्रवारी किंवा मंगळवारी सकाळी मिरवणूक काढली जाते. यावेळी अंगात वारा भरतो, जोम संचारतो, अंग थरथरत असते. महिला तल्लीन होत संमोहित होतात. मिरवणूकीत फुलांचा वर्षाव होतो. युद्धाचा प्रसंग साकारला जातो.( संकलन- शब्दांकन रतन चौधरी..9423070792
 आदिवासी संस्कृती संवर्धक- अभ्यासक)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad