धुळे जिल्हयातील शिरपूर तालुकयातील थाळनेर हे लता मंगेशकराचे आजोळ आहे. लता दिदीचा जन्म मध्यप्रदेशातील इंदौर २८ सप्टेंबर १९२७ रोजी येथे झाला असला तरी त्यांचे बालपण थाळनेर येथेच गेले आहे. १जून १९३२ रोजी थाळनेरमधील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये त्यांची शिक्षणाची सुरुवात झाली. १९३७ पर्यत त्या ५-६ वी चे शिक्षण घेऊन १९४२ ला कोल्हापूर येथे गेल्यात. त्यानंतर मात्र त्या पुन्हा थाळनेरला आल्याच नाहीत. थाळनेर गावात लता मंगेशकराच्या आई माई मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त खंडेराव महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे. ते आजही आहे. थाळनेर गावात आजही लता दिदीच्या बालपणाच्या आठवणी आहेत. त्यांच्यासह चार बहीणी वडीलांच्या नाटक कंपनीला मदत करत असे. थाळनेरला १८ एकर शेत, घर आहे. थाळनेरचे जमादार यांच्यासाठी एक गाणे देखील लता दिदीनी गायले आहे. मध्यतरी १९९५-९६ ला जळगाव येथे गाण्याच्या कार्यक्रमांनिमित्त हदयनाथ मंगेशकर व राधा मंगेशकर व जळगांव आकाशवाणी कला कार आले होते. ते आमच्या थाळनेर येथे असलेल्या १५० वर्षा पूर्वीच्या गणपती मंदिरात आले होते तेव्हा त्यांनी व राधा मंगेशकर यांनी गाणे म्हटले होते लता दिदी च्या वाढ दिवसाच्या दिवशी प्रती वर्षी थाळनेर येथील गणपती मंदिरात गाण्याचे कार्यक्रम सांस्कृतिक मंडळामार्फत होत असत. साधारण १५ वर्ष मोरेश्वर भावे सर व त्यांचा चिरंजिव नरेद्र भावे व स कुटुबिय व सांस्कृतिक मंडळ८ त्याच प्रमाणे कै. रमण भाई गुजराथी यांनी पुढाकाराने प्रती वर्षी कार्यक्रम केले त्यानंतर मात्र कोणीही आले नाही.
दरम्यान थाळनेर करांनी लता दिदीकडे संगीत विदयालयाची मागणी केली आहे. परंतु त्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. आजही थाळनेर ग्रामस्थ लता दिदी आपल्या आजोळ मध्ये याव्यात अशी इच्छा व्यक्त करीत आहेत. मात्र मंगेशकर कुटूंबातील कोणीही भेट देयायाला आलेले नाही.
*अलविदा दीदी*
*कल भी सुरज निकलेगा, कल भी पंछी गायेंगे,*
*सब तुझको दिखाई देंगे, पर हम ना नजर आयेंगे.*
लता दीदींच्याच गीतातील हे एक कडव आज पुन्हा पुन्हा मन अस्वस्थ करुन जात आहे. आज दीदी गेल्या, आता कधीही त्या आपल्याला दिसणार नाहीत पण तरीही आपल्या हजारो गीतांच्या माध्यमातून ही मराठमोळी खान्देश कन्या जगभरातील रसिकांच्या मनात अजरामर राहील यात शंका नाही.
भारतरत्न आपल्या महाराष्ट्राचं भुषण त्यातल्या त्यात खान्देशच वैभव असलेल्या लता दिदींमुळे भारताच नाव सांगीतिक क्षेत्रात जगाच्या कानकोपऱ्यात पोहचलं. त्यांच्या सुरेल आवाजामुळेच भारतीय गायन क्षेत्र जगात एका विशिष्ट उंचीवर पोहचलं आहे. लता दीदींचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे.
आपल्या जादुई अशा सुमधुर आवाजाने अवघ्या विश्वभरातील अब्जावधी रसिकांना मंत्रमुग्ध करणा-या मराठमोळ्या गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्म त्या काळातील प्रसिध्द रंगमंच कलाकार मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि शेवंती (माई )मंगेशकर यांच्या पोटी पहीले अपत्य म्हणुन दि. २८ सप्टेंबर १९२९ रोजी मराठी परीवारात ईंदौर येथे झाला. त्यांचे मुळगाव सातारा हे असुन त्यांचे आजोळ (मामाचे गाव ) शिरपूर तालुक्या जवळील थाळनेर हे आहे. लता, उषा, आशा, मिना आणि भाऊ हृदयनाथ म्हणजे मंगेशकर कुटुंबाचे पंचरत्न होय. वयाच्या पाचव्या वर्षापासुनच लता दिदींच्या सुमधुर आवाजाची कल्पना वडील दिनानाथ मंगेशकरांना येऊ लागली होती. त्यामुळे त्या वयापासुनच दिदींना गायनाचे धडे आपल्या घरातुनच मिळु लागले होते.
७ व्या वर्षी त्यांनी एका नाटकासाठी प्रथमत: गायन केले. त्यानंतर वयाच्या ९ व्या वर्षी *किती हसाल* ह्या मराठी चित्रपटातसाठी त्यांनी सर्वप्रथम बालगीतासाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या चित्रपटात त्यांना गायनाची संधी मिळाली परंतु ते चित्रपट एवढे चालले नाहीत...... हाय रे दुर्दैव वयाच्या १३ व्या वर्षी वडील दिनानाथ मंगेशकर यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन.... त्यांच्या अकाली निधनाने लतादिदींच्या आई माई मंगेशकर यांना मोठा मानसिक धक्का बसल्याने त्या आजारी पडल्या तेव्हा कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी १३ वर्षीय लता मंगेशकरांवर येउन पडली. संपुर्ण कुटुंबाची हेळसांड होऊ लागली दोन वेळेसच्या जेवणाची देखील पंचायत होउ लागली त्यावेळी दिनानाथ मंगेशकरांचे जवळचे मित्र मास्टर विनायक यांनी संपुर्ण मंगेशकर कुटुंबीयाला खुप मदत केली व त्यांना मुंबईत आणले. कुटुंबाला पुढे आणण्यासाठी लता दिदींनी मिळेल ते काम स्विकारले.
सुरुवातीच्या काळात तर दिदींनी साड्यांच्या मिल मधे देखील काम केले. मास्टर विनायक यांची सिनेसृष्टीत चांगली घसरट होती त्यामुळे त्यांनी लता दिदींना एका नायिकेच्या रुपात सिनेसृष्टीत आणले. परंतु मेक अप करणे, अभिनय करणे हे दिदींना आवडत नसल्यामुळे त्यांचे मन लागत नव्हते पण तरीही कुटुंबासाठी त्यांना हे करावेच लागत होते. एके दिवशी शुटींगच्या आधी सेटवर दिदी सहज एक गाण गुणगुणत होत्या तेव्हा त्यांचा आवाज मास्टर गुलाम हैदर यांनी ऐकला. मास्टर गुलाम हैदर म्हणजे त्या काळातील प्रसिद्ध गीतकार आणी लेखक होते. त्यांना दिदींचा आवाज एवढा आवडला कीं ते ताबडतोब दिदींना एका मोठ्या संगीतकाराकडे घेऊन गेले. तेव्हा त्या संगीतकाराने त्यांच्या मंगेशकर ह्या मराठी आडनावावर आक्षेप घेत " मंगेशकर याने मराठी हो? वो क्या है महाराष्ट्र के लोगो के बोलो मे दाल चावल की बु होती है| और वैसे भी आपकी आवाज तो बहोत पतली है, यह आवाज नही चलेगी" असे म्हणुन टर उडवली. लता मंगेशकरांना ही गोष्ट खुप खटकली. त्यांचा स्वाभीमान दुखावल्याने त्या तात्काळ तेथुन रडत निघुन गेल्या. मास्टर गुलाम हैदर यांनाही ही गोष्ट खुप खटकली त्यांनी मग लता दीदीँना शांत करत संगितले की, "देख लता तेरी आवाज मे जो मधुरता है ना वो किसिकी भी आवाज मे नही है, और हा मेरी एक बात हमेशा याद रखना भविष्य मे तुम्हे ऐसे बहोतसे निंदक मिलेंगे तब तु उनकी बात का बुरा मत मानना और उनकी बातो को हंसकर टाल देना आगे चलते रहना और गाते ही रहना देख एक दिन तुम्हारी यह आवाज ही तुम्हारी पहचान बन जाएंगी और इस दुनिया मे तुम्हारा बहुत नाम होगा|" अस सांगुन त्यांनी दिदींना स्वत:च्या पिक्चरमधे गायनाची संधी दिली.
सन १९४२ मधे हिंदी फिल्म *मजबुर* मधील *दिल मेरा तोडा* हे गित म्हणजे लता दिदींच्या हिंदी सिनेमातील पहीले गीत होय. त्यानंतर मात्र दिदींनी मागेवळुन बघीतले नाही. सन १९४९ मधील *महल* मधील *आयेगा आनेवाला* हे गित म्हणजे दिदींच्या कारकिर्दीतील पहीले सुपरहिट गीत होय. दिदींचे एकामागुन एक गीत सुपरहिट होत गेल्याने अल्पावधीतच त्यांचे नाव जगाच्या कान्याकोप-यात पोहचु लागले. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढु लागल्याने त्यांच्याच एका प्रतिस्पर्ध्याने सन १९६२ मधे दिदींना त्यांच्या जेवणातुन स्लो पॉईझन देउन ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुष्याची दोरी मोठी असल्याने व डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नाने त्यांना वाचविण्यात यश आले. जवळपास तीन महिने लता दिदी अंथरुणाला खिळुन होत्या पण त्यानंतर देखील कुठलीही हार न मानता पुन्हा जोमाने त्यांनी आपल्या कारकिर्दीला जोरदार सुरवात केली. सन १९४२ ते आजपर्यंत लता दिदींनी एकुण ५२,००० गीत गाउन जागतिक विक्रम केला. गिनीज बुक अॉफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे त्यांच नाव नोंदल गेले. त्यांच्या बावन्न हजार गाण्यांमधे हिंदी, मराठी सहीत इतर ३६भाषांमधील गाणे, भुपाळी, आरत्या, ओव्या, भक्तीगीते यांचाही समावेश आहे. त्यांच्या जिवनात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार *भारतरत्न* ने देखील त्यांना गौरवण्यात आल. सिनेसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासुनच लता दिदी ह्या क्षेत्रात काम करींत असल्यानेच बॉलिवुड मधील सर्वाधिक मोठी कारकिर्द ही लतादिदींचीच नोंदवली गेलेली आहे.
अगदी सुरुवातीच्या काळातील नायिका मधुबाला,नर्गीस, आशा पारेख, जया भादुरी, हेमामालिनी, रेखा, श्रीदेवी, माधुरी दिक्षीत, काजोल ते आत्ताच्या करीना कपुर, दिपीका पादुकोन, आलीया भट, जान्हवी कपुर ह्या सर्वच नायिकांना त्यांनी आपला आवाज दिला. शतक बदलले... पिढ्या बदलल्या... पडद्या वरच्या नायिका बदलत गेल्या... पण आवाज मात्र एकच राहीला तो म्हणजे लता मंगेशकरांचा. चित्रपटात आईची जागा मुलीने घेतली आणि आता नातीने... पण आई पासुन ते नातीपर्यंत सर्वांना आवाज देणा-या लता मंगेशकर ह्या विश्वातील एकमेव गायिका ठरल्या आणि विशेष म्हणजे त्यांचा आवाज आजही अगदी शेवट पर्यंत तितकाच चिरतरुण ठरला. अस म्हणतात की मध कितीही जुनं झाल तरी त्याच्यातील गोडवा मात्र तसाच राहतो... लता दिदींच्या आवाजात हे समीकरण बरोबर लागु पडते... त्यांचे वय जस जसे वाढत गेले तरी त्यांच्या आवाजातील मधुरता मात्र सदैव तेवढीच राहिली. ही खरोखर दैवी देणगीच तर आहे की ज्या वयात माणुस नीट बोलुही शकत नाही त्याच वयात तेवढ्याच उमेदीन आणी मधाळ पणे गात राहण म्हणजे दैवी चमत्कारच म्हणाव लागेल. अगदी आत्ताच म्हणजे एप्रिल 2019 मधे पुलवामाची घटना घडली त्यावेळेस पी. एम. नरेंद मोदी यांचे *सौगंध मुझे इस मीट्टी की मे देश नही झुकने दुंगा* हे गाण म्हणजे एखाद्या सोळा वर्षाच्या तरुणीला सुध्दा लाजवेल अशा शैलीत त्यांनी म्हटल. त्यांच्या सुमधुर आवाजामुळेच पडद्यावरील प्रत्येक नायिकेच सौंदर्य अजुनच खुलुन दिसल. दिदिंनी प्रत्येक प्रकारातल गाण गायल. फिल्मी गाणी असो किंवा भक्तिगीत असो किंवा मग देशभक्तीपर गीत असो त्यांच्या आवाजाचा कोणीही मुकाबला करु शकले नाही. दिदिंच्या आवाजात द्राक्षाची नशा पण आहे आणि रूद्राक्षाची भक्ती पण आहे, धर्माची भावना पण आहे आणि देश प्रेमाची शक्ती पण आहे. म्हणुनच आज ह्या वयात सुद्धा त्या त्यांच्या जागेवर कायम विराजमान होत्या, त्यांची ती जागा त्या गेल्यावर ही कोणीही घेऊ शकत नाही. लता दिदींच्या स्वभावात एक फार मोठा गुण होता तो म्हणजे त्या सर्वांशीच आदराने बोलयाच्या. समोरची व्यक्ती त्यांच्यापेक्षा वयाने लहान असो किंवा मोठी त्यांच्याशी त्या अगदी विनम्रतेनेच बोलत. तसेच कुठलही गाण गातांना त्या आपल्या पायातील चप्पल काढुन जमिनीला नमस्कार करुन अनवाणीच गाण म्हणत असत. ही त्यांच्या स्वभावातील खुबी त्यांच्या व्यक्तीमत्वाचा आलेख किती उंचावता होता हेच दर्शवीते. गायना बरोबरच समाजसेवेची ही दिदींना खुप आवड होती.
अगदी जवळच उदाहरण म्हणजे त्यांनी आमच्या सटाणा गावातील कॉलेज वर लांबलांबहुन येणा-या विद्यार्थिनींसाठी तीस लाख रुपये खर्च करुन खास विद्यार्थिनी वसतीगृह उभारले. सटाणा कॉलेजने त्या वसतीगृहाला *लता मंगेशकर वसतीगृह* हे नाव देउन दिदींच्या ह्या समाज कार्याचा गौरव केला. लता मंगेशकर म्हणजे एक अस व्यक्तीमत्व होत की जे आजच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील रोजच एक अविभाज्य घटक बनलेल आहे. जर माणुस बहिरा नसेल तर दिवसातून कमितकमी चार पाच वेळेस लता दिदिंचा आवाज सर्वांच्या कानावरुन हमखास जातोच. एकतर टिव्हीवर तरी येईल, किंवा मग रिक्षात, टैक्सीत किंवा स्वतच्या कार मधे १००% त्यांचा आवाज येणार म्हणजे येणारच. माझ विचाराल तर माझ्या दिवसाची सुरुवात दिदिंच्या भक्तिगीताने आणि रात्रीचा शेवट त्यांच्या फिल्मी गिताने होतो. अशा ह्या लता दीदी आज आपल्यातून निघून गेल्या, त्यांचे एक गीत *रहे ना रहे हम, मेहका करेंगे बनके कली, बनके सबा बाग - ए - वफा मे* हे नेहमी त्यांचे अस्तित्व त्या अजुनही आपल्यातच आहेत हे दर्शवीत राहील. आणि हो अजुन एक गोष्ट ती ही त्यांच्याच गीतात त्या सांगुन गेल्यात *तुम मुझे यू भुला ना पाओगे, जब कही भी सुनोगे गीत मेरे, मेरे संग संग तुम भी गुणगुणाओगे..........
*