Ads Area

(Google Ads)

डोंगऱ्यादेव : एक आनंददायी उत्सव

डोंगऱ्यादेव : एक आनंददायी उत्सव
    - यशवंत मंगा पवार
ठाणेपाडा ता.जि. नंदुरबार




मित्रहो,
      जय डोंगऱ्यादेव.....
      शितमाऊली.......
                 डोंगऱ्यादेव उत्सव कार्यक्रमाच्या काही प्रसंगी उपस्थित राहून या उत्सवाच्या काही ठळक वैशिष्टे नोंदी केलेल्या आहेत,त्यानिमित्ताने प्रारंभापासून ते समारोपापर्यंतची थोडक्यात माहिती  यापूर्वीच सामाजिक माध्यमातून शेअर केलेली आहे,
       तथापि या वर्षीच्या डोंगऱ्यादेव उत्सवातील बऱ्याच प्रसंगांचे आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान च्या सौजन्याने  लाईव्ह प्रक्षेपणातून व समाजातील काही शेवऱ्या माऊली व काही ज्येष्ठ व्यक्तींकडून माहिती घेवून त्या माहितीत अधिकची भर घालण्याचा प्रयत्न केला आहे,
    साधारणतः आपल्या आदिवासी कोकणी समाजात दरवर्षी (1) कार्तिक मासारंभ,/ मोठी दिवाळी ( चंद्रदर्शन) पासून या उत्सवाची सुरुवात होऊन समारोप कार्तिक पौर्णिमेला होते,(2) मार्गशीर्ष मासारंभ,लहान/ नान दिवाळी ( चंद्रदर्शन) पासून या उत्सवाची सुरुवात होऊन समारोप मार्गशीर्ष पौर्णिमेला होते,(3)पौष मासारंभ, ( चंद्रदर्शन) पासून या उत्सवाची सुरुवात होऊन समारोप पौष/नडघी पौर्णिमेला होते.
      अशाप्रकारे दरवर्षी कार्तिक,मार्गशीर्ष व पौष या तीन महिणेच्या चंद्रदर्शनापासून पौर्णिमेपर्यंत आपले  समाजबांधव  आपल्या शेतीच्या कामाच्या सोईनुसार किंवा आपल्या मुलांच्या/ नातवंडांच्या सुट्टीचा विचार करून मोठी दिवाळी,नान दिवाळी या दरम्यान जास्त करून डोंगऱ्यादेवाचा उत्सव साजरा करतात, पौष किंवा नडघी पौर्णिमेला सदर उत्सव कमी प्रमाणात साजरा करतात,
      सदर उत्सव काही समाजबांधव हौसेने तर काही नवसाने पूजन करतात,या पूजनाला गड परणणे/(दर)बार/गड धरणे असे म्हणतात,


प्रस्तावना
        प्रारंभी कार्तिक महिन्यात शु.१ शके चंद्रोदय /चंद्रदर्शनाच्या(नवा दिस तो दिवस) आधीच्या दिवशी किंवा ज्या दिवशी गड थूम्भ पूजनाच्या आधीच्या दिवशी  गल्लीतील सर्व मंडळी, भाऊबंध, नातेवाईक यांना सायंकाळी नियोजित घरधनी माऊलीच्या घरी सर्व पुरुष मंडळींना बोलावण्यात येते.
त्यावेळेस गल्लीतील मंडळी आम्हाला कशासाठी बोलावण्यात आले ? असे औपचारिकता घरधनी माउलींना विचारण्यात येते. तेव्हा घरधनी व्यक्ती ....... गड हौसेने पूजनाचा कार्यक्रम करावयाचे आहे, तरी आपण गल्लीतील सर्व मंडळीनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मदत करावी अशी विनंती करण्यात येते. तेव्हा सर्वांनी होकार देऊन पूजन कधी करावे, रात्र जागरण कधी करावे, गडावर कधी जावे, भंडारा व घरभरणी कधी (चावदस/पौर्णिमा विचारात घेवून) करावी व इतर कामाचे नियोजन करण्यात येते,त्याप्रसंगी सर्व उपस्थितांना चहापान केले जाते, सुरुवातीलाच शेवऱ्या माऊली  , भोपा माऊली, पावरकर/डवरी माऊली,  गोठारी/ कथकरी माऊल्या इत्यादी पूजनाच्या कार्यक्रमास आवश्यक असलेल्या माऊल्यांना सुपारी देऊन निश्चित करण्यात येतात. तसेच गावात दवंडी देऊन अमुक दिवशी अमूकच्या घरी गड दरबार पूजनाचा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट करून मांसाहार वर्ज्य/त्याग करण्याबाबत गावकऱ्यांना सूचना दिली जाते. डोंगऱ्यादेव पूजन असलेल्या घराचे अंगण (खळी) गाईच्या शेणाने व नवा पाण्याने सारवले जाते, साधारणतः उत्सवाचे पूर्ण दिवस दररोज अशाप्रकारे खळी सारवली जाते,
 

        1. गड पूजन:
 पंचमी किंवा सप्तमी किंवा नवमीच्या च्या दिवशी  गड/दरबार पूजनाचा कार्यक्रमात शेवऱ्या ,(मुध्दानी) माऊली देवाचा नामोच्चार करीत,  पावरी च्या मंद स्वरात, शांत वातावरणात, गड पुंजनाचा कार्यक्रम पार पाडला जातो. सदरची पुंज साधारणतः पाच, सात, नऊ (उभी आणि आडवी सारख्या प्रमाणात पूर्ण तांदळाची पुंज)  प्रमाणात पाडली जाते. त्यानंतर माऊल्या नाचगाण/ वाहना उठवितात. त्यात प्रथम सर्व माऊल्यांना हातावर  गोमतीर दिले जाते किंवा त्याशिवाय डोंगऱ्यादेवाच्या खळीवर प्रवेश केला जात नाही. सदरच्या खळीवर पूर्ण १५ दिवस (पूजनापासून ते घरभरणीपर्यंत)पादत्राणे घालून येत - जात नाही.
        गड पूजनाच्या ठिकाणी पूर्ण कालावधी दिवा अखंड तेवत ठेवला जातो,धुपाची गोवरी सुध्दा अखंड तेवत ठेवली जाते, खळीच्या दोन बाजूला दोन अखंड धुणा (शेकोट्या) पेटविल्या जातात, पूजन व दिवा डालाने (मोठे टोपले) झाकले जाते. भगत कांबळीवर बसून देवाचे नामोच्चार (देव रवाडणे) करतात.
     डोंगऱ्यादेवाला जे जे वाहिले जाते, त्या त्या सर्व पदार्थ (डाळ्या,मुरमुरे,बोर, खोबरा, पान,सुपारी इत्यादी) माऊली मंडळींना वर्ज्य असते. विशेषतः घरधनी माऊलीसह कुटुंबीय पथ्याबाबत फारच जागरूक राहतात. (खडतर डोंगऱ्या देवाचा स्वतःहून घालून घेतलेला धाक/वसा किंवा डोंगऱ्यादेव पावन/ इच्छापूर्ती होण्याची खात्री, असे म्हटल्यास वावगे होणार नाही)
         यादिवशी व रात्र जागरण पर्यंतच्या रात्रीपर्यंत देवाच्या नामोच्चराचा उल्लेख शेवऱ्या माऊली व अंगात वारा उतरणाऱ्या अन्य भगताकडून केला जातो.
        या भगतांमध्ये सात शेवर, देवांगण्या,  इत्यादी प्रकारचे वारा येतो.
तसेच पूजनाच्या पहिल्या दिवसापासून रात्र जागरण पर्यंत पहाटेही थंडीत वहाणा/नाचगाणी नियमितपणे केले जाते. याकामी भोपा माऊलींची भूमिका फार महत्वपूर्ण असते. वेळेवर नाच - वळती, भगतास होकार देणे, सवाई-जोड ची माहिती भगतास देणे, यात पूर्ण रुपातल्या (आख्खे) तांदळामधून बोटाच्या चिमटीत घेऊन भोपा माऊलीच्या हातात देऊन विषमसंख्या/सवाई यात शुभ मानले जाते.
        पूर्वी रात्र जागरणाच्याच दिवशी नंदीबैल नाचण्याचा कार्यक्रम व्हायचा. आज साधारणतः प्रत्येक दिवशी असे कार्यक्रम परिसरातील गावातील कलाकार मंडळी नंदीबैल नाचविण्यासाठी डोंगऱ्या देवाच्या खळीवर येतात. नंदीबैलासाठी किंवा नाच करणाऱ्या कलाकारांना देणगी देऊन आपल्या नावाचा डंका पिटविला जातो.
     सध्याच्या कालावधीत डोंगऱ्यादेव खळीवर लायटिंग (रोषणाई) व साऊंड सिस्टीम ची सुविधा केली जाते,पूर्वी अशाप्रकारची रोषणाई व साऊंड सिस्टीम ची व्यवस्था नसायची.
      साधारणतः ज्या दिशेला गड असतो त्या दिशेकडे  प्रत्येक कार्य केले जाते, त्या दिशेला तोंड करून शेवऱ्या माऊली किंवा भगत घुमतात,त्या दिशेला बसून वहाणा उठवितात,त्या दिशेला तोंड करून आरती करतात,त्या दिशेला तोंड करून कथकरी कथाकथन करतात,त्या दिशेला तोंड करून जेवायला ही बसतात,
 

   २) कथा कथन :
        कथकरी माऊली खळीवर माऊल्याचे नाच गाणं संपल्यावर कथा सांगणारा गोठारी व होकार देणारा /देणारे तसेच थाळी नाद/स्वर कथकरी माऊली निर्माण करून कथेबरोबर त्यांचे मधूर स्वर मिसळतात.
        सदरील कथा दररोज साधारणतः पहाटेपर्यंत सांगितली जाते, त्यात यथाशक्ती थाळीचे पूजन करतात, कथकरी थाळी पूजणाऱ्याच्या नावाची महती गातात.
     सदरील कथेत साधारणतः ऊनिसर बाळ, कणसरा माता, धवल्या कुणबी इत्यादीच्या कथा लावल्या जातात,
    पूर्वी एक गोठारी व एक झिनक्या असे दोनच कथकरी असायचे आता डफडी, टाळ मुळे तीन ते चार पर्यंत सहकारी असतात. तसेच आता कथकरी स्वरवाद्य (पेटी) या आधुनिक साधनांचा वापर करायला लागले आहेत,
 
 
 
३) रात्र जागरण :
        रात्र जागरणच्या रात्री प्रारंभी माऊल्या ११-१२ वाजेपर्यंत नाच वळत्या गायिले जाते. त्यानंतर देवाचे सोंग हरणी, देवांगण्या, भवानी, नंदीबैल, मोरांडी, चिलम पिणारा,मध उडविणे,गवत्या, चाष्ट्या,तेल विक्री करणारा,कपडा विक्री करणारा इत्यादी प्रकारचे व  देवाचे सोंग काढले जाते.
     सोंग संपल्यानंतर त्यांची आरती ओवाळणी केली जाते व त्यांना यथाशक्ती ओवाळणी दिली जाते.
४) गाव मागणे :
        रात्र जागरणाच्या दुसऱ्या दिवशी सर्व माऊल्या गावात आणि शेतातील घरात ज्यांच्या ज्यांच्या घरी पलंग टाकलेले असते किंवा माऊल्यांना निमंत्रण दिले असते. अशा घरी माऊल्या नाचगाण करतात. त्या दरम्यान भंडारी (पीठ), डाळ, तेल, मीठ, मिरची, भाजीपाला अशाप्रकारचे पदार्थ भोजन बनविण्यासाठी दिले जाते. त्यानंतर ते घरमालक माऊल्यांना फराळासाठी चहा, भाजलेल्या शेंगा, गुळ/साखर भात, खजूर,फळ इत्यादी फराळाचे पदार्थ खाण्यासाठी दिले जाते.
        गाव मागणी छोट्या गावात एक दिवस व मोठ्या गावात दोन दिवस केले जाते. पलंग टाकताना ती जागा गाईच्या शेणाने सारवली जाते. पलंगात धान्यावर दोराची चुंबळ करून त्यावर दिवा ठेवला जातो. त्यात दाग दागिने ठेऊन ते नेमके कोणत्या प्रकारचे दागिने आहेत. याबाबत शेवऱ्या मावलीला अचूक सांगावे लागते व ते छोट्या डालखाने (छोटे टोपले) झाकले जाते.
        गाव मागणी करून प्राप्त झालेल्या पदार्थापासून मिक्स भाजी, खुडा व भाकरीचे (कमारी) जेवण सर्व माऊल्यांना व गल्लीतील स्त्री पुरुष व निमंत्रित गावकऱ्यांना दिले जाते. सदरचे जेवण अतिशय चविष्ट असते. 
 

५) गडावर प्रस्थान :
        गाव मागणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गडावर जाण्यासाठी तयारी केली जाते. यात सर्व माऊल्यांना जमा करून कंबर (टॉवेल कंबरेला) बांधण्याची सूचना दिली जाते. काही माऊली उसाच्या काठ्या, टोकरची काठी कमरेला खोसतात,). त्यानंतर गडावर जाणाऱ्या
माऊल्यांना पथ्यासंबंधी परीक्षा म्हणून एक बिलास म्हणजे साधारणतः ८ ते १० इंच अंतरावर वेगवेगळ्या बाजूला दोन घोड्याच्या काठी मधील अंतरामधून प्रवेश करावा लागतो.
        त्यानंतर गल्लीतील/गावातील शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या कणसरा, बाजरी, भात इत्यादी पिकाची पेंडी आणून शेवऱ्या मावलीकडे देतात. त्यातील काही भाग/सेज त्या शेतकऱ्यास शेवऱ्या माउली वाईक मधून बरकत व्हावी असे आशीर्वाद देत परत करतात. (सदरील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले कणसरा इत्यादी पिकांची घरभरणीच्या दिवशी मळणी करतात.)
        त्यानंतर गावातील मंदिरात जाऊन देवाची पूजा केली जाते. नंतर बोकड (खासरून) व पक्षी (कोंबडा) यांना नमवावे (मान्यता) घ्यावी लागते. यात घरधनी माऊली आणि त्यांचे कुटुंबीय बोकडाच्या पाठीवर  सरळ पुढे नवा पाणी (विहिरीवरील, नळावरील किंवा नदीवरील नवीन पाणी)  पुढे डोक्यापर्यंत टाकले जाते. त्यानंतर पूर्ण आकाराचे तांदूळ पाठीवरून  डोक्यापर्यंत टाकतात. त्यावेळेस बोकडाने पूर्ण अंग झटकल्यावर बोकड नमल्याने सर्वजण देवबाप्पा, देवमहाराज असे म्हणतात.
    पक्षी/कोंबडा सुद्धा याच पद्धतीने नमविला जातो, यात पक्षीने अंग झटकले किंवा खाली पडलेले तांदळाचे दाणे टीपल्यावर पक्षी नमला असे संबोधले जाते.
        त्यानंतर सर्व माऊल्यांना नमस्कार/शीतमाउली म्हणत पाया पडून गडावर जाण्यासाठी निरोप दिले जाते.
    त्यानंतर जे आजारी मुले,स्त्री-पुरुष असतात त्यांना शेवऱ्या माऊली आजारातून बरे व्हावे म्हणून छोट्याशा टोकराच्या बांबूपासून बनविलेल्या चाबकाने पाठीवर थाप देऊन आजारापासून मुक्ती व्हावी असे आशीर्वाद देतात.नंतर गडावर जाण्यासाठी पादत्राणेशिवाय सर्व माऊल्या मार्गस्थ होतात.
 
 

६) खड्या पुड्या पूजन :
         माऊल्यां जवळच्या गडावर पायीने आणि लांबच्या गडावर वाहनात बसून  गडाच्या मार्गाला लागतात.
   (पूर्वी लांबच्या गडावर सुद्धा  सर्व मावल्या विना चपला पायी प्रवास करून जायचे,रस्त्यात मध्ये एखाद्या गावी मुक्कामाची व भोजनाची व्यवस्था त्या काळी नातेवाईक करीत असत, त्यावेळी वाहतुकीची फारशी साधने नव्हती)
      रस्त्यात नदीकाठी किंवा शेतात थांबून माऊल्या आंघोळ करतात. खड्या-पुड्या (पूर्ण तांदूळ व सुट्टे १-२ रुपये पळशाच्या पानावर ) सोडून सर्व माऊल्या धुतात. त्यानंतर शेवऱ्या मावली वाईकमधून खड्या पुड्यातून सवाई काढतात. त्यानंतर तेथे माऊल्यांना भाजलेल्या मक्याचा गोड शिऱ्याचा फराळ दिला जातो.   त्यानंतर पायी चालत गडाच्या धानीची, चौकीची (बुवा, वाघदेव,नागदेव इत्यादी चौक्या,) पूजा शेवऱ्या मावली करतात,यात नारळ,फुल,तुळस, डाळ्या,मुरमुरे इत्यादींचा नैवेद्य दाखवितात आणि त्यानंतर सायंकाळी गडाच्या खळीवर आगमन होते.
 


७) खळीवर आगमन व पलंग टाकणे :
        खळीवर पोहोचल्यावर काही माऊल्या  गडाच्या दरबाराच्या ठिकाणी जावून परिसराची साफसफाई/स्वच्छता करतात.
         त्यानंतर खळीवर मावल्यांनी वहाणा उठवून नाच गाण सुरु करतात. त्यानंतर रात्री सु. १० ते १२ वाजेच्या दरम्यान पलंग टाकायला शेवऱ्या, भोपा, पावरकर, घरधनी व इतर माऊल्या गडावर जातात. गडावर काही गावांचे  पोहू (माऊल्या) गडावर पोहोचतात,याबाबत गडावर सर्वात लांब गावाहून आलेल्या पोहूच्या शेवऱ्या माऊलीला प्रथम मान दिला जातो. मुख्य खळीवर ज्या गावाचे गड असतो त्या गावातील पोहुचा सन्मान असतो,
          उपस्थित सर्व  शेवऱ्या मावल्यांनी शांत वातावरणात आपापले पलंग (पूजा/पुंज टाकणे) टाकतात. त्यावेळी एका वेळी एका पावरकरने पावरी वाजविली जाते त्यामुळे शांत वातावरणात पावरीचा स्वर अधिकच मधूर कानी पडत असतो. एक आगळी वेगळी अनुभूती जाणवते,  मुख्य दरबार जवळ मुख्य दिवा(पलंग) लावला जातो,तसेच गडाच्या वरच्या बाजूला टापराना दिवा आणि कातऱ्या दरबारना दिवा लावला जातो,
 

८) दिवा लावणे :
        सर्व शेवऱ्या मावल्यांनी पलंग टाकल्यानंतर ज्यांनी ज्यांनी गड धरण्याचे नियोजित नवस केलेले असते ते गडावर दिवा लावतात. त्यानंतर सर्व शेवऱ्या माऊल्यांनी क्रमाने देवांचा नामोच्चार (घुमणे) केला जातो, त्याला आपापल्या भोपा मावलीने बोलदेवता म्हणून होकार देत पुढे चालना दिली जाते. (यात काही शेवऱ्या हाय मेड्या तर काही हाय बाप्पा असे उच्चार करतात, यात बहुतेक सर्व गड देवतांचा नामोल्लेख करतात.) (पलंग टाकण्यासाठी गडावर जातानाही शेवऱ्या माऊली धानी व सर्व चौक्या पूजत पूजत जातात, जेणेकरून आपल्या धार्मिक कार्यात अडथळा येऊ नये. याबाबत शेवऱ्या माऊली नवीन गडाचे ठिकाण असेल तरी आपल्या वाईक शक्ती/भक्तीच्या साहाय्याने अशा चौक्या शोधून काढल्या जातात.)
 

९) उपवास सोडणे :
         सर्व शेवऱ्या माऊल्यांनी देवाचे नामोच्चार झाल्यानंतर सर्व माऊल्या आपापल्या खळीवर परततात. तेथे
माऊल्याचे नाच गाणं चालू असते. जवळपास उत्तररात्री २ ते ३ वाजेच्या  सुमारास वाहाणा मोडून (नाच गान बंद करून) त्यावेळेस तेथे बनविलेल्या खिचडीचे भोजन करून सर्व माऊल्या उपवास सोडतात.
     त्यानंतर रात्रीच्या शांत वातावरणात सर्व पोहुतील कथकरी मावलींनी आपापल्या कथा रात्रभर सुरु ठेवतात. काही वेळा कथा बंद करून रात्री पौर्णिमेच्या पूर्ण चांद्रप्रकाशातील त्या शांत वातावरणात डोंगऱ्यादेव पशू पक्षीचा  वेगवेगळ्या आवाज/ रूपात दर्शन होण्याची शक्यता असते,  त्यानंतर गडाच्या ठिकाणी लावलेला दिवा पहाटे परत आणला जातो. (सदर पौर्णिमेच्या रात्री धर धनी माऊलीच्या घरी ही काही ज्येष्ठ मंडळी व महिला मंडळी रात्रभर  कथकरीच्या कथा  एकतात,या रात्री घर धनीच्या अंगणात/खळीवर गाय मातेचे किंवा अन्य पाळीव प्राण्याचे देवाच्या रूपात दर्शन होण्याची शक्यता असते.)
 
 

१०) गड ठोकणे :
           प्रांतकाली ६ ते ७ वाजेच्या दरम्यान सर्व माऊल्या गड ठोकण्यासाठी खळी वरून प्रस्थान होतात. बहुतेक सर्व माऊल्यांनी सोबत नारळ आणलेले असते, गडावर गेल्यानंतर शेवऱ्या माऊल्यांनी पूजा केल्यानंतर सर्व माऊल्यांनी डोंगऱ्या देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी नारळाने गड ठोकतात, डाळ्या मुरमुरे ही गडावर सोडले जाते.
          अशातऱ्हेने गडाची पूजा आटोपून सर्व माऊल्या खळीवर परत येतात.
  ११) गडावरून माऊल्याचे घरधनी माऊलींचे घरी आगमन :
          गडावरून घरधनी माऊलीच्या घरी परतल्यावर सर्व माऊल्याचे औक्षण करून गडावर न गेलेली लहान थोर मंडळी त्यांच्या पाया पडतात.
१२) धानी पूजन
          घरधनी माऊलीच्या घरी परतल्यावर थोड्या वेळाने सर्व माऊल्या,गल्लीतील व गावातील स्त्री पुरुष मंडळी गावाच्या धानीवर पूजा करण्यासाठी जातात. त्यावेळेस पावरकर त्यांच्यासोबत पावरी वाजवत जातात. तसेच सोबत महिला मंडळी देवाचे गाणे गात गात धाणीकडे जातात. धानीवर पोहोचल्यावर शेवऱ्या माऊली धानीच्या ठिकाणी देवाला सेंदूर लावून व त्यापुढे गाईच्या शेणाने व नवा पाण्याने थोड्याशा जागेवर जवळ जवळ दोन ठिकाणी सारवून तेथे दोन्ही ठिकाणी पुंज पाडण्यात येतात व उपस्थितांना तांदूळ वाटून देवाचे स्मरण करून देवाच्या पाया पडण्यात येते. त्यानंतर भात साखरेचे नैवैद्य देवाला दाखवून उर्वरित नैवद्य लहान मुलांना  प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते. तसेच येथेही बोकड व कोंबडा नमविण्यात येते. त्यानंतर तेथेच बोकडांना व कोंबडांना बळी देण्यात येते.  त्यानंतर सर्व माऊल्या व स्त्री पुरुष मंडळी डोंगऱ्या देव ज्या घरी पुजलेले असते तेथे महिला मंडळी गात गात पावरकर पावरी वाजवत परत जातात. 
 

१३)भंडारा जेवण :
         त्यानंतर त्यादिवशी सायंकाळी भंडारा असल्याने स्वयंपाकासाठी महिला मंडळी आपापल्या घरून तवा, उलथनी इत्यादी साहित्य भाकरी बनविण्यासाठी आणतात व तीन दगडाच्या चुली बनवून बाजरी/ज्वारीच्या भाकरी बनवितात.
गल्लीतील/गावातील पुरुष मंडळी मटण तयार करण्यासाठी लागणारे कांदे, लसूण, कोथिंबीर, आद्रक, मसाला व इतर पदार्थ तयार करून मटणाची भाजी,भात सर्व
माऊल्या, पाहुणे, गल्लीतील, गावातील स्त्री पुरुष व आमंत्रितांसाठी तयार करतात. स्वयंपाक सुरु असताना कथकरी मंडळी कथा कथन करतात,स्वयंपाकी महिला मंडळी देवाचे गाणे गातात. स्वयंपाकासाठी गाव मागून जे पदार्थ भंडारी (पीठ), मिरची, मीठ, तेल गोळा केले जाते, त्याच्यात दैवी कृपेने वाढ होत असल्याचे निदर्शनास येते. जे स्त्री पुरुष मांसाहार खात नाही अशांसाठी साधे जेवण (शाकाहारी) बनविले जाते. (दरम्यान मटण व चिकन पीस भाजून त्याला तिखट मीठ लावले जाते. याला सोट्या रोट्या म्हणतात. त्या सोट्या रोट्या बाजरीच्या भाकरीसह देवाला चढविले जातात. त्यानंतर त्या सोट्या रोट्या चा स्वाद सोट्या रोट्या चढवायला जाणारे लोक घेतात. (सदर सोट्या रोट्याची चव फारच चविष्ट असते.) मटण, भात, भाकरी व शाकाहारी भोजन तयार झाल्यावर सायंकाळी मटणाच्या जेवणाच्या व शाकाहारी जेवणाच्या पंगती होतात. सार्वजनिक रित्या बनवलेल्या स्वयंपाकाची चव खरोखराचं चविष्ट असते, सदरील देवाच्या ठिकाणच्या सार्वजनिक जेवण चवदार असते, त्यामुळे असे जेवण करणारी व्यक्ती मटणाचा रस्सा पिल्याशिवाय राहत नाही, असे म्हटण्यास अतिशयोक्ती होणार नाही. अशातऱ्हेने भंडाऱ्याचे जेवण सर्व संबंधितांना रस्सा बट्टा का होईना आग्रहपूर्वक दिले जाते.  (पूर्वी सार्वजनिक भंडारा दिला जायचा, असे सार्वजनिक भंडारा आजमितीस कमी झालेले आहेत, याला कारण  जास्त लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यास अडचणी निर्माण होतात किंवा स्वयंपाकासाठी मदत करण्यास तरुण मंडळींचा निरुत्साह दिसून येत असल्याने  सार्वजनिक भंडाऱ्याचे प्रमाण कमी झालेले दिसून येते, म्हणून अशावेळी मटणाचा हिस्सा/वाटा गल्लीतल्या घरोघरी वाटून देतात, त्यामुळे एकमेकामधील आपुलकी व सहकार्याची भावना कमी झाल्याची जाणीव दिसून येते.) रात्रीच्या भंडारा जेवणानंतर कथकरी मंडळी रात्री साधारणता पहाटेपर्यंत कथा कथन करतात, रात्रीचे कथा कथानाच्या ब्रेक मध्ये जागरण साठी कथा ऐकणाऱ्या लोकांना चहापान व बिडी पिणाऱ्यांना बिडी व तंबाखू खाणाऱ्यांना तंबाखू व महिलांना काजळी (जाळलेली तंबाखू)दिली जाते. भंडारा जेवणात घरधनी
माऊलीकडील २ ते ३ बोकड व गल्लीतील  सर्व घरे वर्गणी करून गावटीचा १ ते २ बोकडाच्या मटणाचा स्वयंपाकात समावेश असतो. त्यातील  एक बोकडाचे मटण भंडाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी माऊल्यासाठी बनविले जाते. तसेच भंडाऱ्याच्या दिवसातील मटणाचा काही भाग सेज म्हणून घरमालकाच्या/घरधणीच्या घरी पाहुण्यांच्या पाहूणचारासाठी दिला जातो.
 

१४) डोंगऱ्यादेव कार्यक्रमाचा समारोप/घरभरणी :
          भंडाराच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचा समारोप तथा घरभरणी केली जाते. यात सायंकाळी एक  आदिवासी शेतकरी कोकणी कूटुंब शेतात पिकलेल्या कणसरा धान्याची खळ्यात मळणी करण्याचा सोंग/नाट्य केले जाते. यात खळ्यात मुलांना बैल बनवून पात जुंपून मळणी करतात. त्या दरम्यान काही चोर (अभिनय) खळ्यात चोरी करण्यासाठी जातात व चोरी करताना पकडले जातात व त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करतात, असे सोंग अभिनयाद्वारे दाखवितात,
     (पूर्वी शेताची राखण करण्यासाठी जागल्या ठेवले जायचे,त्या मोबदल्यात त्यांना प्रत्येक शेतकरी चंपा, पायला पिकलेले धान्य त्यांना  जागल म्हणून दिली जायची, सद्या ही पद्धत गावोगावी बंद झालेली दिसून येते.)
          त्यानंतर कणसरा पूजनेसाठी पावरकर बोलावतात तसेच कथा कथनासाठी कथकरी माऊलींना बोलावतात व पूजा करतात. त्यानंतर त्या कणसरा चे व भंडारीचा (उसाच्या तुसासह) सर्व माउलींना शेवऱ्या माऊली सेज देतात.
   त्यानंतर सर्व माऊलींना शीर (टोपी/टॉवेल) चढवतात. तसेच शिरावर खोबरा/ वाटी ठेवतात.            
          त्यानंतर शेवऱ्या, भोपा, पावरकर, कथकरी व टापरा मावलींना शर्ट, पॅन्ट (धोतर) सस्नेह भेट म्हणून दिली जाते. घरधनी माउली शेवऱ्या, भोपा, पावरकर, कथकरी व टापरा माऊलींचे पाया पडून कार्यक्रम व्यवस्थितरीत्या पार पाडल्याबद्धल व भाऊबंध,
गल्लीतील स्त्री-पुरुष, ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्धल त्यांचेही पाया पडून आभार मानण्यात येते.
           त्यानंतर घरधनी मावलींना भाऊ, बहीण व जवळचे नातेवाईक मंडळी कपडे भेट म्हणून देतात. (यापुढे सदर पद्धत बंद व्हावी असे सद्याचा मतप्रवाह आहे.)
 
     त्यानंतर डोंगऱ्यादेव कार्यक्रम प्रसंगी जे जे साहित्य, पदार्थ असतात ते सर्व बांधून माऊल्या डोक्यावर घेऊन डफ,संबळ च्या वादयावर नाच करत वाजत गाजत घरधनी मावलीच्या घरात पोहोच करतात. तसेच घरधनी मावलींच्या घरच्या भानसी(चुलीवरचा भाग) पुजल्या जातात.
          त्यानंतर गडावर लावलेल्या दिव्यापासून गोड शिरा/प्रसाद बनवून उपस्थित सर्वांना देऊन शेवट गोड केले जाते.
         त्या घरभरणीच्या रात्रीही कथकरी माऊली कथा कथन करतात.
         शेवटी शेवऱ्या, भोपा, पावरकर, कथकरी माऊलींना फूल ना फुलाची पाकळी आर्थिक स्वरूपात भेट देऊन डोंगऱ्या देव कार्यक्रमाची यशस्वी सांगता होते.....
      धन्यवाद.......

  
          लेखन - यशवंत मंगा पवार
                        ठाणेपाडा ता.जि. नंदुरबार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad