अर्धवट किंवा अजिबात ओळख नसलेली महाराष्ट्रातील एक मोठी आदिवासी जमात म्हणजे कोकणा किंवा कोकणी ही होय. या जमातीची काही अंशी 'कोकणा- कोकणी आदिवासी इतिहास आणि जीवन' येथे ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाच-साडेपाच लाख लोकसंख्या असलेल्या एवढया मोठया जमातीची ओळख महाराष्ट्रालाही नीटशी नसावी, म्हणजे त्या समाजातील शक्तिस्थळांना आपण मुकल्यासारखेच असतो. 'कोकणा-कोकणी' ही संद्न्या व्यवहारात आपण इतक्या सहजपणे वापरतो, की कोकणी माणूस म्हणजे कोकणात वास्तव्य असलेला गृहस्थ, असा सर्वसाधारण समज असतो, आणि ते बरोबरही आहे. परंतु या नावानेच एखादी आदिवासी जमात असेल यावर फारसा कोणाचा विश्वास बसत नाही. महाराष्ट्रात या जमातीचे वास्तव्य नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आहे, तर गुजरातेत डांग, नवसारी, धरमपूर, सुरत या जिल्ह्यांमधून आहे. या जमातीचा व्युत्पत्तीविषयक इतिहास पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला होता. कोकणी समाजाच्या व्युत्पत्तीविषयक इतिहासावर पहिल्यांदाच कोणीतरी प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येते. प्रा. बी. ए. देशमुख यांचे हे काम एतिहासिक झालेले आहे. कोकण संद्न्येचा भौगोलिक संदर्भ हा अलीकडचा आहे, तर रत्नागिरी परिसरात, समुद्र किनारपट्टीला लागून आर्य येण्यापूर्वी 'कुंकण' नावाचे नागकुल वास्तव्य करीत होते. ते मोठे पराक्रमी कुल होते आणि या 'कुंकण' कुलाच्या काहीतरी चिरस्मरणीय कामगिरीमुळेच या प्रांताला 'कोंकण' हे नाव पडलेले असून, कुंकण कुलाचे वारसदार म्हणजे आजचे कोकणा- कोकणी आदिवासी, असा एएतिहासिक निष्कर्ष म्हणजे प्रा.बी.ए.देशमुख यांनी लावलेला आहे. पहिल्या प्रकरणात भारतातील आदिवासींची सर्वसाधारण ओळख करून देण्यात आलेली आहे, तर दुसर्या प्रकरणात कोकणा- कोकणींचा व्युत्पत्तीविषयी
इतिहास मांडण्यात आलेला आहे. कोकणाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची ओळख तिसर्या प्रकरणात करून देताना लेखकाने जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध सामाजिक अवस्था आणि होणारे सांस्कृतिक संस्कार यांचा पट मांडला आहे. त्यात विवाह, पोशाख, कुटुंब, घर व निवास, पाडे आणि वस्त्या, नातेव्यवस्था व कुळे, आहार व आरोग्य, कोकणी बोलीभाषा, कोकणा- कोकणी धर्म, धार्मिक मध्यस्थ- भगत, डोंगरी देव आणि शेवरी खेळविणे, याचे यथार्थ चित्रण केले आहे. कोकणाच्या या विविध सामाजिक-सांस्कृतिक ओळखही या पुस्तकातून वाचकांना होते. 'डोंगरी देव उत्सव म्हणजे कोकणाच्या सांस्कृतिक जीवनाचा कळसच होय,' असे लेखक एके ठिकाणी म्हणतात, त्याचा प्रत्यय पुस्तक वाचताना आल्याशिवाय राहात नाही. कोकणा- कोकणींची आर्थिक स्थिती सांगताना शेती हा मूळ व्यवसाय असला तरी ४० टक्के कोकणा भूमिहीन आहेत. काबाडकष्ट करणार्या या समाजाला अन्नधान्य संचय किंवा बचतीची सवय नाही; पर्यायाने आर्थिक हलाखीला पारावार नाही, हे लेखक आवर्जून मांडतात. कोकणाच्या राजकीय स्थितीसंबंधी अनास्था असली तरी राजकीय भवितव्याविषयी लेखक आशावादी दृष्टिकोन मांडतात. कारण या समाजाला त्यांच्या गत राजकीय कतरृत्वाविषयी अज्ञान असून, या समाजातील तरुणांनी राजकीय इतिहास अभ्यासला तर त्यांना त्यापासून निश्चित प्रेरणा मिळू शकेल, असे लेखक म्हणतात. सुरगाणा, धरमपूर, वासंदा या काही ठिकाणी स्वातंत्र्य मिळेपर्यंत कोकणाची स्वतंत्र संस्थाने होती, हा ताजा इतिहास आहे. कोकणाच्या शैक्षणिक स्थिती आणि समस्यांसंबंधी सविस्तर ऊहापोह करताना स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ, अशा दोन विभागांत ही चर्चा ते करतात. विशेषत: नाशिक आणि नंदुरबारसह धुळे जिल्ह्यातील कोकणाच्या शैक्षणिक स्थितीसंबंधी लिहिताना अपुर्या शैक्षणिक सोईसुविधा, आदिवासी जीवनसंस्कृतीला अभ्यासक्रमात स्थान नसणे, उदासीन सरकार, भ्रष्ट नोकरशाही, आस्थाहीन व सेवाव्रतीशून्य आणि सुमार दर्जाचे शिक्षक, उपजीविकेची साधने आणि आदिवासी शिक्षण, या काही ठळक मुदद्यांवर आदिवासींच्या शिक्षणाची परखड चर्चा लेखक बी ए.देशमुख करतात. संदर्भ -ई-सकाळ रविवार, २००६ कोकणा आदिवासींची यथार्थ ओळख
सदर लेख प्रा.बी .ए देशमुख यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे.